आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकलमचं कोंबडं आरवलंच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळीमेळी - सौदेबाजीबाबत चिडीचूप आयसीसीची सारवासारव
चार सणसणीत पराभवांनंतर झिम्बाब्वे जिंकलं की भारताने हरून घेतलं? झिम्बाब्वेच्या विजयाची शक्यता स्वल्प-अल्प. साहजिकच सट्टेबाजीच्या बाजारात त्यांच्या विजयास गलेलठ्ठ भाव. म्हणूनच भारत पराभूत व बुकी खुश! सुज्ञांस अधिक काय सांगावं?
भारतीय घोडदौड षटकात साडेआठ धावांची व्यवस्थित चाललेली. गरज शेवटच्या षटकात आठ व अखेरच्या चेंडूवर चौकाराची. दोन्हीही प्रसंगी, गोलंदाजांस सामोरा दस्तुरखुद्द धोनी. झिम्बाव्बेच्या दौऱ्यात सलग पाचव्या भारतीय विजयाचेच संकेत.

पण अहो आश्चर्यम्! मुरब्बी धोनीनं पहिल्या चेंडूवर चक्क एकेरी धाव पसंत केली. अन् पुढची जबाबदारी नवोदित रिशी धवनवर सोपवून तो मोकळा झाला. गोलंदाज मॅडझिवला मोका साधण्याची संधी धोनीनं दिली. त्यानंतरच्या चार चेंडूत रिशी धवन बाद व तीनच धावा. मग हरारेतील काहीशा मध्यम आकाराच्या मैदानातही, अखेरच्या चेंडूला सीमापार धाडण्यात धोनीला अपयश. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचण्याच्या त्याच्या लौकिकास तडा, भारत पराभूत व बुकी खुश!

झिम्बाब्वेच्या विजयाची शक्यता अल्प-स्वल्प. साहजिकच त्यांच्या विजयास सट्टेबाजीत भरपूर गलेलठ्ठ भाव. त्यामुळे मनात पाल चुकचुकली. झिम्बाब्वे जिंकलं की भारतानं सामना हरून घेतला? त्या दौऱ्यातील दोन सामन्यांत मिळून तीस चेंडूत फक्त अठ्ठावीस धावा, ही गती धोनीची की चेतेश्वर पुजाराची? नेमकं काय घडलं असावं?

ही सारी प्रश्नचिन्हं शौकिनांपुढे उभी राहिली, ती ब्रेनडन मॅकलमच्या भाषणाच्या संदर्भात. झिम्बाब्वेतील वीस षटकांच्या दुसऱ्या कसोटीआधीच्या पंधरवड्यातील ते भाषण. ‘एमसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट कॉलिन कौंड्रे व्याख्यानमाले’त, द्रविड व संगकार यांच्या गाजलेल्या भाषणांनंतरचं यंदाचं पुष्प गुंफणारं भाषण. सौदेबाजीबाबत आयसीसीची सारवासारव व गलथानपणा, लंडनला लॉर्ड््सवर चव्हाट्यावर आणणारं घणाघाती भाषण. न्यूझीलंडचा स्फोटक अष्टपैलू क्रिस केर्न्स यानं आपल्यापुढे सौदेबाजीचे प्रस्ताव ठेवले, त्याबाबत कारवाई न करणाऱ्या आयसीसीवर टीकेचे आसूड.

अलीकडेच निवृत्त झालेल्या मॅकलमला, एबी डिव्हिलियर्स- स्टीव स्मिथ- विराट कोहलीच्या पंगतीतला फटकेबाज, म्हणून आजची पिढी ओळखते. क्रिस केर्न्स हा १९८९-२००६ च्या जमान्यातील अग्रेसर अष्टपैलू. ६२ कसोटीत ३३२० धावा व २१५ झटपट कसोटीत ४९६० अशा सव्वाआठ हजार आंतरराष्ट्रीय धावांत सणसणीत २४० षटकार व ७१० चौकार. निम्म्या धावा या धडाकेबाज फटकेबाजीत! त्यासह या दोन्हीही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोनशे-दोनशे बळी. झटपट क्रिकेटमध्ये षटकात फक्त ४.८४ धावा देण्याची अचूकता वेगळीच.

