आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला पोटगी - निकाल स्वागतार्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूरच्या पीडित पतीला कोर्टाने पोटगी मंजूर केली, हे समानतेच्या मुद्द्याच्या निकषावर योग्य व संयुक्तिक वाटते. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे व तो स्त्री व पुरुष या दोघांना सारखाच असला पाहिजे. 
 
पतीला दोन हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश सोलापूर कोर्टाने दिला आहे. पतीला पोटगी देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सोलापूर सिव्हिल कोर्टातील न्या. पी. व्ही. पाटील यांनी हा न्यायनिवाडा केला. ४७ वर्षीय मुख्याध्यापिका असणाऱ्या पत्नीला ३८ वर्षीय पतीला पोटगी द्यायची आहे. सिव्हिल कोर्टाच्या या निकालाविरोधात पत्नी हायकोर्टात अपील करणार आहे. सातारा व सोलापूर येथील रहिवासी असणारे हे जोडपे एका सामुदायिक विवाहात भेटले. पत्नी शिक्षित व नोकरी करणारी होती तर पती बेकार होता. लग्नानंतर पती पत्नीच्या घरी राहील व घरकामाची जबाबदारी सांभाळेल, या अटीवरच हे लग्न गुड्डापूर गावात धन्नाम्मा मंदिरात २००४ साली झाले. २०१४ मध्ये पत्नीने स्वयंपाकघरातील कामावरून भांडण झाल्यामुळे पतीला घराबाहेर काढले. पतीने कोर्टात धाव घेऊन २००० रुपये पोटगी व घरी राहावयास द्यावे, अशी मागणी केली. कोर्टाच्या म्हणण्यानुसार पत्नीने, पती बेकार आहे हे माहीत असून त्याच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे तिने ही पोटगी द्यावी. 

पत्नीने या सर्व आरोपांचा इन्कार करत पती माझे मानसिक व शारीरिक शोषण करीत होता. दिवाळीत त्याने मला मारझोड केली. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते, माझ्या डोक्याला टाकेही पडले आहेत, असे सांगत पतीचे आरोप मान्य नाहीत, असे सांगितले. 

पारंपरिक विवाह व्यवस्थेला छेद देणारा हा विवाह आहे. भारतीय परंपरेनुसार पत्नी ही पतीपेक्षा वयाने लहान, कमी शिकलेली, कमी उंचीची असली पाहिजे, असे संकेत आहेत. पत्नी दोन वर्षे ते दहा, पंधरा वर्षेपर्यंत लहान असली तरी चालते. चाळीस वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये दहा वर्षांचे तरी अंतर असायचेच. पत्नीचे शिक्षण पतीपेक्षा कमी म्हणजे अल्पशिक्षित, अशिक्षित, बारावी, पदवीधरपर्यंत धाव असते. पण पतीपेक्षा जास्त शिकलेली नको. आज कमावती मुलगी हवी म्हणून पती इतकी (जास्त नाही) शिकलेली मुलगी असेल तर चालते. 
यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल तर प्रश्न निर्माण होतात. 

