आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामनातील कार्टुनवरुन शिवसेनेची कोंडी (विनोद तळेकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या राज्यभरात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चांनी जसे भल्याभल्यांचे अंदाज चुकवले, तसाच या मोर्चाबाबतचा शिवसेनेचा अंदाजही सपशेल चुकला. खरे तर शिवसेना नेतृत्वाने मराठा मोर्चाच्या सरकारविरोधी रोषाचा अंदाज घेऊन पावले उचलली होती. या सरकारविरोधी राेषात शिवसेनेचाही सहभाग दिसावा म्हणून शिवसेनेच्या ठिकठिकाणच्या शिलेदारांना आदेशही गेले होते. ते आदेश शिरसावंद्य मानून पुण्यात राज्यमंत्री विजय शिवतारे, तर औरंगाबादेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर मोर्चांमध्ये सहभागीही झाले होते. कोकणातल्या मोर्चासाठी रामदास कदमही सक्रिय झाले होते. पण अचानक शिवसेनेच्या “सामना’ या मुखपत्रातून मराठा मोर्चात सहभागी असलेल्या महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आणि सगळेच मुसळ केरात गेले. खरे तर मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या वादावर पडदा टाकणे हा योग्य मार्ग ठरला असता. पण पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत कुठल्याच कृत्याबद्दल कधी कुणाची माफी मागितली नाही, मग आताच ती कशी मागावी, या भूमिकेतून हे सारे प्रकरण शिवसेना नेतृत्वाने हाताळले आणि इथेच शिवसेनेचा अंदाज चुकला. माफी मागण्याऐवजी उलट दुसऱ्या दिवशी मुखपत्रातून हा आपल्या राजकीय विरोधकांचा आणि समाजकंटकांचा डाव असल्याचा कांगावा करत शिवसेनेने मुळ मुद्द्यालाच बगल देण्याचा प्रयत्न केला. अर्थात या सगळ्याच घडामोडी शिवसेनेच्या आजवरच्या लौकिकाला साजेशाच होत्या. पण त्यावरची प्रतिक्रिया मात्र थोडी निराळी होती. त्याच दिवशी कधी नव्हे ते शिवसेनेला त्यांच्याच “स्टाइल’मध्ये उत्तर मिळाले. “सामना’च्या ठाणे आणि नवी मुंबई कार्यालयांवर दगडफेक झाली. व्यंगचित्रकाराच्या घराच्या दरवाजावर काळे फासले गेले. इथवरची परिस्थिती कदाचित शिवसेना नेतृत्वासाठी चिंता करण्याइतपत नसावी, पण जेव्हा असंतोषाचा उद्रेक संघटनेतच झाला तेव्हा मात्र पक्षप्रमुखांना या साऱ्या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी लागली. झाल्या प्रकाराबद्दल शिवसेनेच्या दोन आमदार आणि एका खासदाराने आपली नाराजी थेट पक्षनेतृत्वाकडे व्यक्त करत राजीनाम्याची तयारी दाखवली. राज्यभरातल्या विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू झाले आणि “मातोश्री’वरून सूत्रे हलली. अखेर उशिराने का होईना व्यंगचित्रकाराने माफी मागितली. लगोलग सुभाष देसाईंनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत आपला मराठा मोर्चाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर शिवसेना मराठा आरक्षणाबाबत आग्रही आहे, असेही सांगितले. इथेच शिवसेनेची या मुद्द्यावर झालेली कोंडी स्पष्टपणे उघड होते. कारण आजपर्यंत मराठ्यांनाच काय, पण कुणालाच जातीच्या आधारावर आरक्षण नको, आरक्षण फक्त आर्थिक निकषांवर हवे, अशीच शिवसेनेची ठाम भूमिका होती. ती मांडताना प्रसंगी बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांचा विरोध पत्करला. मात्र सध्याचे चित्र थोडे वेगळे आहे.

शिवसेनेचे सध्या विधानसभेत जे संख्याबळ आहे, त्यापैकी जवळपास निम्मे आमदार हे मराठा समाजाचे आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मंत्री मराठा समाजाचे आहेत. राज्यभरातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही मराठ्यांचेच प्राबल्य आहे. ही वस्तुस्थिती पाहता शिवसेनेच्या आरक्षणाबाबतच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटू नये.

दुसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाचे मोर्चे जरी सरकारविरोधी असले तरी मोर्चेकऱ्यांचा राग हा भाजपच्या विरोधात होता. किमान आतापर्यंत तरी शिवसेनेला त्याची थेट झळ पोहोचली नव्हती, कदाचित भविष्यातही मराठा समाजाच्या मागण्यांचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडून सेनेला नामानिराळेही राहता आले असते. उलट मोर्चांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोषाचा राजकीय फायदा शिवसेनेला मिळवता येईल, असे अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. त्याबाबत मतभिन्नता असू शकेल, मात्र चार दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेला या सर्व घडामोडींतून राजकीय तोटा होईल अशी परिस्थिती निश्चितच नव्हती. त्यामुळे व्यंगचित्राबाबतच्या प्रतिक्रियांकडे शिवसेना नेतृत्वाने पहिल्या दिवशी दुर्लक्ष केले. मात्र गेल्या दोन दिवसांत घडलेल्या वेगवान घडामोडींचा इतर राजकीय पक्ष फायदा उचलत आहेत, हे लक्षात येताच शिवसेनेने एकदम सावध भूमिका घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अवघ्या बारा-पंधरा दिवसांवर दसरा येऊ घातला आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी कायमच आपली शक्ती आजमावण्याचा एक पर्याय राहिला आहे. पण आता याच मेळाव्याला आव्हान देण्याबाबतचे सूर मराठा समाजात उमटू लागले आहेत. शिवाय मेळाव्यातल्या गर्दीची तुलनाही मोर्चाच्या गर्दीशी होणार. तेव्हा ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेना नेतृत्वाचा कस लागणार आहे.
(लेखक दिव्य मराठीचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी आहेत.)
बातम्या आणखी आहेत...