आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निष्पाप’ नरसिंग चूप का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाडाचा निष्कर्ष - नरसिंग यादवने जाणूनबुजून एकापेक्षा जास्त वेळा उत्तेजके घेतली. याबाबत नरसिंग चूप, नाडा चूप, भारतीय फेडरेशन चूप, महाराष्ट्राचे क्रीडामंत्री मुख्यमंत्री चूप! भारतीय कोट्यातील मल्लाची एक जागा वाया गेली ती गेलीच!

आपण जाणूनबुजून कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकं घेतलेली नाहीत. आमच्या अगणित हितशत्रूंनी आपल्या खाण्यापिण्यात उत्तेजकं (स्टेरॉइड्स) मिसळली. आपण पूर्णपणे निष्पाप आहोत आपल्याला एका अभद्र कटकारस्थानात गोवले गेले हा होता पहिलवान मुंबईकर नरसिंग यादवचा दावा. केंद्रीय क्रीडा खात्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. ऑलिम्पिक अगदी जवळ आलंय, असे सांगून नरसिंगच्या केसचा निकाल पटकन लावावा, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव न्यायालयावर नाडावर आणण्याची हवा सरकारी पातळीवर भारतीय कुस्ती फेडरेशन या पातळीवर तयार केली गेली. अखेर राष्ट्रीय डोपिंगविरोधी (नाडा) संघटनेनेही नरसिंगला निष्पाप मानलं. ब्राझीलची राजधानी रिओला जाण्यासाठी निष्पाप नरसिंगला विमानात बसवलं गेलं! |

सारं कसं छान छान.
भारतीय कुस्ती फेडरेशन होती आहे, पहिलवान सुशील कुमारच्या विरोधातील पवित्र्यात. फेडरेशनतर्फे होऊ घातलेल्या आयपीएलच्या धर्तीवरील व्यावसायिक कुस्ती लीगमधून सुशीलने अंग काढून घेतले. लागोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवणाऱ्या सुशीलला या स्पर्धेतील सर्वोत्तम बोली लागली नव्हती ही त्याची सार्थ व्यथा. भारताचा सर्वोत्तम मल्लच खेळत नसल्याने स्पर्धेची आपली इज्जत गेली ही फेडरेशनची तळमळ. तेव्हापासून सुशीलला धडा शिकवण्यास फेडरेशन उत्सुक. नरसिंगने ऑलिम्पिकचा कोटा मिळवलाय त्या न्यायाने सुशील नव्हे, तर नरसिंगच ऑलिम्पिकला जाण्यास पात्र, अशी स्पष्ट भूमिका फेडरेशनने न्यायालयात घेतली. नाडाने त्याला निरपराध ठरवल्यामुळे फेडरेशनने पेढे वाटले!

केंद्र ते महाराष्ट्र सरकारमधील भाजप नेतृत्वाला कुस्तीप्रेमाचा पुळका “आमचा’ नरसिंग निष्पाप ठरला यात लढाई जिंकल्याचा आनंद, कुस्ती विकासाची योजना राबवण्यापेक्षा कुस्तीप्रेमाचे प्रदर्शन करण्याचा बिनखर्चाचा शॉर्टकट!

या वेळी नाडाकडून तरी अपेक्षा होती तटस्थ, नि:पक्षपाती कृतीची. पण कोणा एका सेवकाने (जितेश) नरसिंगच्या अन्नात काहीतरी (म्हणजे म्हणे उत्तेजकं) घुसवली अन्् जितेशला म्हणे अटक केली गेली अन्् म्हणे बराच एक प्रयत्न याआधीही झाला होता अशी भराभर पतंगबाजी नरसिंगतर्फे केली गेली. त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर केले गेले नव्हते तरीही नाडाने नरसिंगच्या बाजूनं झुकतं मात दिलं. त्याला निरपराध ठरवलं.

