आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागो ‘मोहन’ प्यारे! ( अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तीनअंकी नाटकाचा पडदा अखेर पडला. प्रत्येक अंक अतिशय रंजक. पहिल्या अंकात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी दोन गटांमधले राजकारण, आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेच्या निवडणुकीत सहभागी झालेली धुरंधर व्यक्तिमत्त्वे. दुसरा अंक हा अधिक अ‍ॅक्शनपॅक्ड, म्हणजे मतपत्रिकांची पळवापळवी, बोगस मतपत्रिका, बोगस मतदान आणि मतदानानंतर दोन्ही गटांमध्ये झालेली ‘टाय’ मॅच... तिसरा अंक हा पूर्णपणे सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला. तिस-या अंकात जरी सत्तेची खुर्ची उत्स्फूर्तपणे ताब्यात आली असली तरी त्या उत्स्फूर्ततेचे गूढ कायम ठेवण्यात हे नाटक यशस्वी ठरले. या सस्पेन्समध्ये प्रेक्षकांना बराच वेळ डोके खाजवायला लागले, नाटक संपल्यानंतरही हे असे कसे झाले, कशा प्रकारे ‘गेम’ झाले असावे, असे म्हणतच प्रेक्षक बाहेर पडला.

या निवडणुकीच्या नाटकाचा मुख्य अभिनेता मोहन जोशी. विनय आपटेही मुख्य कलाकाराच्याच भूमिकेत होते. परंतु ‘स्टार’ भूमिका मोहन जोशींच्या वाट्याला आली. उत्कृष्ट अभिनय तर ते करतातच, पण या वेळी त्यांनी त्यांच्या अभिनयात इतके रंग भरले की समोरच्या प्रत्येक कलाकाराला त्यांनी नर्व्हस करून टाकले. ‘मोहन जोशी हाजिर हो’ असे म्हणत त्यांना विरोधकांनी खिंडीत पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा; मात्र आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर ते या खिंडीतून सहीसलामत बाहेर पडले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत 43 पैकी 27 मते मिळवून अध्यक्षपदाची माळ मोहन जोशींच्या गळ्यात पडल्यामुळे जोशींनी जरी सुटकेचा श्वास सोडला असला तरी ही लढाई इथेच संपलेली नाही याची त्यांना नक्कीच जाणीव असावी. ही निवडणूक तशी त्यांना खूपच जड गेली. मुंबई विभागातून मोहन जोशी यांच्या उत्स्फूर्त पॅनलला 8 आणि विनय आपटे यांच्या नटराज पॅनललाही 8 जागा मिळाल्या होत्या.

उर्वरित महाराष्‍ट्रात बहुतांश ठिकाणी जोशी यांचेच उमेदवार विजयी झाले असल्याने पहिल्यापासूनच उत्स्फूर्त पॅनल अध्यक्षपदावर छातीठोकपणे दावा करत होते. महाराष्‍ट्रातील विजयी उमेदवारांना तसेच घटक संस्थांच्या प्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्यात जोशींना यश आले. 2013-18 या कालावधीसाठी आता अध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांना पुन्हा एकवार संधी मिळाली आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना सर्वप्रथम काय करावे लागणार आहे, तर परिषदेवर या निवडणुकीच्या निमित्ताने लागलेला कलंक पुसून टाकावा लागणार आहे. कलावंत हा सामान्यजनांपेक्षा किमान काहीसा वर असतो, हा समज या निवडणुकीमुळे खोटा ठरला आहे. राजकारण्यांनाही लाज वाटेल अशा करामती यंदाच्या या नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झाल्यामुळे कलावंतामागचा मेकअप पुसला जाऊन खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. या निवडणुकीत विनय आपटे यांचा दारुण म्हणावा असा पराभव झाला. तेही नवे-जुने सेलिब्रिटी स्टार बरोबर असूनही! तो झटका त्यांच्या स्वभावाला की नाट्यव्यवहाराला याचे उत्तर तेच देऊ शकतील! असो. कलावंत म्हणवून घेणारी मंडळी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतील, हे या निमित्ताने समजले आणि कलावंतांची ही मलिन प्रतिमा स्वच्छ करण्याचे शिवधनुष्य सर्वप्रथम जोशींना पेलावे लागणार आहे.

