आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अार्थिक स्थैर्यासाठी अारक्षण (विजयसिंह पंडित)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा समाजाचे आरक्षण, शेतकरी आत्महत्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयाेग, आर्थिक- शैक्षणिक मागासलेपण, महिलांवरील अत्याचार, विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना, सतत तोट्यातील शेती, वाढती बेरोजगारी या प्रमुख बाबी मराठा क्रांती मोर्चाला कारणीभूत आहेत.
मराठा समाजाचे आरक्षण, शेतकरी आत्महत्या, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयाेग, आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपण, महिलांवरील वाढते अत्याचार, विद्यार्थिनींमध्ये पसरलेली असुरक्षिततेची भावना, सतत तोट्यात चाललेली शेती, वाढती बेरोजगारी या प्रमुख बाबी मराठा क्रांती मोर्चाला कारणीभूत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांकडे प्रशासन अाणि राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे समाजामध्ये दडलेला अाक्राेश या माेर्चाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे.
राज्यात बहुसंख्येने असलेला मराठा समाज मुख्यत्वे शेती व्यवसायाशी जोडलेला आहे. निसर्गाचा लहरीपणा व शहरीकरणाचा हव्यास यामुळे शेती व्यवसाय तोट्यात निघाला. कधी सिंचन प्रकल्पाच्या नावाने तर कधी उद्योग उभारणीच्या नावाने शेतकऱ्यांची शेतजमीन गिळंकृत केली जात असल्याने अनेक शेतकरी अल्पभूधारक आणि भूमिहीन होत आहेत. सातत्याने शेती उत्पन्नात झालेली घट आणि कर्जाच्या ओझ्यामध्ये पडलेली भर यामुळे मागील दोन दशकांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. याचा अभ्यास केल्यास जवळपास ९९ टक्के आत्महत्या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत. ग्रामीण भागातील मराठा शेतकऱ्यांची मुले शिक्षणातून हद्दपार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा शेतकरी उभारू शकला नाही, म्हणून ही वेळ आली आहे. एकीकडे सुविधा आणि सवलतींची खैरात सुरू असताना दुसरीकडे केवळ मराठा म्हणून शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना आणि खदखद अनेक वर्षांपासून मराठा तरुणांमध्ये विशेषतः बेरोजगारांमध्ये निर्माण झालेली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला मराठा समाज आरक्षणासाठी सातत्याने लढा देत आहे. परंतु नेतृत्वहीन आणि असंघटित लढ्याला आजवर यश आलेले नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम राजकीय राहिला. आघाडी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु पुढे युती शासनाच्या काळात तो न्यायालयीन पातळीवर टिकला नाही, याचीही खदखद समाजामध्ये आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या खालावला असला तरी श्रेष्ठत्वाची भावना प्रबळ असल्यामुळे तरुण वर्ग व्यवसाय, उद्योगाकडे वळला नाही. शेती, उद्योग, शिक्षण, नोकरी याहीपेक्षा राजकारणात मराठा समाज अधिक रमला. राजकारणात विशेषतः आमदार, खासदार व मंत्री यामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. वेळोवेळी मराठा समाजाने मोठा भाऊ म्हणून इतर समाजाप्रति आपली कर्तव्ये अतिशय निष्ठेने निभावलेली आहेत. सातत्याने सत्तेमध्ये असतानाही मराठा नेतृत्वाने कधीच जातीपुरता संकुचित विचार केला नाही. त्यांनी समाजातील इतर मागासलेल्या जातीतील लोकांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले. अनेक सवलती व सुविधा इतर समाजाला देताना मराठा नेतृत्वाने कधीच विरोध केला नाही. याउलट इतर अल्पसंख्याक जात समुदायाला पुढे घेऊन जाताना मोठ्या भावाची भूमिका निभावली. मात्र आता खऱ्या अर्थाने वेळ आली आहे, मराठा समाजाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची आणि अशावेळी मराठा समाजाने स्वतःच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन शांत आणि संयमाने काढलेले मूकमोर्चे जातीयवादी ठरू शकत नाहीत. मराठा समाजाकडे सत्ता असताना त्यांनी आत्तापर्यंत हे प्रश्न का सोडवले नाहीत? असे म्हणणेही निरर्थक आहे. शेतकरी आत्महत्या, शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी आणि कोपर्डी येथील घटना हे जरी तात्कालिक मुद्दे मराठा क्रांती मोर्चासाठी कारणीभूत ठरले तरीही अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा मुद्दा यानिमित्ताने चर्चिला गेला. मराठा क्रांती मोर्चांच्या कोणत्याही लेखी निवेदनामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली नाही. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळींनी मराठा-दलित समाजामध्ये दरी निर्माण करण्यासाठी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अॅट्रॉसिटी कायद्याचा निश्चित गैरवापर होत आहे, हे जरी सत्य असले तरीही सद्य:स्थितीत अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी या कायद्यात आवश्यक तो बदल करणे क्रमप्राप्त आहे आणि तशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होत आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डीमधील अमानुष अत्याचाराची घटना अत्यंत वाईट आणि निंदनीय आहे, परंतु या घटनेच्या निमित्ताने मराठा समाजातील अनेक वर्षांचा अाक्राेश मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बाहेर पडला. सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघणारे मोर्चे ही केवळ कोपर्डी घटनेची प्रतिक्रिया नाही, तर त्यामागे अनेक कारणे आहेत. खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मोर्चा हा भावनांचा उद्रेक आहे. मराठा समाजाचे आरक्षण, शेतकरी आत्महत्या अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयाेग, आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, महिलांवरील वाढते अत्याचार, विद्यार्थिनींमध्ये पसरलेली असुरक्षिततेची भावना, सतत तोट्यात चाललेली शेती, वाढती बेरोजगारी यांसह विविध कारणे मराठा क्रांती मोर्चाला कारणीभूत आहेत.
बातम्या आणखी आहेत...