आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिवसः \'संगणका’च्या ‘महाजाला’वर वाढतेय् मराठीची व्याप्ती, वेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगणक आणि महाजालावर मराठीच्या वापरासाठी विविध उपक्रम मराठी भाषा विभागाने हाती घेतले असून यंदाच्या मराठी भाषादिनी आयोजित उपक्रम संगणकाच्या कळपटलावर आणि महाजालावर मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

आ धुनिक काळात कोणतीही भाषा टिकवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी त्या भाषेचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. शिक्षणाचे माध्यम, बोली, प्रकाशित साहित्य, कोश, व्याकरण, सार्वजनिक वापर इत्यादी घटक भाषेसंदर्भात महत्त्वाचे आहेतच, त्याचबरोबर ‘भाषेचा संगणकावर आणि महाजालावर (इंटरनेटवर) होणारा वापर’, हा आजच्या युगात सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाजालावर मराठीचा वापर वाढविण्याचा आणि प्रत्येक संगणकावर युनिकोड-प्रणीत मराठी कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात, समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) ई-मेल, ब्लॉगलेखन, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी माध्यमांतून मराठीचा वापर वाढतो आहे. 
 
परंतु, या वापराचा वेग आणि व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने आज साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन वैविध्यपूर्ण ठरणार आहे. विकिपीडिया हे जगभरातील असंख्य भाषांमध्ये कार्यरत असलेले लोकप्रिय वेब आधारित,बहुभाषिक संकेतस्थळ आहे. ऐच्छिकपणे कोणत्याही विषयावर कुणालाही लिहिण्याची मुभा असलेल्या या विकिपीडियाला एखाद्या भाषेतील मजकुराची पृष्ठसंख्या किंवा शब्दसंख्या हा भाषेच्या मोठेपणाचा आणि श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातील निकष ठरतो आहे. हे लक्षात घेऊनच, मराठी भाषा गौरवदिनी, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी जनांनी, मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टंकलिखित (टाइप) करावा, असे आग्रही आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.  
 
डॉ. जयंत व मंगलाताई नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अनिल काकोडकर, दीपक घैसास,अच्युत गोडबोले व सुदीप नगरकर यांसारख्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मराठी विकिपीडियावर लिहिण्यासाठी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून  जनतेशी संवाद साधला आहे. संगणकावरील मराठीच्या प्रमाणीकरणासाठी संगणकांवर युनिकोड कार्यान्वित करण्याची माहिती जनतेपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचविण्यात येत असून संगणकाच्या विविध ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये युनिकोड कार्यान्वित करण्यासाठी एक माहितीपूर्ण चित्रफितही शासनाने तयार केली आहे. ती यूट्युबसह विविध समाज माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. 
 
आजच्या दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रात ११ विद्यापीठे आणि उच्च व तंत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेसाठी मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारे राज्य वाङ्मय पुरस्कारदेखील आज प्रदान करण्यात येणार आहेत. साहित्य क्षेत्रातील आपल्या अपूर्व योगदानाबद्दल मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे यांना श्री.पु.भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणारा यंदाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार श्रीमती यास्मिन शेख यांना तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार  श्याम जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठीला माहितीच्या, संगणकाच्या महाजालावर रुजविण्यासाठी आज राज्यभरात साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन हा निश्चितच वेगळा असून विविध उपक्रमांनी हा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल.
 
राज्य वाङ्मय पुरस्कार आज प्रदान हाेणार
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारे राज्य वाङ् मय पुरस्कारदेखील आज प्रदान करण्यात येणार आहेत. साहित्य क्षेत्रातील आपल्या अपूर्व योगदानाबद्दल मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...