आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम सेठ हाजिर हो!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळे विस्फारणा-या घटना साहित्यविश्वात तशा अभावानेच घडतात. किंबहुना, क्षेत्र मराठीचे असो वा हिंदी-पंजाबीचे, धक्का देणा-या, आ वासून बघायला लावणा-या घटना घडण्याचा स्वभावत: साहित्य हा प्रांत नसतो. इथे वाचकप्रिय साहित्यिकांवर प्रेमभराने शब्दसुमनांचा अखंड वर्षाव होतो. कधी तात्त्विक तर कधी लुटुपुटूचे वादही अधूनमधून येथे खेळले जातात. कधी रॉयल्टी देण्या-घेण्यावरून लेखक-प्रकाशकांत जाहीर खडाजंगी होते, क्वचित प्रसंगी एखादेच तेंडुलकर, एखादेच नेमाडे वा एखादेच कर्नाड ठोस अशी राजकीय-सामाजिक भूमिका घेत खळबळ माजवून देतात. परंतु या सगळ्या
घटना-प्रसंगांचे पडसाद मर्यादित वर्तुळापलीकडे उमटत नाहीत. या तुलनेत अर्ध्याहून अधिक जग व्यापून असलेल्या इंग्रजी साहित्यवर्तुळाचा व्याप कितीतरी मोठा. त्यातील परस्पर व्यवहारांचा गुंता मोठा आणि त्या व्यवहारातून आकारास येणा-या घटना-प्रसंगांची व्याप्तीही कैकपटींनी मोठी. त्यामुळेच सलमान रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’विरोधात खोमेनी फतवा काढतात, त्याचे पडसाद केवळ एका समूहात नव्हे, सर्व जगभर उमटतात. परंपरेच्या बेड्या तोडून अभिव्यक्त होऊ पाहणा-या तस्लिमा नसरीनला मूलतत्त्ववाद्यांच्या भीतीने स्वत:च्या देशातून परागंदा व्हावे लागते, त्याची दखल सा-या जगाला घ्यावी लागते. अमिताव घोषसारखा तत्त्वाला चिकटून असलेला लेखक ‘साहित्य महोत्सवांत भाग घेऊन मला स्वत:चे माकड करून घ्यायचे नाही,’ अशा आशयाचे जाहीरपणे बेधडक विधान करतो, तेव्हा जगभरातल्या साहित्यिकांना त्या विधानाकडे दुर्लक्ष करताच येत नाही. अशा या ‘व्हायब्रंट’ इंग्रजी साहित्यवर्तुळातील विक्रम सेठसारखा कमालीचा मनस्वी आणि स्वत:ची समलिंगी प्रकृती उघड करणारा धाडसी लेखक -कवी थक्क करून टाकणा-या घटनेच्या केंद्रस्थानी आला आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात मीडियातून प्रसृत झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पेंग्विन-रँडम हाऊस या प्रथितयश प्रकाशन संस्थेने विक्रम सेठ यांनी नियोजित वेळेत कादंबरीचे लेखन पूर्ण न केल्याच्या कारणावरून आगामी ‘अ सुटेबल गर्ल’ (?)नावाच्या कादंबरीसाठी दिलेली 1.7 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 10 कोटी 30 लाख रुपये इतकी महाप्रचंड आगाऊ रक्कम परत मागितली आहे. एक प्रकारे सेठ यांच्या लेखक म्हणून असलेल्या विश्वासार्हतेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेठ यांना देऊ करण्यात आलेल्या आगाऊ रकमेचा आकडा सर्वसामान्यांचे डोळे विस्फारून टाकणारा आहे. या निमित्ताने विक्रम सेठ यांच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांचा अभिमान आणि अहंकार गोंजारला जाऊन आगाऊ रक्कम एवढी मोठी असेल तर पूर्ण रक्कम किती, अशा खमंग चर्चा रंगल्यास आश्चर्य वाटावयास नको. परंतु तेवढ्यापुरतीच चर्चा मर्यादित ठेवणे हे विक्रम सेठ यांच्यातील श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यिकावर अन्याय करणारे आहे, तितकेच ते भविष्याच्या संकेतांकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यासारखेही आहे. 