पण निवृत्तीनंतर केर्न्सची नियत बदलली. २००८च्या एप्रिलमध्ये त्यानं गाडी पाठवली व कोलकात्यातील हॉटेलात त्यानं मॅकलमपुढे ‘बिझनेस प्रस्ताव’ ठेवला. मॅकलम बधेना म्हणून आणखी दोनदा सौदेबाजीची ऑफर देत राहिला. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सतर्फे खेळणाऱ्या मॅकलमपुढे त्याने रेड वाइनची बाटली ठेवली आणि फलंदाजीतील ‘स्पॉट फिक्सिंग’चे चित्रण पेन्सिलने कागदावर रेखाटले. वीस षटकांपैकी कोणत्या सलग चार-पाच आदी षटकांना किती धावा काढायच्या याचे हिशेब-आराखडे ठेवले. त्यातून सत्तर हजार ते दोन लाख डॉलर्स (पन्नास लाख ते दीड कोटी रु.) असा आकर्षक मोबदला मिळू शकेल. मॅकलमने विचारणा केली की हा काळा पैसा न्यूझीलंडमध्ये कसा नेता? निर्ढावलेल्या केर्न्सकडे उत्तर तयार होतं : दुबईत दोन वर्षांसाठी घर विकत घ्यायचं! मॅकलमला वाटलं की केर्न्स फिरकी घेतोय. मग केर्न्सनं फोनवरून तोच बिझनेस- प्रस्ताव ‘थोडक्यात’ मांडला. मग जूनमध्ये वूस्टरशायरमध्ये नाश्ता घेताना तिसऱ्यांदा गळ टाकून पाहिला. ‘आपल्यात असा काही संवाद झालेलाच नाही,’ असं तो मॅकलमला सांगू लागला. ‘केर्न्स होता माझा हीरो’, असं सांगणाऱ्या मॅकलमने त्याला तडकाफडकी नकार दिला नव्हता. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकापुढे लगेच साक्ष देण्यापूर्वी त्यानं शंभरदा विचार केला. पण अखेर तीन वर्षांनी त्यानं साक्ष दिली. लॉर्ड््सवर ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट व्याख्यानमाले’तील यंदाचे पुष्प गुंफताना मॅकलमनं सांगितलं. आयसीसी भ्रष्टाचारविरोधी पथकातील न्यूझीलंडचे सदस्य जॉन ऱ्होड्स यांच्यापुढे त्यांच्या खोलीत मी माझा अनुभव, आक्षेप नोंदवला. त्यांनी तो धड टेप केला नाही. एवढंच नाही, तर ऱ्होडस्् म्हणाले की, त्यांनी नोंदवलेलं मॅकलमचं निवेदन फाइलच्या तळास बसवलं जाईल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही! मॅकलमची दुसरी खंत म्हणजे त्याच्या साक्षीची गोपनीय बातमी प्रसारमाध्यमांना पुरवली गेली!

लॉर्ड््सवरील आपल्या व्याख्यानात मॅकलमने आयसीसीला काही सूचना केल्या, काही सवाल केले. खेळाडूंच्या साक्षी घेण्याच्या पद्धतीत व्यावसायिक सफाई असावी. खेळाडूंचे प्राथमिक निवेदन, काही गोष्टी हातच्या राखून दिलेले नाही ना, याची दक्षता घ्यावी. एकदा दिलेल्या साक्षीत, निवेदनात मागाहून फेरबदल केले, तर त्याच्या विश्वासार्हतेवर काय परिणाम होईल, तेही खेळाडूला सुरुवातीसच सांगितलं जावं. माझ्याबाबतीत सुरुवातीलाच माझं प्राथमिक निवेदन परिपूर्ण असावं, असा कोणताही प्रयत्न आयसीसीनं केला नव्हता. माझी साक्ष प्रसारमाध्यमांना कोणी पुरवली याची चौकशी आयसीसीने केली नाही, त्याबद्दल कुणाला जबाबदार वा दोषी धरलं नाही!

सौदेबाजीचे आरोप याआधी लू व्हिन्संट, डॅरेल टफी या किवी कसोटीवीरांसह ललित मोदी यांनीही केले होते. २००८ मधील बदनाम आयसीएलमध्ये, खराब गोलंदाजी टाकण्याबद्दल सामन्यामागे पन्नास हजार डॉलर्स (सुमारे ३३ लाख रु.) लाच, जलदगती टफीला देऊ केली होती. ते पैसे मिळेनात तेव्हा टफीने केर्न्सला जीव घेण्याची धमकी दिली होती, असा दावा लू व्हिन्संटने लंडनच्या न्यायालयात केला होता. न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. पण त्यामुळे सौदेबाजीवर थोडेच पांघरूण घातलं जाऊ शकतं? ब्रेनडन मॅकलमसारख्या दर्जेदार खेळाडूचा कोंबडा, काहीशा उशिरांन का होईना आरवलाच आहे!

सरतेशेवटी या साऱ्या आक्षेपांना व सौदेबाजीला, आयपीएलच्या संदर्भात न्यायमूर्ती मुदगल यांच्या मुलाखतीतील सवाल लागू पडतात, ते असे : आयसीसी, बीसीसीआय, भ्रष्टाचारविरोधी पथक इतके ‘डॉरमंट व रिअॅक्टिव्ह’, म्हणजे चूपचाप का? प्रश्नांच्या प्रतीक्षेत कशासाठी?
बातम्या आणखी आहेत...