आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटला कायदाच समजतो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटच्या माजोरी पुढाऱ्यांचे दुर्भाग्य अन् अर्थातच भारतीय क्रिकेटचे सौभाग्य की, अघोषित आणीबाणीच्या या काही वर्षांत भारतीय क्रिकेटला अनोखे नायक लाभले आहेत.
असे हे अनोखे नायक, जे कोणी सी. के. नायडू वा कपिलदेव वा विनू मांकड नाहीत; जे कोणी विजय मर्चंट, विजय हजारे, सुनील गावसकर वा सचिन तेंडुलकर नाहीत. जे कोणी सुभाष गुप्ते वा बिशन बेदी वा चंद्रशेखर वा कुंबळे नाहीत, जे कोणी वीरेंद्र सेहवाग वा राहुल द्रविड वा एकनाथ सोलकर नाहीत! जे ना फलंदाज, ना गोलंदाज, ना कर्णधार, ना अफलातून क्षेत्ररक्षक! पण तरीही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी पाने ज्यांच्या नावी असतील, असे हे काही अनोखे नवनायक आहेत - कोणी एक आदित्य वर्मा. असेच एक मुकुल मुद््गल. अशीच त्रिमूर्ती आर. एम. लोढा, अशोक भान अन् आर. रवींद्रन या सज्जनांची.
अन् एक सूचक गोष्ट अशी की एका हातात बडगा अन् दुसऱ्या हातात झाडू घेऊन हे अनोखे नवनायक भारतीय क्रिकेटची सफाई करत होते... पण दुसरीकडे, गावसकर-शास्त्री-वेंगसरकर-विश्वनाथ-कपिल-प्रसन्ना-तेंडुलकर-द्रविड-गांगुली-कुंबळे यांसारखे चमकदार मैदानी नायक, कातडीबचाऊ असे मौनी व्रत धारण करत होते. वर्तमानपत्रात आलेल्या प्रतिक्रिया अचूक असतील तर गावसकर यांना चिंता होती श्रीनिंच्या मनमानीची नव्हे, तर धोनीविना आयपीएलची! (न्यायमूर्तींनी तूर्त तरी बंदी घातलीय धौनीवर नव्हे, तर चेन्नई सुपरकिंग्जवर!)
चेन्नई सुपरकिंग्जचे मालक असलेल्या इंडिया सिमेंट्स कंपनीचे सर्वेसर्वा श्रीनि उर्फ श्रीनिवासन, हेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बडतर्फ अध्यक्ष. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अध्यक्षीय खुर्चीस घट्ट चिकटून बसलेले सत्तालंपट. एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगारास साजेसा ‘हम करे सो कायदा’ हा त्यांचा खाक्या. मंडळानं स्वयंशासित व्हावं, मंडळाच्या कारभाराला वळण लावण्याचं काम अन्य कोणावर (न्यायालयावर वा भारत सरकारवर) सोपवलं जाऊ नये, अशी संधी न्यायालयानं त्यांना वारंवार दिली. समंजस माणसाला इशारा पुरेसा असतो; पण श्रीनि यांना सत्तेची नशा इतकी चढलेली आणि राज्य संघटनांपासून गावसकर-कुंबळे-प्रभृतींना भाट नव्हे, पण होयबा बनवण्याचे तंत्र त्यांना एवढं जमलेलं - की अशी प्रत्येक संधी ते ठोकरत राहिले. आणि शाही दरबारातील लाभार्थींची, हुजऱ्यांची वाहवा स्वीकारण्यात धन्यता मानत राहिले.
