आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोळा देशांतील जगज्जेता!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका हाताची बोटं किती? हा प्रश्न विचारूया सर्वसामान्य ग्यानबाला तसाच कोट्यवधी युवतींचा हृदयसम्राट हृतिक रोशनला. ग्यानबाच्या हाताला, तुमच्या-माझ्याप्रमाणे बोटं पाच; पण हृतिकला निसर्गानं बहाल केलंय एका हाताला सहावं बोट.

दुसरा सवाल असा की, गेल्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे इ. स. १९४७ पर्यंत कसोटी-क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या किती? ती होती हृतिकच्या हातातील सहा बोटांइतकी : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, गोरी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व भारत.
आता १९५० वरून एकविसाव्या शतकाकडे वळूया. नव्या शतकासाठी नवा सवाल : ग्यानबाच्या दोन हातांची मिळून किती बोटं? अर्थातच दहा आणि आजमितीस कसोटी खेळणारे देश किती? तेही दहाच. म्हणजे आधीचे सहा देश अधिक भारतातून फुटलेला पाकिस्तान, पाकिस्तानातून फुटलेला बांगलादेश. ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालेली श्रीलंका अन् दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेला झिम्बाब्वे.
थोडक्यात म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या सहावरून दहावर गेली, ती मुख्यत: भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या फाळणीमुळेच! थोडक्यात म्हणजे कसोटी क्रिकेटची दुनिया स्थिरावली ती दहा देशांवर. थोडक्यात म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांची मोजणी करण्यास दोन हातांची बोटं पुरेशी. कसोटी क्रिकेटच्या जागतिक रँकिंगमध्ये अल्पकाळ शिखरावर असलेल्या पाकिस्तानला हुसकावून भारतानं जगज्जेतेपदाच्या शिखरावर तिरंगा फडकावलाय. ते जगज्जेतेपद आहे २०६ नव्हे, तर फक्त दहा संघांतलं!

या दहा देशांची संख्या सोळापर्यंत वाढवता येईल. ‘वेस्ट इंडीज’ या रोमँटिक नावाखाली क्रिकेटपुरते एकत्रित येतात ते छोटे देश वा भूप्रदेश : त्रिनिदाद, जमैका, गयाना, क्रिकेटच्या शेष दुनियेस एकट्याने एकेकाळी आव्हान देऊ शकणारे. बार्बाडोस, विंडवर्ड बेटे, लिवर्ड बेटे, अँटिगा इत्यादी. तरीही कसोटी क्रिकेटची दुनिया सोळा-सतरा देशांची. सव्वाशे कोटी भारतीयांमुळे आकार होऊ शकलेली किंवा भरतखंडातील १७०-१७५ कोटींमुळे बऱ्यापैकी रंगरूपाला आलेली. पण असली जागतिक क्रीडाक्षेत्राचा व्याप तर बघा. हॉकीत पंचखंडांतील किमान साठ देश, तर डेव्हिस चषक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेचा व्याप पंचखंडातील दीडशे देशांचा. अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व खेळांचा बादशहा असलेला फुटबॉल व ऑलिम्पिक यांनी संसार थाटलाय तो १७५ ते २०५ देशांत. विशेषत: एकविसाव्या शतकातील ऑलिम्पिकचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपण बघून भारतीयांचे डोळे उघडले. ऑलिम्पिकच्या असली स्पर्धेकडे पाठ फिरवणं व क्रिकेटच्या कोषात गुंडाळून घेणं पलायनवादी या कटू वास्तवाची जाणीव अधिकाधिक लोकांना होऊ लागलीय. आता डोळे मिटून घेतल्यावरही बऱ्याच भारतीयांना क्रिकेटच्या मर्यादा भेडसावू लागल्या आहेत! दुधाची तहान ताकावर भागवण्यात मजा नाही, हे पटू लागलंय.

दहा संघांतील सतरा देशांच्या तथाकथित जगज्जेतेपदावर भारतानं प्रथम कब्जा मिळवला. २०१०च्या सुमारास. तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील बहुधा सर्वोत्तम संघ. त्याचे मानकरी तेंडुलकर, द्रविड, सेहवाग, गंभीर, लक्ष्मण, कुंबळे, हरभजन, जहीर आदी प्रतिभावान खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व करण्याचा बहुमान लाभला होता, या सर्वांच्या तुलनेत सुमार दर्जाच्या पण नशीबवान महेंद्रसिंग धोनीला. त्या कर्तबगार संघाने, सोळा देशांतील जगज्जेतेपद तब्बल ६३८ दिवस. म्हणजे सुमारे पावणेदोन वर्षे भारतातच राखलं. त्यानंतर सुमारे चार वर्षांनी, विराट कोहलीचे संघ शिखरावर आरूढ झाले, प्रथम ३८ व काही महिन्यांनी पाच दिवसांसाठी. आता न्यूझीलंडवर कानपूर व कोलकाता येथे १९७ व १७८ धावांचे सणसणीत विजय संपादणारा भारत, तीन ऑक्टोबरला पुन्हा शिखरावर गेलाय. भारताचे या पुढील अकरा सलग सामने भारतातच असल्याने शिखरावरचा भारतीय मुक्काम काही महिन्यांनी वाढू शकेल.

एका मोसमात १३ कसोटी (अधिक बऱ्याच, ५० व २० दिवसीय कसोटी) कोंबून, टीव्ही कराराचा लाभ, हावरट भारतीय मंडळाला उठवायचाय. त्यामुळे पावसाळी मोसमात दोन्हीही कसोटींत निदान चाळीस, चाळीस षटकं वाया गेली. दर दिवशी ९० अशा हिशेबानं, पाच दिवसांचा सामना साडेचारशे षटकांचा. पण भारतानं पहिली कसोटी, पाऊणशे षटकं (म्हणजे पाच तासांचा खेळ) हाती राखून आटोपली, तर दुसरा सामना ३१५ षटकांतच, म्हणजे साडेतीन दिवसांच्या मैदानी खेळात गुंडाळला. एवढे भारताचे प्रभुत्व!

कानपूरच्या ग्रीन पार्कची खेळपट्टी फिरणारी, पण मुळीही आखाडा नसलेली. तिथं आर. अश्विनने, केवळ ग्रिमेटसारख्या गुगली गोलंदाजापेक्षा एकच जादा कसोटीत दोनशे बळींचा टप्पा गाढला. त्याला साथ रवींद्र जडेजाच्या अचूकतेची. राजकोटमधील खेळपट्टीच्या आखाड्यात मारा करण्यात त्याचा जन्म गेलेला. तिथं त्यानं आत्मसात केलं किमान कसब. निश्चित टप्प्यावर चेंडू टाकणं. त्याच्या वेगात थोडेथोडे फरक करणं, फ्लाइट वा आर्मर यांची गरज त्याला कमी भासायची त्या विजयापेक्षा, बऱ्यापैकी गवत राखलेल्या खेळपट्टीवरचा जय अधिक सुखद, अधिक मौल्यवान, जलद व फिरकी गोलंदाजांच्या दोन जोड्या भारताकडे आज आहेत. ते चौघेही भेदक, गडी बाद करण्यास प्राधान्य देणारे गोलंदाज आहेत. शिवाय दोन जोड्या राखीव आहेत. या संघात चांगले फलंदाज असले तरी तेंडुलकर, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण यांच्या तोडीचा संच नाही. ही उणीव समतोल, भेदक गोलंदाज भरून काढत आहेत!

वि. वि. करमरकर
ज्येष्ठ क्रीडा अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...