आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VV Karmarkar Article About Indian Young Cricketer

भारतीय भरारीचे रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्या नेत्रदीपक फलंदाजीने ऑस्ट्रेलियातील मैदाने दणाणून सोडली. क्रिकेटप्रेमाच्या वातावरणात वाढलेल्या सर्वसामान्य कांगारू रसिकांच्या काळजाला हात घातला. या अभूतपूर्व धुलाईबद्दल त्या साऱ्यांचेच अभिनंदन. वीस षटकांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमधील जागतिक रँकिंगमध्ये त्यांनी भारताला शिखरावर नेऊन ठेवले आहे. शंभर टक्के वा निर्भेळ यशांची मालिका भारताने फार मोजक्या वेळी गुंफलेली आहे. आणि आता तर भारतातील गेल्या कसोटी मालिकेत ४-०, आणि त्यावर कडी करणारी म्हणजे ऑस्ट्रेलियन मुलखातील ३-० अशी शंभर टक्के फत्ते! पुनश्च अभिनंदन.
पण जरा खोलात डोकावून पाहिले, तर काही वेगळ्याच गोष्टी जाणवतात. सर्वात रहस्यमय बाब म्हणजे या यशास प्रतिपक्षाकडून, कांगारूंसारख्या खड्डूस प्रतिस्पर्ध्याकडून लाभलेला हातभार. प्रतिपक्षाची ही मदत कळत की नकळत, हा कळीचा मुद्दा क्षणभर बाजूस सारूया. तरीही तितकंसं रहस्यमय वास्तव उरतं, ते प्रतिपक्षास साहाय्यभूत होणाऱ्या, कांगारूंच्या चालींचे!
एक साधी गोष्ट, सीधा सवाल : तीन सामन्यांच्या या मालिकेत विराट कोहली व रोहित शर्मा यांना चक्क दोन-दोन झुंजीत बसवण्याचा निर्णय भारतानं घेतला असता का? किंबहुना असला काही विचार तरी कर्णधार व महा-व्यवस्थापक यांच्या मनास शिवला असता का?
पण असा विचारच नव्हे, तर आचारही अमलात आणला ऑस्ट्रेलियाने. डावरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व कसोटी कर्णधार स्टीव स्मिथ हे जोडीने खेळले ते फक्त सलामीच्या लढतीत. त्यानंतर त्यांना दिली गेली रजा, वेगवेगळ्या कारणास्तव रजा!
वॉर्नर व स्मिथ या दोघांपैकी एखादा जरी तिसऱ्या सामन्यात खेळला असता, तर लढतीचं चित्र पालटू शकलं असतं. त्या लढतीत सलामीला येणाऱ्या शेन वॉटसनच्या बॅटने वसूल केल्या ७१ चेंडूंत १२४ धावा. ही झंझावाती गती षटकामागे साडेदहा धावांची. पण त्याला तोलामोलाची साथ देऊ शकणारे वॉर्नर व स्मिथ (व जायबंदी फिंच) संघात होतेच कुठे? उस्मान ख्वाजा, मार्श, मॅक्सवेल, हेड, विन व बॅनक्रॉफ्ट जमवू शकले ४९ चेंडूंत फक्त ६६ धावा. त्यांची गती षटकात फक्त आठ धावांची. वॉटसनला तोडीस तोड असे स्मिथ-वॉर्नर असते तर वीस षटकांच्या संपूर्ण डावात कांगारूंच्या खात्यात जमा झाल्या असत्या (७ अवांतर धावांसह) १९७ ऐवजी २१७ धावा! ते आव्हान भारताला पेलवले असतं का?
ऑस्ट्रेलियन संघातून वॉर्नर व स्मिथ ही स्फोटक जोडी मैदानात उतरणार नाही, हा प्रतिपक्षाला केवढा दिलासा! भारतीय संघनायक महेंद्रसिंग धोनी मोठा भाग्यवान खराच!