नव्या अध्यक्षांसमोर आणि पदाधिका-यांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते निवडणुकीची पद्धत बदलण्याचे, नवीन घटना मंजूर करण्याचे आणि नाट्यसंकुलाच्या व्यवस्थापनाचे. हे संकुल योग्य रीतीने चालावे यासाठी नव्या कार्यकारिणीला मेहनत घ्यावी लागेल. दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने नाट्य परिषदेसाठी पाच कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत. परिषदेला या अटी जाचक वाटत आहेत. त्यातून कशी सुटका करून घ्यायची, हेदेखील परिषदेसमोरील आव्हान असेल. नाट्य परिषद सर्वांना सामावून घेणारी, तसेच देशभरातील नाट्यचळवळींना आपल्याबरोबर घेणारी व्हायला हवी. रंगभूमीचा इतिहास नोंदवणे, नाट्य क्षेत्रातील विविध समस्यांवर मार्ग काढणे, यावरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

नाट्यक्षेत्रावर घटनाबाह्य आणि झुंडशाहीतून येणारी संकटे व दबाव, एक संस्था म्हणून कसे परतवून लावायचे यासाठी नाट्य परिषद खंबीरपणे उभी असल्याचे चित्र दिसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर परिषदेच्या 48 शाखा आणि हजारो सदस्य आहेत. त्यापैकी किती शाखा व किती सदस्य खरोखर सक्रिय आहेत, हे नव्या मंडळींना शोधावेच लागेल. परिषद सशक्त करण्यासाठी ते गरजेचे आहे. बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमीला नव्या दमाने उभे राहता यावे, यासाठी बरेच काही करणे गरजेचे आहे. मुंबईतील नाटके सर्वत्र पोहोचायला हवीत. नाटकांचा प्रेक्षक कमी होत चालला आहे. गावोगावी पक्की नाट्यगृहे उभारली जायला हवीत. समस्या खूप आहेत, एका रात्रीत या समस्या दूर होणे शक्य नाही. मोहन जोशी हे स्वभावाने अतिशय उमदे आहेत. या क्षेत्रातील नडलेल्यांच्या मदतीसाठी तातडीने धावून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ते लोकांच्या चांगल्या परिचयाचे आहेत, बॅकस्टेज कलाकारांना सन्मानाने वागवणारे अशी त्यांची इमेज आहे. एखादा मुद्दा हिरिरीने मांडणे आणि त्याचा सतत पाठपुरावा करणे, ही त्यांची खासियत.

आज मुंबईत जे नाट्यसंकुल उभारले आहे ते त्यांच्याच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. त्यांच्या पूर्वीच्या पाच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी धडाडीने कामे मार्गी लावली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते; त्यांच्यावर आरोप होते ते अनियमितपणा आणि हिशेबातील दिरंगाईबद्दलचे. त्या वेळी तर जोशींनी विरोधी पॅनलमधील सहका-यांना घेऊनच जोरदार कामे केली होती. मात्र ‘चांदवड’ प्रकरणामुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले आणि त्याबद्दल माफी मागून त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या वेळी निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी वर्षभरातच निवडणूक पद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. मोहन जोशींना जर परिषदेवर लागलेला कलंक पुसून टाकायचा असेल, तर त्यांनी सर्वप्रथम बनावट मतपत्रिकांच्या कर्त्याचा शोध पोलिसांच्या मदतीने घेणे अत्यावश्यक आहे. ते कामात वाघ आहेत, आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी बराच वेळ परिषदेसाठी दिला, हे कोणीही नाकारणार नाही. स्वत:चे आग्रह प्रसंगी बाजूला ठेवून सर्वांना, विशेषत: नाट्य परिषदेपासून कायम फारकत घेतलेल्या गुणीजनांना बरोबर घेऊन कारभारात सर्वसमावेशकता आणावी लागेल. निवडणूक संपली आहे, राजकारण मागे पडले आहे, आता फक्त विधायक कामे हाच जोशींचा एकमेव उद्देश असला पाहिजे. तेव्हा जोशी बुवा, आता लागा कामाला!