आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वामनदादांची आठवण कधी-कधी येते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 ऑगस्ट.. महाकवी वामनदादांचा वाढदिवस! बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वामनदादा खेड्या-पाड्यांत, तांडा-वस्तीत व शहराच्या गल्लोगल्ली प्रबोधन करत राहिले. आयुष्यभर झोपडीतल्या माणसाचे दु:ख आपल्या कवितेतून, गीतांतून मांडत राहिले. मात्र एवढे करूनही महाकवी वामनदादांना डि. लिट. पदवी, स्मारक अथवा पुतळ्याची तरी उभारणी व्हावी यासाठी अनेक कलावंत झटत आहेत. तरीदेखील याकडे विद्यापीठ, महापालिका जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत. महाकवी वामनदादांनंतर अनेक व्यक्तींचे पुतळे तयार झाले. त्यांना यासाठी परवानगी जागासुद्धा मिळते, परंतु त्यांच्याच पुतळ्याबाबत असे का होते.. हे कळत नाही.

वामनदादांच्या गीतांवर काही जणांनी पीएचडी केलेली आहे. अनेक गायक आजही आपले पोट भरत आहेत. काहीजण आम्ही वामनदादांचे पाईक आहोत असे सांगतात, मानसपुत्रही म्हणून मिरवतात. एका कवीने लिहिले- ‘हा पण म्हणतो वामन वामन, तो पण म्हणतो वामन वामन , भीमापरी तो वाटला, मी त्याचा अन् तो माझा, दावीत सुटलाय दाखला. वामनाच्या गाण्यावरती, पेटू लागली चूल, वामनाच्या पदरी सांगा, कुणी काय दिलं..’

काही पुढारी वामनदादांना मानतात. मग पुतळा, स्मारक, मरणोत्तर डी. लिट. साठी का कोणी आवाज उठवत नाही? वामनदादांच्या नावे औरंगाबाद शहरात महाकवी वामनदादा क र्डक प्रतिष्ठानसह अनेक संस्था स्थापन झाल्या. प्रतिष्ठानने जागेचीही मागणी केली, परंतु आजपर्यंत तो प्रश्न सुटलेला नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

या महाकवीचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी देशवंडी या गावी झाला. स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात महाकवी वामनदादांची जयंती कलावंतांसह सर्व समाज साजरी करतो. वामनदादा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते आहेत. समाजातील घडामोडींचे, प्रशासनातील कुचराईचे आणि राज्यकर्त्यांतील बेपर्वाईचे निरीक्षण करूनच त्यांनी गीते लिहिली- ‘सांगा आम्हाला बिर्ला, टाटा, बाटा कुठं हाय हो, सांगा आम्हाला धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो..’अशी प्रशासनाच्या कुचराईवर गीते गाणार्‍या कलावंतांवर सरकार गुन्हे दाखल करत आहे. मात्र त्यांनी या गीतांचा अर्थ आधी समजून घेतला पाहिजे. वामनदादा कणखर गीते लिहित व गात असत.

नवोदित कवींना वामनदादांची महतीच माहिती नाही. त्यांनीही मन मानेल तसे लिखाण त्यांच्यावर लिहिले. वास्तविक पाहता अश्लील लिखाण किंवा मुकाबला वज्र्य केलेला होता. वामनदादांनी उच्चकोटींची मुकाबल्यासाठी गीते केवळ काही शिष्यांच्या आग्रहामुळे नाइलाज म्हणून लिहिली. विश्वनाथ भोसले हा एकमेव कलावंत होता, ज्याने वामनदादांच्या गीतांना उत्कृष्ट चाली दिल्या. काही गीते त्याच्यामुळेच अजरामर झाली आहेत. बाबासाहेबांसोबत जे लोक राहिले, त्यापैकी फारच कमी लोक बाबासाहेबांना समजून घेऊ शकले. त्यापैकी दादासाहेब गायकवाड यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. कारण त्यांनी जात-पात न पाहता भूमिहीनांचा लढा यशस्वी करून दाखवला. वामनदादांच्या लेखणीतला जोश आणि वैचारिकता आजकालच्या नवोदित कवींमध्ये अभावानेच आढळते.

मराठवाड्यातील धम्माच्या विचाराने चालणारे काही जाणकार अधिकारी म्हणतात, आंबेडकरी कलावंतांनी फक्त वामनदादांची गीते जरी गायली तर खर्‍या अर्थाने समाजाचे प्रबोधन होईल. वामनदादा एका गीतात लिहितात- ‘यशोधरेच्या पायधुळीचे अंजन, माझ्या नयनी, विराण माता आणि सुजाता झाल्या बहिणी-बहिणी..’ या ओळीवरूनच वामनदादांचा अभ्यास किती दांडगा होता, हे कळून येईल. एका जातीधर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी कधीच केले नाही- ‘ काम दो, काम दो, लोगोंको काम दो, पेट पला इतना तो, दाम दो..’

दुसर्‍या एका गीतात ते म्हणतात,‘ पोटाच्या खळगीसाठी, बांधुनी बिर्‍हाड पाठी, तांडा चालला..’

अशी सारी शिदोरी घेऊन वामनदादा खेड्या-पाड्यांत, तांडावस्तीत, शहरोशहरी प्रबोधन करत राहिले. आजच्या नवोदित कलावंत मंडळींनी वामनदादांचा आदर्श घ्यावा. अन्यथा कोणी म्हणेल. ‘वामनदादा, तुमची आठवण आम्हाला कधी-कधी येते!’