आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक क्रियेचा विपर्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या कलम 3७७ च्या समलैंगिकतेचा मुद्दा उलटसुलट विचारांनी गाजत आहे. तीन वेळा कोर्टाची पायरी चढून शेवटी समलैंगिकता गुन्हाच असल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या फेरविचारावरील अंतिम निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. निर्देशानुसार पुढे सरकार - संसद काहीही करोत पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्यच आहे. यामागे सामाजिक परंपरा, मर्यादाशीलता या गोष्टी तर आहेतच, मुख्य म्हणजे समलैंगिकतेतून होणारा शारीरिक दुष्परिणाम अत्यंत दृश्य स्वरूपाचा आहे. हा काही तर्कशास्त्राचा विषय नसून, शरीरशास्त्राचा, वैद्यकशास्त्राचा विषय असूनही या शास्त्रातील महनीय डॉक्टरही समलैंगिकतेचे समर्थन करीत आहेत. बहुतेक विश्लेषकही याच बाजूचे दिसून येत आहेत, याला अनेक कारणे आहेत, एकतर या वर्गाबद्दल त्यांच्या मनात असलेली अतिरिक्त सहानुभूती, दयाभाव इत्यादी कारणे असावीत. कारण तीही माणसेच आहेत, कुठल्याही स्तरावर त्यांची कुचंबणा व मानहानी होऊ नये हे तर कोणालाही मान्य होईल, पण हा विषय दयाभावापुरता मर्यादित नाही. भावभावना, कामभावना हा त्यांचा स्थायी, नैसर्गिक भाग आहे, पण या नैसर्गिकतेनंतरच्या क्रिया अनैसर्गिक आहेत, यावर विचार होणे गरजेचे आहे. भिन्नलैंगिकता अत्यंत नैसर्गिक असूनही त्यात अनेक प्रकारचे दुष्परिणाम आढळून येतात. मग हा तर पराकोटीच्या असुरक्षिततेचा भाग आहे. समलैंगिकांच्या भावभावनांच्या आदरापोटी समाजाचे स्वास्थ्य हरवून जाईल.
या प्रकरणातील अनेक विश्लेषकांनी सांगितले आहे की, समलैंगिकता पशुपक्ष्यांमध्येही असते, हे खोटे आहे. समलैंगिकता तर सोडाच, एक विशिष्ट कालखंड व वेळेपुरताच अन् तेही विशिष्ट वयोमर्यादेतच विषयवासनेचा नैसर्गिक नियम तंतोतंत पाळतात. पशुपक्ष्यांचे तर सोडाच, झाडे, वनस्पती यातही भिन्नलिंगी सेल्स (ग्रंथी) कायम असतात, म्हणून ते सकस, सरस फुले, फळे देतात. त्यात समलिंगी तत्त्वे असतील तर ही नैसर्गिक प्रक्रिया घडत नाही. घडलीच तर फुला-फळांत विकृती दिसेल, किंबहुना त्या फळात किंवा कणसाच्या जागी काऊस (कानी) नावाचा बुरशीयुक्त विषारी काळा पदार्थ जन्म घेतो, म्हणून ‘उसाच्या पोटी काऊस’ ही म्हण रूढ आहे. हे सगळे वनस्पतिशास्त्राने केव्हाच सिद्ध केले आहे. अगदी हाच नैसर्गिक सिद्धांत मानवासहित समस्त जीवसृष्टीला लागू होतो. यात परदेशातील कायदे वा त्यांच्या मुक्त कामशैलीचे अनुकरण वगैरे असे काही नाही. नैसर्गिक नियमाला इतिहास, भूगोल, संस्कृतीच्या सीमारेषा नसतात, म्हणूनच एकाच रक्तगटातील, घराण्यातील, गोत्रातील, नात्यातील मुला-मुलींचे लग्न शास्त्राने, विज्ञानाने निषिद्ध ठरवले आहे ते यासाठीच. मुला-मुलींची कुंडली, पंचांग, ग्रहमान वगैरे पाहण्यात हाच दृष्टिकोन आहे.
‘फ्री सेक्स’ च्या संदर्भात साम्राज्यवादी देशांनी तब्बल तीनएक शतकांपूर्वी समलैंगिकतेला घातलेल्या कायद्याच्या लगामाचा मथितार्थ लैंगिकतेच्या बाबतीत अत्यंत मर्यादाशील, सुसंस्कृत भारतीयत्वाला काढता आला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक सृजन एका विशिष्ट तंत्रात व नियमात असते, पण याच निसर्गात काही अपवादात्मक निर्मिती प्रक्रिया घडत असते. समलैंगिकता अशीच एक अपवादी अघोरी, अमानुषी क्रिया आहे. म्हणून त्यांच्याबद्दल असलेल्या आपल्या संवेदनांवर कठोर मनाने दगड ठेवावा लागेल. गुणसूत्राने निसर्गत: प्राप्त त्यांच्या भावभावनांना अनैतिकही म्हणता येणार नाही, पण ही क्रियाच ओंगळवाणी, घृणास्पद आहे, म्हणूनच ती अनैसर्गिक आहे, या कारणाने हा जटिल प्रश्न कायदा व सामाजिकतेपेक्षाही व्यावहारिक जास्त असल्यामुळे त्या पातळीवरच त्याचे परिमार्जन व्हावे. अंधा-या खोलीत दोन सख्ख्या भावा-बहिणीला झोपण्यास फ्रायड, युंगसारखे मनोविश्लेषणवादी तत्त्ववेत्ते मान्यता देत नाहीत. नातं कोणतंही असलं तरी प्रसंगाने त्यात शारीरिक आकर्षणाचा भाग अनिवार्य असतो आणि ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याचा त्यांचा सिद्धांत आहे, मग काय ही नाती मोडीत काढायची? समलैंगिकतेचा प्रश्नही असाच जटिल व अवघड जागेचे दुखणे आहे. मित्र-मैत्रीण, पशु-पक्षी, यांच्यात आपापसांत मैत्रीभाव, मन, हृदय, प्रवृत्ती जुळणे, एकाकार होणे हे नैसर्गिक आहे, पण त्यात कामवासना निर्माण होऊन प्रत्यक्ष कृती-क्रिया होत असेल तर हे त्यांच्या दृष्टीने मानवीय संवेदनशीलता, कायदा व सामाजिकदृष्ट्या योग्य मानले तरी एकूणच सामाजिक स्वास्थ्य बाधित होईल यात शंका नाही, म्हणून ‘रोग परवडला पण इलाज नको’ असा हा समलैंगिकांचा जटिल, दारुण यक्षप्रश्न आहे.
घनदाट जंगल, द-याखो-यांत राहणा-या आदिवासींच्या नैसर्गिकतेला तोड नाही. ते (स्त्री-पुरुष) नैसर्गिकरीत्या नग्न, अर्धनग्न राहतात. त्यांनी केव्हा कलम 3७७ वाचले? कोणत्या कोर्टाचा निकाल ऐकला? एवढं सगळं स्पष्ट असूनही बरेचजण कंठशोष होईपर्यंत या प्रकरणावर लिहीत, बोलत आहेत. खासगीत मात्र ते समलिंगी दिसताच दुस-या वाटेने जातात. कधी-कधी तर पुरोगामित्वाचा झेंडा मिरविण्यापुरतंच भाषण-लेखन असतं.