आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Dalavi Editorial About Cricketer Madhav Mantri

भारतीय क्रिकेटचे भीष्मपितामह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटचे भीष्मपितामह शुक्रवारी गेले. माधव मंत्री यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. शतक हुकल्याची चुटपुट लागली. कारण कालपरवाच, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील रणजी क्रिकेट सामन्याच्या वेळी माधवराव भेटले होते. मी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट पाहायला लागल्यापासून एक प्रेक्षक कायम, एकाच जागेवरून सामना पाहताना पाहिला. तो क्रिकेटरसिक म्हणजे माधवराव. वयाच्या 92व्या वर्षीही त्याच उमेदीने संपूर्ण दिवस त्यांच्या आवडत्या जागेवर बसून त्यांनी संपूर्ण सामना पाहिला. तीच चिकाटी त्यांच्या क्रिकेटमधील संघटन चातुर्यात होती. सामाजिक बांधिलकी जपताना, आयईएससारख्या शैक्षणिक संस्थेचे काम करताना तोच वारसा त्यांनी जपला. सारस्वत बँकेसारख्या आर्थिक शिस्तीच्या चौकटीतल्या आर्थिक संस्थेच्या भक्कम वैचारिक पायातील एक वीट माधवरावांच्या कणखर विचारांची होती. क्रिकेटमध्ये, सलामीवीर फलंदाज, खंबीर यष्टिरक्षक, राष्ट्रीय निवड समिती सदस्य, भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बीसीसीआयचे कोशाध्यक्ष, अशा विविध रूपांमध्ये त्यांनी काम केले.
क्रिकेटच्या व्यासपीठावरील त्यांच्या या प्रत्येक भूमिका लक्षात राहण्याजोग्या ठरल्या, इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणार्‍या या अष्टपैलू खेळाडूच्या काळात सलामीच्या जागेसाठी आणि यष्टिरक्षकाच्या जागेसाठीही प्रचंड स्पर्धा होती. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीत 3 झेल व 3 यष्टिचीत असे 6 बळी एका डावात नावावर लागल्यानंतरही त्यांच्या वाट्याला अवघे चारच कसोटी सामने आले. मात्र स्थानिक क्रिकेट हंगाम त्यांनी सतत गाजवला. मुंबईच्या 40 रणजी विजेतेपदांपैकी तीन विजेतेपदे त्यांनी आपल्या नेतृत्वात मिळवून दिली आहेत. क्रिकेटमधील मैदानावरची त्यांची पहिली इनिंग फारशी गाजली नाही. मात्र निवृत्तीनंतरच्या क्रिकेटच्या दुसर्‍या इनिंगमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. माधवराव शिस्तप्रिय होते. त्यामुळे प्रशिक्षक, प्रशासक, क्रिकेट व्यवस्थापक म्हणून त्यांनी आपली वेगळीच छाप पाडली. वक्तशीरपणासाठी ते प्रसिद्ध होते. शिस्तीचा त्यांचा आसूड सर्वांवर कडाडायचा. त्या वेळी त्यांनी स्वत:चा भाचा सुनील गावसकर याचीदेखील कधी गय केली नाही. इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. त्या वेळचा त्यांनी सांगितलेला एक किस्सा मला मुद्दाम नमूद करावासा वाटतो. 1990पर्यंत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू स्वत:च्या मर्जीनुसार हेल्मेटची निवड करायचे. संघातील बहुतेक खेळाडूंच्या डोक्यावर निळ्या रंगाचे हेल्मेट असायचे. कप्तान अझरुद्दीन मात्र हिरव्या रंगाचे हेल्मेट वापरायचा. माधव मंत्रींनी त्या वेळी व्यवस्थापक म्हणून हेल्मेट एकसारख्या म्हणजे निळ्या रंगाचेच हवे असा आदेश काढला होता. त्या वेळी त्यांनी आणखीही काही गोष्टींमध्ये सारखेपणा यावा यासाठी आग्रह धरला होता.
1964 ते 1968 या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय निवड समितीवर काम केले. त्यांनी त्या वेळी स्थानिक क्रिकेटच्या चौकटीबाहेरून आलेल्या अजित वाडेकरांना भारतीय संघात प्रवेश मिळवून दिला होता. त्याकरिता त्यांनी कर्णधार पतौडींचे वाडेकर यांना संघात घेण्याबाबत मन वळवले होते. भारतीय संघात अजित वाडेकरांचा अगदी अखेरच्या क्षणी समावेश होऊ शकला होता. आपला दावा मांडताना प्रत्येक खेळाडूची कुंडली त्यांच्याकडे तयार असायची. त्या काळात संगणकही नव्हते व क्रिकेटचे आकडेशास्त्रीही नव्हते. अशा वेळी केवळ स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीच्या बळावर निवड समितीमध्ये ते मुंबईच्या अनेक खेळाडूंची बाजू समर्थपणे मांडायचे. त्यामुळेच त्या काळात भारतीय संघात मुंबईकर खेळाडूंची गर्दी कायम दिसायची.

माधवरावांचा दरारा मोठा होता. शिस्तीची चौकट अभेद्य होती. स्वत: शिस्त पाळायचे आणि इतरांनाही पाळायचा आग्रह धरायचे. त्यांच्या सरावाला उशिरा येण्याचे धाडस कुणीही करायचे नाही. संघ व्यवस्थापक असताना कुणीही उशीर करायचा नाही. कप्तान म्हणून ते खडूस होते. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कच्चे दुवे, चुका ते चटकन ओळखायचे. त्यामुळे डावपेचही पटकन लढवता यायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारताच्या महान कसोटीपटूंनीही त्यांच्यासारखा कप्तान झाला नाही, होणार नाही असे म्हटले होते. मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले ते अखेरचे क्रिकेटपटू. त्यानंतर राजकारण्यांनीच आजतागायत ती खुर्ची उबवली. प्रशासन व्यवस्था व यंत्रणा राबवण्यातही ते वाक बगार होते. आज क्रि केटमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि ‘मयप्पन’वृत्ती त्यांच्या काळात वार्‍यालाही उभी राहत नव्हती. एवढे ते कर्मठ शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळे त्यांच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कारभारदेखील पारदर्शी, साफ-स्वच्छ असा होता. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, प्रामाणिक, कठोर शिस्तीचा क्रिकेट प्रशासकही हरपला आहे. प्रत्येक गोष्टीला शिस्तीची चौकट हवी, मनावर ताबा हवा, निग्रह हवा हेच आपणास त्यांच्या आठवणी पदोपदी जाणवून देतील.