भारतातील क्रीडा खाती नाडा विसरले की, त्यांची गाठ होती “वाडा’शी. “नाडा’ म्हणजे राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्था, तर “वाडा’ म्हणजे जागतिक डोपिंगविरोधी संस्था. अनेक देशांतील नाडा ही आपल्या देशातील खेळाडूंचं डोपिंग झाकू पाहते हा वाडाचा अनुभव. रशियातील नाडा ही तर सरकार पुरस्कृत डोपिंगची साक्षीदार, असा वाडाचा अहवाल. म्हणूनच वाडाने ऑलिम्पिकपासून संपूर्ण रशियन पथकाला दूर ठेवण्याची मोहीम उभारली. अखेर रशियन पथकातील ३८७ पैकी किमान १०० खेळाडूंना मज्जाव करण्यात वाडा यशस्वी ठरली! हे सारं क्रीडामंत्री विजय गोयल नाडा यांना माहीत नव्हतं का?

अखेर ज्या गोष्टी अटळ होत्या त्याच घडल्या. वाडाने आणखी एका नाडावर (भारतीय नाडावर) अविश्वास दाखवला. साहजिकच प्रकरण “कॅस’कडे (कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट््स) गेलं. रशियातील डोपिंगची चौकशी करणाऱ्या मॅक्लारेन समितीच्या सदस्या, प्रा. क्रिस्तियन आयोटे यांनी नरसिंगच्या दाव्याची अशी चिरफाड केली. नरसिंग यादव त्याचा सोबती (रूम मेट) यांच्या उत्तेजक सेवनाच्या वेळात बारा ते वीस तासांचे अंतर होते. याचा अर्थ एकच एक भोजनात वा नाष्ट्यात त्यांनी उत्तेजक घेतलेलं नव्हतं!

हे उत्तेजक पाण्यातून नव्हे, तर थेरॅप्युटिक डोसमधून (उदा. गोळीतून किंवा गोळ्यांतून) घेतलं गेलं होतं.
नरसिंगच्या पहिल्या चाचणी-नमुन्याचं (सॅम्पल) दहा दिवसांनंतरचे मेटॅबोलाइट यात पाचपटीची वाढ होती. ही वाढ पहिल्या दोन-तीन दिवसांनंतर अपेक्षित असते. याचा अर्थ दुसऱ्या चाचणीतील पाहणी, महिन्याला घेतलेल्या तपासणी-चाचणीत नव्हे, तर दुसऱ्यांदा घेतलेल्या उत्तेजकांच्या गोळ्यांच्या डोसमुळेच ही वाढ दाखवत होती.

वाडाने प्रा. क्रिस्तियन आयोटे यांची तज्ज्ञ म्हणून ही साक्ष सादर केली. एका तज्ज्ञाच्या मतप्रदर्शनास निष्कर्षास दुसरे तज्ज्ञ आव्हान देऊ शकतात वा वेगळे मत नोंदवू शकतात ही गोष्ट वाडाचे पॅनल गृहीत धरतं. पण आयोटे यांच्या शास्त्रशुद्ध चिकित्सेत काही उणीव राहिलीय असं वाडाला वाटत नाही. आपल्याला दगाफटका झाला हा नरसिंगचा दावा! वाडाच्या मते दगाफटका होऊ शकतो. पण असा दगाफटका झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नरसिंग सादर करू शकला नव्हता! मग त्याचं म्हणणं कोणत्या आधारावर ग्राह्य मानायचं?
या साऱ्या पाहणीतून वाडाचं पॅनल एकच एक निष्कर्षावर गेलं. नरसिंग यादवने एकापेक्षा जास्त वेळा जाणूनबुजून उत्तेजकं घेतली.

यातील महत्त्वाचे शब्द : १) जाणूनबुजून २) एकापेक्षा जास्त वेळा!
सीबीआय चौकशीची मागणी नरसिंग फेडरेशन यांनी तेव्हा केली. त्यानंतर नरसिंग चूप फेडरेशन चूप! यात इज्जत गेली त्यांच्यासह नाडाची, विजय गोयल यांच्या केंद्रीय क्रीडा खात्याची भारताची! हे सारं नक्कीच टाळता आलं असतं! मैदानात इज्जत गमावणाऱ्या भारताला मैदानाबाहेरची निदान ही बेइज्जती टाळता आली असती!
(ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)
बातम्या आणखी आहेत...