Home »Editorial »Columns» Want Excellent Universities

सर्वोत्कृष्ट विद्यापीठे हवीत

अ‍ॅड. डी. आर. शेळके | Feb 23, 2013, 02:00 AM IST

  • सर्वोत्कृष्ट विद्यापीठे हवीत

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2012 नुसार जगातील 400 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी करण्यात आली. त्यात अमेरिकेतील एमआयटी, येल, हार्वर्ड, शिकागो, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, केंब्रिज युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आदी विद्यापीठांचा समावेश आहे. जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, तैवान, पोलंड, सिंगापूर इत्यादी लहान देशांतील विद्यापीठांचाही समावेश आहे; परंतु आश्चर्याची बाब ही आहे की, तुलनेने मोठ्या असलेल्या भारतातील एकाही विद्यापीठाचा या यादीत समावेश नाही. याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी खेद व्यक्त केला आहे. सर्वोत्कृष्ट रँकिंगसाठी संशोधन, अध्यापन, जागतिक स्तरावर दर्जा राखणे, विद्यापीठातून शिक्षण प्राप्त करणा-यांना उत्तम नोकरीची उपलब्धता या सर्व बाबतीत उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट कामगिरीचे निकष लावण्यात आले. भारतातील एकही विद्यापीठ या निकषांच्या कसोटीला उतरले नाही, हे चिंतनीय आहे. संंबंधितांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे आहे.

जागतिक स्तरावर भारतातील विद्यापीठे दर्जा राखण्यात का कमी पडतात, याची कारणे शोधता मूलगामी संशोधनाचा अभाव, अध्यापनाचा सुमार दर्जा, विद्यार्थिवर्गात वाढत असलेली बेशिस्त, ती रोखण्यात कुलगुरूंना येत असलेले अपयश, शिफारशीने अपात्र कुलगुरूंची निवड, समर्पित वृत्तीने अध्यापन करणा-या अध्यापकांचा अभाव, शिक्षणबाह्य क्षेत्रात अध्यापकांचा असलेला रस, राजकारण्यांचा अंतर्गत कारभारात हस्तक्षेप ही कारणे संभवतात. संशोधनाच्या बाबतीत, सर्वोत्तम ठरवण्यात आलेल्या यूके, यूएसएमधील विद्यापीठांतून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणा-यांनी जागतिक स्तरावर मूलभूत संशोधन केले किंवा नेत्रदीपक कामगिरी केली. त्यापैकी अनेकांना नोबेल पुरस्कार मिळाले. भारतीय विद्यापीठांतून बाहेर पडणा-यांनी जागतिक स्तरावर सोडा, आशिया खंडातसुद्धा मूलभूत संशोधन केले नाही. सर्वोत्तम ठरवण्यात आलेल्या परदेशी विद्यापीठांतील पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांना, कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पॅकेजच्या नोक-या मिळतात, तशा भारतीय विद्यापीठांतील शिक्षण घेणा-यांना मिळत नाहीत.

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आपले म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रमवारीत कोणत्या स्थानावर असेल याची कल्पना केलेली बरी. 1958 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठातून आजवर एकही नाव घेण्याजोगा संशोधक झाला नाही. नोकरीसंदर्भात, नामांतरापूर्वी अशासकीय नोकरीसंबंधांच्या जाहिरातीत मराठवाडा विद्यापीठातील पदवीधरांनी अर्ज करू नये, असे नमूद केले जात होते. नामांतरानंतर अशी टीप येणे बंद झाले. तथापि मोठ्या कंपन्यांत तसेच अशासकीय महत्त्वाच्या पदावर या विद्यापीठातून पदवी घेणा-यांची क्वचितच वर्णी लागते. शैक्षणिक दर्जाबाबतीत, जागतिक स्तरावर सोडा, देशाच्या पातळीवरसुद्धा आमचे विद्यापीठ पिछाडीवर आहे. शिस्तीच्या बाबतीत, बेशिस्तीने कहर केल्याचे दिसते. या ना त्या कारणाने विद्यार्थिवर्गाची निदर्शने, आंदोलने चालूच असतात.

