आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर हार्वेस्टिंग : काळाची गरज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा कृषिप्रधान देश, त्यामुळे उपलब्ध पाण्यापैकी 74 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. 18 टक्के पाणी धरणात साठवून त्याद्वारे वीज निर्माण केली जाते. केवळ 8 टक्के पाणी घरगुती कामासाठी उपयोगात येते. 2030 मध्येच पाण्याची मागणी आज आहे त्यापेक्षा दुप्पट होईल. आजच्या जल दिनाच्या निमित्ताने हा खास लेख...

हिंदुस्थानात उन्हाळ्याचे आगमन झाले की पाण्यासाठी तगमग सुरू होते. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतात. आणि शहरी लोक आपल्या नळांकडे भकास दृष्टी लावून बसलेले असतात. दोन-तीन कळशा डोक्यावर ठेवून पाण्यासाठी वणवण करणा खेडूत महिला दिसू लागतात. भारतात दिवसाआड पाणी मिळणारी अनेक शहरे आहेत. दररोज पाणी आलेच तर 15 मिनिटे टिकते. आठवडाभर पाण्याची चातकासारखी वाट पाहणारी गावे काही क मी नाहीत. अनेक शहरांची तहान भागवण्यासाठी टँकरची दौड वाढत जाते. भारतातील सहस्रावधी खेड्यांनी नळ नावाची चीज अजून पाहिलेली नाही. आकाशातून केव्हा आणि किती पाणी येईल याचा नेम नसतो. त्याचबरोबर कोरड्या पडणा विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात एकंदर 593 जिल्हे आहेत. त्यापैकी 200 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये भूमिगत पाण्याची पातळी घटत चालली आहे. भावी काळात भारतासमोर पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करेल, हे सांगायला नकोच.
जगात जी काही जमीन आहे त्यापैकी फक्त 2.45 टक्के जमीन भारताकडे आहे, पण जगातील एकूण लोकसंख्येच्या 16 टक्के लोकसंख्या भारतात राहते. दरवर्षी भारतात 4000 अब्ज घनमीटर पाणी वरुणदेवता म्हणजे पाऊस बहाल करते. त्यापैकी 1969 अब्ज घनमीटर पाणी नद्यांमधून वाहते आणि 690 अब्ज घनमीटर पाण्याचा उपयोग केला जातो. याचा अर्थ 1179 अब्ज घनमीटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. भारतात 432 अब्ज घनमीटर पाणी भूमिगत असावे, असा अंदाज आहे. हे पाणी गृहीत धरले तर एकूण 1122 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते.
भारत हा कृषिप्रधान देश, त्यामुळे उपलब्ध पाण्यापैकी 74 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. 18 टक्के पाणी धरणात साठवून त्याद्वारे वीज निर्माण केली जाते. केवळ 8 टक्के पाणी घरगुती कामासाठी उपयोगात येते. भारताची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते आहे आणि लोकांचे राहणीमान ज्या प्रकारे बदलत आहे, त्यावरून 2030 मध्येच पाण्याची मागणी आज आहे त्यापेक्षा दुप्पट होईल.
भारतात पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडत नाही. सरासरी 10 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर असे प्रमाण आहे. सामान्यत: पावसाचा कालावधी सुमारे 3 महिने असतो, पण सतत 24 तास पाऊस फार क्वचित वेळा पडतो. 3 महिन्यांत सुमारे 100 तास इतकेच पावसाचे प्रमाण मर्यादित आहे, परंतु पाण्याची मागणी सलग पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवस असते. याचा अर्थ दरवर्षी सरासरी 91 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडतो. त्याच वेळी 4 कोटी हेक्टर आणि सरासरी 83 जिल्हे महापुरामुळे पाण्याखाली जातात. भारतात चेरापुंजी येथे प्रचंड पाऊस पडतो, पण साठवण्याची तेथे कोणतीच व्यवस्था नसल्याने तेथे उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागते.
भारतात दरवर्षी 1.8 कोटी बालके नव्याने जन्माला येतात. लोकसंख्येची वाढ अशीच होत राहिली, तर 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 1.65 अब्जाच्या घरात जाऊन पोहोचेल. अर्थात पाण्याची मागणी 634 अब्ज घनमीटरवरून 1447 अब्ज घनमीटरला स्पर्श करेल. त्यापैकी किमान 70 टक्के पाणी शेतीसाठी वापरावे लागेल. कारण अन्नधान्याचे उत्पन्न दुप्पट करावे लागेल. सध्या प्रतिवर्षी सुमारे 20 कोटी मेट्रिक टन धान्य उत्पादन केले जाते. 2050 मध्ये 45 कोटी धान्य उत्पादन झाले तरच सर्व जनतेचे पोषण करता येईल.
