आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक तर मेसी किंवा रोनाल्डो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचखंडातील फुटबॉलवेड्या दोनशे पाच देशांचा केंद्रबिंदू कोण : लिओनेल मेसी की क्रिस्तिआनो रोनाल्डो? किंबहुना, एक तर मेसी किंवा रोनाल्डो? प्रसारमाध्यमांनी प्रभावित अशा एकविसाव्या शतकास, मेसी-रोनाल्डो चुरस हवीहवीशी वाटते. हे आहे आजचं वास्तव. समजण्याजोगं वास्तव; पण या वास्तवाचं रूपांतर, ‘एक तर मेसी, नाही तर रोनाल्डो’ अशा अवस्थेत व्हावं, ही गोष्ट फुटबॉलला न्याय देणारी आहे का? आणि तशी नसल्यास, मेसी व रोनाल्डो यांच्यासह विविध जागांवर खेळणाऱ्या तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या-दहाव्या, बाराव्या पर्यायासही गौरवाचं स्थान द्यायला नको का अन् कसं द्यायचं?

फुटबॉल क्षेत्रात ही चर्चा रंगू लागलीय, ‘बॉलॉन द ओ’ बहुमानाच्या निवडीपासून. २०१०च्या आधी ‘बॉलॉन द ओ’ आणि फिफा या जागतिक संघटनेचा ‘वर्षातील सर्वोत्तम’ असे दोन सर्वोच्च बहुमान स्वतंत्रपणे दिले जायचे. युरोपियन वा युरोपमध्ये वास्तव्य करणाऱ्या फुटबॉलपटूला पुरस्कार देण्याचा उपक्रम, ‘फ्रान्स फुटबॉल’ने सुरू केला. १९५६मध्ये ही निवड करत असत, ‘फ्रान्स फुटबॉल’चे निमंत्रित युरोपियन क्रीडा-पत्रकार. १९९१ मध्ये फिफाने सुरू केलेला पुरस्कार, केवळ युरोपमधील नव्हे, तर जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूसाठी होता. २०१० मध्ये फिफा व बॉलॉन द ओ पुरस्कार एकमेकांत विलीन झाले. सुरुवात झाली, ती पुनश्च मेसीच्या निवडीपासून. गेल्या आठ वर्षांतील मानकरी, तीनदा रोनाल्डो, तर यंदासह पाचदा मेसी. म्हणजेच एक तर मेसी, नाही तर रोनाल्डो! तेच दोघे जागतिक फुटबॉलचे केंद्रबिंदू!

बॉलॉन द ओ पुरस्काराची निवड (मेसी किंवा रोनाल्डो) फारशी वादग्रस्त नाही; पण निवड करणाऱ्यांची मानसिकता बरंच काही सांगून जाते! ही निवड कोण कसं? फिफाने, सर्व संलग्न राष्ट्रीय संघटनांचे तीन-तीन मतदार निश्चित केले. राष्ट्रीय संघ कर्णधार, राष्ट्रीय संघ-प्रशिक्षक व प्रसारमाध्यमांचा एक प्रतिनिधी फिफाने नेहमीच केलेले हे मतदार योग्यच मानले जातात. हे मतदार त्यांच्या पसंतीच्या पहिल्या तिघांना अनुक्रमे पाच, तीन व एक गुण देतात. पण या मतदारांची मानसिकता फिफा वा कोणतीही बाहेरची शक्ती थोडीच नियंत्रित करू शकते? गुणवत्तेच्या एकमेव निकषावर निवड करणारे मतदार फिफाच काय, पण परमेश्वरही निर्माण करू शकेल का?
बरेच राष्ट्रीय संघनायक, राष्ट्रीय प्रशिक्षक व प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात मतदान करताना, गुणवत्तेपेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य कसे दिले ते बघा-

२००८ ते २०१५ या गेल्या आठ वर्षांतील त्रिवार विजेता रोनाल्डो व पाचदा गौरवित मेसी यांनी कधीही एकमेकांना मत दिलं नाही! पहिलं, दुसरं वा तिसऱ्या पसंतीचंही मत दिलं नाही! ही खोडी प्रथम काढली रोनाल्डोनं, असं मानलं जातं. दोन्ही पुरस्कारांच्या विलीनीकरणानंतर पहिल्या वर्षात मेसीच्या अर्जेंटिनाने मत नोंदवलं नव्हतं, तेव्हा रोनाल्डोची मते गोलरक्षक कॅसिलास यांच्या पारड्यात पडली. यंदा मेसीनं पसंती दिली लुइस सुआरेझ-नेमार-आंद्रे इनिएस्ता या त्याच्या बार्सिलोना क्लबमधील अव्वल सहकाऱ्यांना. रोनाल्डोचे मतदानही त्याच धर्तीवर झाले. रियाल माद्रिद या त्याच्या क्लबमधील करीम बेनझेमा, जेम्स रॉडरिग्झ व गॅरेथ बेल ही होती त्याची पसंती.

