आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Tendulkar Artical On Golpitha And Namdev Dhasal

ख-याखु-या बंडखोरीचा झळाळता प्रत्यय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘गोलपिठा’ हा प्रख्यात कवी नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह. ढसाळ हे ज्या भीषण, पण वास्तव अशा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील गोलपिठा भागात प्रारंभीच्या काळात जगले, त्याचे दाहक चित्रण त्यांनी ‘गोलपिठा’ काव्यसंग्रहामध्ये रंगवले आहे.ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांनी ‘गोलपिठा’ला प्रस्तावना लिहिली होती. त्या प्रस्तावनेचा संपादित अंश :
नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही, परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काही वेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या, तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे ते तेव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की, काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की, ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
नंतर काही वेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही, असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा न कळूनही ती मला अस्सल, कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला. मला खूप बरे वाटले.
या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला. आता आठवते की, माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले, पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, ‘तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.’
कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे, पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार ? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला. मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहीत करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषान्रेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, न.....नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उज-एड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलित्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात ‘सांडणे’ शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावे-उजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतिंगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली, सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात - एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलाने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता (विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या व तेदेखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, ‘मला तुझे जग पाहायचे आहे.’ हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत. परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वरवर मी थोडेबहुत पहिले.
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यदेहाचे, असोशी वाहणा-या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिका-यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला ‘शरीफ’ बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचे, हिजड्यांचे, हातभट्ट्यांचे, आध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. 1943 मध्ये मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, ‘माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या.’ लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वांना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जिवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, ‘इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा असतो.’
हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज. कदाचित तसाच जगाला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीन-दीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्त्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक, विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपरिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या, परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारूप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित, संभावित जगावर चौफेर भिरकावत नामदेव ढसाळ याची कविता जेव्हा ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ हाकारीत, ‘अंधारयात्रिक’ होण्याचे नाकारीत, ‘शहराशहराला आग लावण्या’चे पुकारे देत सुसाट निघते तेव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही, हे विशेष. ही बंडखोरी आत्म्याची आहे, कंठाळी नाही. या बंडखोरीला कवितेपुरते तरी राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवीदेखील नाही, परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये.
(लोकवाङ्मय गृह यांच्या सौजन्याने)