फार फार प्राचीन काळापासून भारतात जलसंग्रह करण्याची प्रथा आहे. गाव कितीही लहान किंवा मोठे असो, त्यामध्ये विहिरी, तळी आणि तलाव असायचेच. राजेही जनतेसाठी मोठमोठे तलाव आणि धरणे बांधत असत. त्या काळात बांधलेल्या बावड्या आणि पुष्करण्या आजही पाहायला मिळतात. विजयनगरच्या राजांनी बांधलेल्या पुष्करण्या पाहिल्या, तर आजही आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही. खुद्द जिजाबाईसाहेबांनी पर्वतीच्या खाली असलेल्या आंबिल ओढ्याला धरण बांधल्याची इतिहासात नोंद आहे. नानासाहेब पेशव्यांनी कात्रज येथील तलावाचे पाणी पुण्यात आणले होते.
पावसाच्या पाण्याचा संग्रह करून ठेवण्याच्या पद्धतीला ‘वॉटर हार्वेस्टिंग’ असे नाव आहे. नवी इमारत बांधताना पावसाचे पाणी संग्रहित करण्याची सोय केली पाहिजे, असा नियम हळूहळू अनेक मोठ्या शहरांत अमलात येत आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा तुटवडा ब-यापैकी कमी होऊ शकेल आणि पाण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही. आता शहरोशहरी मोठमोठे सहनिवास उभे राहिले आहेत. त्यातील प्रत्येक इमारतीला गच्ची (टेरेस) असते. वर्षा ऋतूमध्ये इमारतीच्या गच्चीचा उपयोग करून भरपूर पाण्याचा संग्रह करता येईल. एका उदाहरणावरून ही गोष्ट स्पष्ट होईल.
समजा, एका इमारतीची गच्ची 16 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे. या गच्चीचे क्षेत्रफळ 16 गुणिले 6 = 96 चौरस मीटर होईल. वर्षाऋतूत एखाद्या दिवशी 50 मिलिमीटर किंवा 5 सेंटिमीटर पाऊस पडला, तर त्या दिवशी गच्चीमध्ये 96 गुणिले 0.05 घनमीटर = 4.8 घनमीटर पाणी जमा होईल. हे सर्व पाणी जमिनीखालील टाकीत संग्रहित करता येईल. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर पाणी. याचा अर्थ त्या दिवशी 4.8 गुणिले 1000 = 4800 लिटर पाणी टाकीत जमा करता येईल. घरामध्ये ज्या ज्या कामासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी स्वतंत्र नळांची व्यवस्था करून हे पाणी वापरता येईल. त्यामध्ये टॉयलेट फ्लश, बेसिन, भांड्यांची साफसफाई, कपड्यांची धुलाई अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. अन्न शिजवणे, पिण्यासाठी आणि स्नान करण्यासाठीच केवळ नगरपालिकेच्या पाण्याचा उपयोग केला तर सार्वजनिक पाण्याची पुष्कळ बचत होईल.
पाण्याचा संग्रह करण्यासाठी पीव्हीसी पाइप्स, फिल्टर, टाकी आणि पंप इतक्या माफक गोष्टींची अवश्यकता आहे. वॉटर हार्वेस्टिंगसाठी गच्चीत पडणारे पाणी पाइपच्या साह्याने जमिनीपर्यंत आणण्यात येते. हे पाणी फिल्टरमधून टाकीत सोडण्यात येते. प्रत्यक्षात गच्चीची लांबी, रुंदी, इमारतीच्या बाजूला, पण कंपाउंडच्या आत उपलब्ध असलेली जागा या दोन गोष्टींवर किती पाणी संग्रहित करता येईल ही गोष्ट अवलंबून आहे. बंगला असल्यास गच्चीचे क्षेत्रफळ कमी असेल; पण बंगल्यात राहणा-या एकंदर माणसांची संख्याही जास्त असणार नाही. तसेच घराचे छप्पर उतरते किंवा कौलारू असले तरीही वरील पद्धतीने पाण्याचा संग्रह करता येईल.
(‘याला जीवन ऐसे नाव’ प्रकाशक : राजहंस प्रकाशन या पुस्तकावरून साभार)