रियाल माद्रिद क्लबमधील आपल्या तिघा सहकाऱ्यांना मतदान करणाऱ्या रोनाल्डोच्या मानसिकतेची पार्श्वभूमीही समजावून घेतली पाहिजे. बार्सिलोना क्लबचा मेसी हा नेमार व सुआरेझ यांच्याशी झकास ताळमेळ साधतो. पण रोनाल्डो मात्र करीम बेनझेमा व गॅरेथ बेल यांच्याशी तितकं जुळवून घेत नाही. प्रतिपक्षाच्या मैदानावरील सामन्यात त्याला अवघे ११ गोल लगावता आले आहेत. रियाल माद्रिदच्या मैदानातील २१ गोलच्या निम्म्याने हे ११ गोल! अशा टीकेचा भडिमार रोनाल्डोवर होत आहे. त्यावर वैतागून त्याने पत्रकारांना प्रतिप्रश्न केले. ‘मी काय करीमला रात्री भोजनाला नेले पाहिजे? मी काय गॅरेथला घरी जेवणाचं निमंत्रण दिले पाहिजे? का आम्ही क्रीडांगणात एकमेकांना मिठ्या मारल्या पाहिजेत व चुंबने घेतली पाहिजेत?’ असे प्रतिप्रश्न विचारून रोनाल्डोने पत्रकार परिषदेतून पळ काढला होता!

‘आफ्रिका कप ऑफ नेशन्स’ स्पर्धेत आयव्हरी कोस्टला यशस्वी नेतृत्व देणाऱ्या याया तौरे याने आफ्रिकेतील बरीच पहिल्या पसंतीची मते संपादली. विश्वचषक-विजेत्या जर्मनीचा कर्णधार श्वाइन श्टायगर व प्रशिक्षक जोकीम लो, या दोघांनीही जर्मन फुटबॉलपटू पसंत केले. रॉडरिग्झ व नेमार यांनीही त्यांच्या क्लबच्या खेळाडूंनाच मतदान केले. क्लब व देश यांच्या एकनिष्ठेच्या प्रवाहाविरुद्ध, पहिल्या पसंतीची किमान दोन मते पटकावली, जर्मन गोलरक्षक मॅन्युएल न्युअर, मिडफिल्डर इनिएस्ता, आक्रमक इब्राहिमोविच व लेवानडोवस्की यांनी. इंग्लंडच्या वेन रुनीने, क्लब-निष्ठा बाजूस ठेवत मेसी व गर्ड म्युलर यांच्यानंतरचं स्थान दिलं रोनाल्डोला!

गेल्या सहा वर्षांतील पुरस्कारांची गोळाबेरीज काय सांगते? मेसी चारदा पहिला, दोनदा दुसरा. रोनाल्डो दोनदा पहिला व तीनदा दुसरा. नेमार (यंदा) तिसरा. बेयर्न म्युनिक या जर्मन क्लबचा डावा विंगर फ्रँक रिबेरी एकदा तिसरा. या साऱ्यांची खासियत गोल चढवण्याची आणि प्रेक्षक येतात ते मुख्यत: गोल बघायला! वीस वा पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांची मजा लुटण्यास ते आसुसलेले असतात, तसेच फु़टबॉलमध्ये त्यांना आनंद लुटायचा असतो प्रेक्षणीय गोलांचा. पण गोली, बचावपटू, मिडफिल्डर हेही आक्रमकांइतकेच, संघातील कमी आकर्षक, पण महत्त्वाचे घटक. त्यांची कदर कुठे केली जाते? नाही म्हणायला रशियन गोली लेव याशिन (१९६३) आणि जर्मन मिडफिल्डर ‘कैसर’ फ्रान्झ बेकेनबॉर (७२ व ७६) यांसह जर्मनीचा मथायस सॅमर (९६) व इटलीचा फॅनिओ कॅनावोरा हे गौरवित अपवादात्मक बचावपटू. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अश्विन, बुमरा, नेहरा, जाडेजा यांचीही कदर करा!