20 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ (ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी या कादंबरीचा विलक्षण चिकाटीने ‘शुभमंगल’ नावाने केलेला मराठी अनुवादही गाजला आहे.) या जवळपास तेराशे पानांच्या आणि सुमारे सहा लाख शब्दांच्या इंग्रजीतील एकमेवाद्वितीय कादंबरीने सेठ नावारूपास आले. तोवर सायबाच्या भाषेत असे धाडस झाले नव्हते. अर्थात, पुस्तकाच्या आकारात ‘अ सुटेबल बॉय’चे यश सामावले नव्हते, तर सेठ यांनी चार कुटुंबांच्या जगण्यातील व्यामिश्रता टिपत मानवी नातेसंबंध आणि परस्पर व्यवहारांचा विशाल पट ज्या ताकदीने उलगडला होता, ते विलक्षण अद्भुत होते. दोन्हींची तुलना होत नसली तरीही वाचकांना असा अनुभव यापूर्वी गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूट’ने दिला होता. पुढे सेठ यांच्या द गोल्डन गेट, द रिव्हर्ड अर्थ, अ‍ॅन इक्वल म्युझिक आदी कादंब-या प्रकाशित झाल्या, परंतु त्यांच्या ‘अ सुटेबल बॉय’चे गारुड रसिकमनावरून काही केल्या उतरले नव्हते. हीच कदाचित सिक्वेल लिहिण्यामागील प्रेरणा ठरली असावी. गेल्या चार-पाच वर्षांपासून इंग्रजी साहित्यप्रेमींमध्ये या आगामी पुस्तकाबद्दल कमालीची उत्सुकता दिसून येत होती. विविध साहित्य महोत्सवांतून भाग घेणा-या सेठ यांना आवर्जून यासंबंधात प्रश्नही विचारले जात होते. परंतु खुद्द सेठ यांनी, आगामी कादंबरी कशी असेल, याबाबत मी स्वत: अनभिज्ञ आहे, तुमच्याइतकाच मीदेखील आश्चर्यचकित होण्यास उत्सुक आहे, असे सांगून कुतूहल चाळवणारे मौन पाळणे पसंत केले होते. ब-याच मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच या वर्षाच्या शेवटी बहुचर्चित कादंबरी प्रकाशित होणार अशी चर्चा होती. तत्पूर्वी जून महिन्यात कादंबरीचे हस्तलिखित लेखक विक्रम सेठ प्रकाशकांकडे सुपूर्द करणार अशी वदंता होती. परंतु तसे न घडल्यानेच प्रकाशक संस्थेने कोट्यवधींची आगाऊ रक्कम परत मागितल्याचे चित्र निदान मीडियातून तरी पुढे आले आहे. सर्जनशीलतेचा अत्युच्च आविष्कार मानली जाणारी कादंबरी म्हणजे एखादी साबणाची वडी आहे का, जी वेळेत नाही दिली म्हणून सर्व करारच रद्द व्हावा? मुळात, विक्रम सेठसारख्या स्वत:च्या अटींवर भरपूर वेळ घेऊन (‘अ सुटेबल बॉय’ ही कादंबरी पूर्ण करण्यास त्यांना आठ वर्षे लागली होती ) लिखाण क रणा-या जगप्रसिद्ध लेखकाने वेळेत लिखाण पूर्ण केले नाही, या एका कारणासाठी कुणी प्रकाशक आगाऊ म्हणून दिलेले पैसेच परत मागेल का, असे बरेच प्रश्न-उपप्रश्न या निमित्ताने चर्चेला आले आहेत. एकीकडे, येत्या काही दिवसांत रँडम हाऊस आणि पेंग्विन या दोन बलाढ्य प्रकाशन संस्थांचे एकत्रीकरण होणार आहे. नव्या व्यवस्थापनाला खर्चात कपात करून त्यांचा म्हणून अजेंडा राबवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगभरात, विशेषत: युरोपात प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बड्या बड्या प्रकाशकांचा भर स्वस्तातली गल्लाभरू पुस्तके प्रकाशित करण्याकडे आहे. या चौकटीत विक्रम सेठ यांच्यासारखा सृजनशील लेखक आणि त्याला मिळत आलेली किंमत याला स्थान नाही, हे आजचे खुपणारे वास्तव आहे. सेठ यांच्याकडून आगाऊ रक्कम परत मागण्याचे हेच तर छुपे कारण नाही? कदाचित लेखक-प्रकाशकांची प्रतिष्ठा जपण्यासाठी परस्पर संमतीने यातून मार्ग काढला जाईलही, परंतु या क्षणी घटनेतून प्रसृत होणा-या भयसूचक संकेतांकडे दुर्लक्ष कसे करता येईल? महत्त्वाचे म्हणजे गेली कित्येक शतके सुरू असलेल्या साहित्यविश्वातील सृजन महोत्सवाच्या शेवटाचा हा प्रारंभ आहे, हे कटू सत्य कसे टाळता येईल?