विद्यापीठाच्या कार्यालयात घुसून कर्मचा-यांवर हल्ले करणे, एवढेच नव्हे तर एखाद्या सभेत कुलगुरूंवरही हल्ला करणे या घटना विद्यापीठांच्या कीर्तीला गालबोट लावणा-या आहेत. या वेळी बेशिस्तीला आवर घालण्यात विद्यमान कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे कमी पडले आहेत. डॉ. पांढरीपांडे तसे विद्वान! विज्ञान तंत्रज्ञानात पारंगत, संशोधकांचा पिंड असलेले. कसलाही वशिला नसताना केवळ गुणवत्तेवर त्यांची निवड झाली, पण कुलगुरुपदावर केवळ विद्वान असून भागत नाही. समर्थ प्रशासकही असावे लागते. मृदू स्वभावाचे डॉ. पांढरीपांडे यांची प्रशासनावर पकड सैल झाली आहे. त्यामुळेच काही घटकांनी आपले उपद्रव्यमूल्य वाढवले आहे. त्यांच्यापूर्वी आलेल्या काही कुलगुरूंनी विद्यार्थिवर्गात आणि प्रशासनात शिस्त राखण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली होती. पहिले कुलगुरू सुंदरराव डोंगरकेरी, नंतरचे डॉ. नानासाहेब तावडे, गोविंदराव म्हैसेकर, डॉ. विठ्ठलराव घुगे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा समावेश आहे. डोंगरकेरी यांच्या काळात तर बेफाम झालेल्या विद्यार्थी आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबारही करण्यात आला होता. त्या घटनेवरून डोंगरकेरी यांच्यावर बरीच टीकाही झाली होती; परंतु त्यांनी शिस्तीच्या भूमिकेशी तडजोड केली नाही. पुढील मुदतवाढ मिळेल की नाही, याचीही पर्वा केली नाही. डॉ. पांढरीपांडे यांनी खंबीर धोरण स्वीकारून वाढती बेशिस्त संपवावी. दुसरे असे की, विद्यापीठात किंवा बाहेर फुटकळ कार्यक्रमांतही ते प्रमुख पाहुणे या नात्याने सहभागी होतात. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला हजेरी लावतात, कुलगुरूंकडून असे अपेक्षित नाही.

विद्यापीठाकडून सोयीसुविधा उकळण्यासाठी संस्थाचालक त्यांना आपल्या महाविद्यालयात पाचारण करतात, पण त्यांनी महाविद्यालयांना भेटी देण्याचे प्रयोजन नाही. महाविद्यालयांच्या अंतर्गत सर्वांगीण तपासणीसाठी नॅक ही संस्था आहे. शिवाय सर्व कॉलेजेस ई-संगणकाद्वारे विद्यापीठाला जोडली गेली असतील तर कार्यालयात बसून त्यांना कॉलेजांची सद्य:स्थिती, अहवाल पाहता येतात. नुकतीच त्यांची संरक्षण मंत्रालयाशी संलग्न प्रयोगशाळेतील स्टाफ रिक्रुटमेंट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्या समितीच्या बैठकांसाठी त्यांना वेळोवेळी विद्यापीठ सोडून जावे लागणार नाही, त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे विद्यापीठाचे नुकसानही होणार नाही. प्रस्तुत समितीवर झालेली नियुक्ती डॉ. पांढरीपांडे यांचा निश्चितच बहुमान वाढवणारी आहे; परंतु त्यांचे कुलगुरुपद हा त्याहीपेक्षा मोठा बहुमान आहे. कुलगुरूंच्या कार्यालाच त्यांचा प्राधान्यक्रम असावा.

विद्यापीठात राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेपही त्यांनी थांबवावा. काही राजकीय नेते विशिष्ट कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. अंतर्गत कारभारात लुडबुड करतात, असे आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात मोर्चेही काढण्यात आले होते. हे प्रकारही त्यांनी थांबवले पाहिजेत. बाहेर सामाजिक-राजकीय क्षेत्रात भरपूर वाव असताना राजकीय नेत्यांनीसुद्धा तारतम्य बाळगून विद्यापीठात येण्याचे टाळावे. कु लगुरुपदाची अप्रतिष्ठा होऊ नये याची खबरदारी विद्यार्थी, प्राध्यापक, सामाजिक-राजकीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या संबंधित बाबींवर नियमानुसार तसेच गुणवत्तेवर कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुलगुरूंनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. विद्यापीठाला सर्वोत्तम करण्यात त्यांनी आपले कौशल्य पणाला लावावे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कीर्तीला साजेसे कार्य डॉ. पांढरीपांडे यांनी करावे, हीच अपेक्षा.

Next Article

Recommended