सत्तर व ऐंशीच्या दशकादरम्यान चळवळीतील सर्व पुरुषांनी पूर्ण वेळ चळवळीत काम करायचे व स्त्रीने शाळा, बँक यासारखी चाकोरीतील नोकरी करून घर चालवायचे, अशी एक व्यवस्था तयार झाली. पण या व्यवस्थेत स्त्रीने नोकरी करीत घर, मुले, नातेवाईक, नोकरी न करणारा नवरा व त्याचे मित्र या साऱ्यांचे व्यवस्थापनही सांभाळायचे व ते या स्त्रीला मान्यही असायचे. त्यामुळे समस्या निर्माण होत नसे. मिळवती स्त्री व बेकार पुरुष हे चित्र तसे दुर्मिळ आहे. याउलट मिळवता पुरुष व बेकार स्त्री जिला आपण गृहिणी म्हणतो हे चित्र सर्वाधिक व समाजमान्य आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी बेकार पतीची जी उदाहरणे दिसतात ती खरेच पीडित असतात. कारण समाज त्यांच्याकडे अनुकंपेने पाहतो. दया करतो. घरकाम केले तर बायक्या म्हणतो. नोकरी करणाऱ्या पत्नीने आपल्यावर वर्चस्व गाजवू नये म्हणून हा पती हरतऱ्हेने काळजी घेत असतो. हा बेकार पती मुलांना शाळेत पोहोचवणे, बायकोला गाडीवरून नोकरीच्या ठिकाणी पोहोचवणे, बाजारहाट, बँकेची कामे करतो, पण स्वयंपाक, धुणी, भांडी त्याला येत नसते. बायकोचे कष्ट पाहून त्याला दया आली तर दार लावून त्याला हे काम लपूनछपून करावे लागते. 

सोलापूरच्या पीडित पतीला कोर्टाने पोटगी मंजूर केली, हे समानतेच्या मुद्द्याच्या निकषावर योग्य व संयुक्तिक वाटते. ज्याच्यावर अन्याय झाला आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे व तो स्त्री व पुरुष या दोघांना सारखाच असला पाहिजे. आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात मुलगा तक्रार घेऊन आला होता. आठ तासांंची नोकरी, तीन तासांचा प्रवास, प्रमोशनसाठी देत असलेल्या परीक्षेची तयारी तो करत होता. घरी असणाऱ्या पत्नीकडून वेळेवर डबाही मिळत नव्हता. पंच्याहत्तर वर्षांच्या आई-वडिलांना तिची मदत तर नाहीच, पण आईच जेवण बनवत होती. स्थूल अशी ती झोपणे, टीव्ही व व्हॉट्सअॅप या व्यतिरिक्त काही करीत नव्हती. अनेक समुपदेशनच्या सत्रानंतर आम्ही तिला सांगितले. मुलींना आम्ही अन्याय व मारझोड सहन करत राहायचे नाही, म्हणून सांगतो तसेच तुझ्या पतीलाही आम्ही तू सहन करत राहायचे नाही, हे सांगू. सोलापूर केसमधील पतीला पोटगी लागू होण्यासाठी दोन वर्षे लागली. पत्नी हायकोर्टात जाणार म्हणजे आणखी काही वर्षे जाणार. आमच्याकडे आलेल्या पीडित मुलीला आम्ही नेहमी सांगतो, तू स्वत:च्या पायावर उभी राहा. स्वत:साठी काहीतरी करायला लाग, स्वत:चे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कर. तेच या पतीलाही सांगावेसे वाटते. 
आज समाजधारणा बदलण्याची गरज आहे. नोकरी करणारी स्त्री व स्वयंपाक, धुणी, भांडी करणारा पुरुष, असा भूमिकेत बदल झाला तर तो समाजमान्य झाला पाहिजे, नैसर्गिक वाटला पाहिजे. वय, उंची, शिक्षण यामधील फरकाच्या संकेतांना छेद गेला पाहिजे. 

समानता ही कृतीत आणण्याची गोष्ट आहे, पण आज ती दाखवण्याची व मिरवण्याची गोष्ट झाली आहे. कौटुंबिक पातळीवर तर याला अनेक कंगोरे आहेत. मुलगा व मुलगी यांची खेळणी, कपडे, त्यांचे रंग (ब्ल्यू व पिंक) खाणे, पिणे काम करणे हे सारे साचेबंद झाले आहे. याला भेदण्याची व मोडण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून, वागण्यातून, कृतीतून ती बदलली पाहिजे. म्हणजे पतीला पोटगी देण्याचा कोर्टाचा निर्णय अपवादात्मक ठरणार नाही तर अशाही निर्णयाचे स्वागत होईल.
 
(सामाजिक कार्यकर्त्या) 
vamagdum@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...