बेटिंग, फसवणूक व कट रचणे या आरोपांखाली, श्रीनिंचे विरोधक शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी गुरुनाथ मयप्पन याला अटक केली. ती गोष्ट सुमारे दोन वर्षांपूर्वीची. महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. आर. पाटील यांच्याकडे असतानाची. हा मयप्पन कोण? कोणी आम आदमी नव्हे, तर श्रीनिंचा जमाईराजा. श्रीनिंनी मंडळाची चौकशी समिती लगेच नेमली. त्रयस्थ या स्वतंत्र सदस्य नसलेल्या, मंडळाच्या अंतर्गत समितीनं दिलेले काम चोख बजावलं, म्हणजे मयप्पनला क्लीन चिट दिली. ही चौकशी एकतर्फी आहे, अशी भूमिका घेतली मंडळाचे चिटणीस, इंदूरचे क्रिकेटपटू संजय जगदाळे यांनी. तसेच खजिनदार, पुण्याचे अजय शिर्के यांनी. त्यांचे राजीनामे स्वीकारण्यास श्रीनि एका पायावर पुढे आले! श्रीनिंचे पुढचे पाऊल अपेक्षेनुसार : मयप्पनपाठोपाठ राज कुंद्रा, इंडिया सिमेंट्स व राजस्थान रॉयल्स यांनाही मंडळाच्या त्रिसदस्यीय समितीकडून क्लीन चिट : सारेच निर्दोष! सारं कसं छान-छान! आणि या अघोषित आणीबाणीच्या प्रसंगी, क्षितिजावर उदय पावले, भारतीय क्रिकेटचे अनोखे नवनायक. क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारला मान्यता व संलग्नता देण्यास श्रीनि तयार नव्हते. तरीही, त्या संघटनेचे चिटणीस आदित्य वर्मा यांनी मंडळाच्या या क्लीन चिटना आव्हान दिलं. मुंबई उच्च न्यायालयाने वर्मांना अर्जदार बनण्यास मंजुरी दिली आणि श्रीनिंच्या मंडळाची चौकशी समिती बेकायदेशीर ठरवली. श्रीनिंच्या मंडळाने सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयानं न्या. मुदगल यांची त्रिसदस्य समिती नेमली. समितीने मयप्पन, राज कुंद्रा यांना दोषी ठरवलं! श्रीनिंना मंडळाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवत, गावसकरना हंगामी अध्यक्ष नेमलं! तरीही श्रीनिवासन वठणीवर येत नव्हते. मंडळातर्फेच अंतर्गत चौकशी समिती नव्यानं नेमत राहिले. सर्वोच्च न्यायालयानं, फेर चौकशीबाबत मंडळाची विनंती मान्य केली. पण मंडळ नेमू पाहत असलेली समिती बाजूला सारली. मुदगल समितीला मुदतवाढ दिली! त्यांच्याच अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं, लोढा-भान-रवींद्रन या माजी न्यायाधीशांच्या समितीला, मयप्पन-कुंद्रा-चेन्नई सुपरकिंग्ज-राजस्थान रॉयल्स यांचा निवाडा करण्याचे आदेश दिले.
आणि भारतीय क्रिकेटमधील या अनोख्या नवनायकांनी श्रीनिंच्या मंडळास लगावल्या चार चपराका. त्यांनी बजावलेल्या काही शिक्षा काहीशा सौम्य व अपुऱ्या, तरीही स्वागतार्ह. मयप्पन हा निव्वळ शौकीन, एन्थुझियास्ट, हा त्याच्या सासऱ्यांचा म्हणजे धोनींचा (आणि त्यांच्या लाडक्या महेंद्रसिंग धोनीचा) दावा भंपक ठरवला. २००८ पासून त्याच्या गळ्यात ठेकेदारांचे आयपीएल कार्ड असे. डग आऊटमध्ये त्याचा मुक्त वापर असे. ठेकेदारांच्या अधिकाऱ्यास बेकायदेशीर ठरवलेले बेटिंगचे व्यवहार, मयप्पन, तसेच राज कुंद्रा करत राहीले. बेटिंग हे इंग्लंडमध्ये कायदेशीर असले तरी भारतात बेकायदेशीर आहे, याची जाणीव कुंद्रासारख्या ब्रिटिश बिझनेसमनला कशी नसावी? या दोघांवरही आजन्म बंदी घातली गेली. या दोघांना वेळीच ताळ्यावर आणण्याएेवजी त्यांचे चोचले पुरवत राहणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स संघांना न्यायमूर्तींनी दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावली.
अझरुद्दीन, अजय शर्मा, मनोज प्रभाकर, श्रीशांत, अजय जाडेजा या पाच कसोटीवीरांसह किमान डझनभर खेळाडूंना शिक्षा ठोठावल्या. आता प्रथमच वजनदार अधिकारी (मयप्पन), फ्रँचायझींचा मालक (कुंद्रा) व बड्याबड्यांचे दोन संघ यांच्यावर बंदी घातलीय. हे पाऊल क्रांतिकारी व अभिनंदनीय! क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व फ्रँचायझी-ठेकेदार यांचा माज लगेच उतरणार नाहीही, पण त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना आता उमेद मिळेल. चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या आयपीएल गाजवणाऱ्या संघांवरची बंदी मात्र अपुरी व सौम्य वाटते. त्यांनाही आयपीएलपासून पाच-पाच वर्षे दूर ठेवावयास हवं होतं. मुख्य म्हणजे संघावरील बंदीत संघाच्या संपूर्ण स्टाफवरील बंदीचा उल्लेख असावयास हवाय! एरवी ती बंदी पोकळ ठरेल! या साऱ्या महाभारतावर श्रीनिवासन उर्फ श्रीनिंची प्रतिक्रिया काय? “मला उत्तम झोप लागते”, अशी ते प्रौढी मिरवतात. गेंड्याला लाजवेल अशी घट्ट कातडी त्यांनी कमावलीय! खरं तर त्यांनी आयसीसी अध्यक्षपद सोडलं पाहिजे!
बातम्या आणखी आहेत...