तितकीच रहस्यमय व प्रतिपक्षाला हातभार लावणारी बाब बिनीच्या जोडीची, सलामीवीरांची. तिन्ही सामन्यांत रोहित शर्मा व शिखर धवन हीच जोडी भारतीय डावाची सुरुवात करत होती. पण सलामीच्या जोड्या जमवणे, टिकवणे, जोपासणे अशा परंपरेचा वारसा चालवणाऱ्या ऑस्ट्रेलियाची बिनीची जोडी कोणती होती? पहिल्या सामन्यात फिंच व वॉर्नर, दुसऱ्यात फिन व वॉर्नरबदली शॉन मार्श. आणि तिसऱ्या सामन्यात तर या तिघांनाही बाजूस सारून, ख्वाजा व वॉटसन! नशीब कांगारूंचं की शेवटच्या लढतीपुरतं ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सांभाळणारा वॉटसन अफलातून खेळी खेळून गेला. सुसाट सुटलेल्या वॉटसनच्या ७१ चेंडूंत १२४ धावांनी या सतत बदलत्या सलामीवीरांचा प्रयोग हास्यास्पद होऊ दिला नाही.
सलामीच्या जोडीसारखे प्रयोग ऑस्ट्रेलियाने केले ते त्यांच्या पारंपरिक शक्तिस्थानात. जलद गोलंदाजांत. स्टार्क, हेझलवूड, कमीन्स हे आधीच पूर्णपणे मालिकेबाहेर. सलामीच्या झुंजीत टेट, फॉकनर, रिचर्डसन व वॉटसन, दुसऱ्या सामन्यात टाय, हेस्टिंग्ज व बोलँड यांना संधी देण्यासाठी फॉकनर, टेट यांना बसवलेले. शेवटच्या सामन्यात टेट व बॉइससाठी हेस्टिंग्ज व लिऑन यांना सोडचिठ्ठी दिलेली. स्मिथ व वॉर्नर यांच्याप्रमाणे जलदगती हेस्टिंग्ज व प्रथितयश ऑफ-स्पिनर लिऑन यांचीही निवड एकेक सामन्यापुरतीच!
भारत आपला संघ कायम ठेवत असताना, कांगारूंनी खेळवून पाहिले किमान सोळा जण!
उघडच दिसतंय की, पन्नास वर्षांच्या झटपट क्रिकेटमध्ये १-४ असा सणसणीत मार खाणाऱ्या धोनीला नितांत गरज होती विजयाची. मायदेशातील प्रक्षुब्ध, उतावळ्या रसिकांना शांत ठेवण्याची. स्वत: धोनीसाठी, नेतृत्वाची खुर्ची पक्की पकडून ठेवण्याची. उघडच आहे, अॉस्ट्रेलिया या मालिकेस प्रायोगिक रूप देत होता. कदाचित आगामी विश्वचषकासाठी (खरं तर ‘राष्ट्रकुल’ चषकासाठी!) संघ निवडण्यासाठी मालिका वापरत होता. प्रतिपक्षास त्यातून मदत होणारच, तर तोही धोका पत्करत होता!
कुणी सांगावं, या कलियुगात, प्रतिपक्षाला मदत करण्यामागे वेगळे खेळही असू शकतील, कुणी सांगावं!
धोनीला मी कधीच फार मोठा कप्तान मानलेलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये, भारतीय संघ १९ महिने अव्वल स्थानावर राहिला व भारतातील विश्वचषक (खरं तर राष्ट्रकुल चषक) जिंकून गेला, त्यात फलंदाज धोनीची कामगिरी कितपत होती? अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्धची अविस्मरणीय खेळी अपवादात्मकच. पण त्याला लाभली होती कवचकुंडलं. सचिन, सेहवाग, गंभीर, द्रविड, लक्ष्मण, झहीर, कुंबळे, हरभजन, युवराज अशी कवचकुंडलं. ती गमावल्यावर धोनी उपडा पडला. आता टी-ट्वेंटीमध्ये त्याला गवसली नवी कवचकुंडले. रोहित शर्मा, धवन, कोहली, रैना, (रहाणे), जाडेजा, अश्विन, जयप्रीत भुमरा अशी नवीन कवच- कुंडलं. त्यांची कसोटी लागेल भारतातील विश्वचषकात उर्फ राष्ट्रकुल चषकात.
पण त्या स्पर्धेत ना अॉस्ट्रेलिया ना इतर कोणीही प्रायोगिक संघ थोडेच खेळवून पाहाणार आहे? तिथे कसोटी लागेल धोनी नामक नशीबवान कर्णधाराच्या नव्या कवचकुंडलांची!
(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)