‘शिरपूर पॅटर्न’वरील चर्चेच्या / ‘शिरपूर पॅटर्न’वरील चर्चेच्या निमित्ताने...

कुमार शिराळकर

Jun 03,2013 11:21:00 PM IST

भूगर्भशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तंत्रआधारित जलसंधारण कार्यक्रम अमलात आणला आहे. या पद्धतीचे जलसंधारण प्रकल्प महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणीदेखील अमलात आणले जात आहेत. खानापूरकर यांनी प्रथम शिरपूर येथे अशा प्रकल्पाला सुरुवात केली. आमदार अमरीश पटेल यांनी या प्रकल्पाकरिता लागणारा निधी सढळ हस्ते दिला. शिरपूरच्या सूतगिरणीतून मिळणारा नफा, आमदार निधी इत्यादींमधून या प्रकल्पाला भरघोस साहाय्य केल्याचे समजते. खानापूरकरांनी तरुणांचा एक गट तयार केला. या तरुणांपैकी काही जण भूगर्भविज्ञानाचे पदवीधर, अभियंते, जेसीबीचालक, ट्रॅक्टरचालक इ. आहेत. गेली सहा-सात वर्षे अतिशय कष्टपूर्वक, उन्हातान्हात, रात्रंदिवस परिश्रम घेऊन या कोरडवाहू परिसराचा कायापालट करण्याचा जिद्दीचा उपक्रम त्यांनी राबवला आहे. या तालुक्यातील चाळीसपेक्षा अधिक गावांच्या शिवारांतील क्षेत्राला त्याचा लाभ मिळत असल्याने या पद्धतीच्या तंत्रआधारित जलसंधारण कार्यक्रमाला ‘शिरपूर पॅटर्न’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. ज्यांनी शिरपूर तालुक्यात सुरू असलेले हे काम प्रत्यक्ष पाहिले आहे ते प्रथमदर्शनीच भारावून गेले आहेत. विशेषत: अवर्षणग्रस्त भागातील जलसंकटाची कमालीची झळ ज्यांनी सोसली आहे अशा माणसांना, ऐन कडक उन्हाळ्यात ओढ्या-नाल्यातील डोहात साठलेल्या पाण्याचा तुडुंब साठा बघून आणि आसपासच्या रानातील फुललेली बागायती पिके पाहून ‘शिरपूर पॅटर्न’ हर्षचकित केल्याखेरीज राहत नाही.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिरपूर येथे घेतलेल्या पाणी परिषदेच्या दरम्यान मुद्दाम वेळ देऊन खानापूरकरांच्या बरोबरीने अधिकार्‍यांच्या ताफ्यासह फेरफटका मारला. हा ‘पॅटर्न’ काय आहे ते खानापूरकरांच्याकडूनच लक्षपूर्वक ऐकले. त्यानंतर परिषदेत जाहीर केले की, राज्यातील दहा तालुक्यांत कोट्यवधी रुपये देऊन हा पॅटर्न राबवला जाईल.

खानापूरकर भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या भूस्तर रचनांची उपलब्ध माहिती समोर ठेवून, दुष्काळाचे व महापुराचे थैमान कायमचे नष्ट करण्याकरिता असे ठाम प्रतिपादन केले आहे की, शिरपूरला जे शक्य करून दाखवले ते सगळीकडेच करता येऊ शकेल. राज्यातील सगळे ओढे आणि नाले रुंद आणि खोल करून दर तीनशे ते चारशे मीटर अंतरावर सांडवा नसलेले आणि दरवाजे नसलेले पक्के सिमेंटचे बांध बांधायला हवेत. नाल्या-ओढ्यात साचलेल्या आणि साठून पक्क्या झालेल्या पदार्थांना (गाळ, वाळू, मुरूम, गोटे, दगड, खडक, पाषाण इ.) खोदून काढून त्यांचा योग्य तो वापर आजूबाजूच्या शेतांसाठी आणि रस्ते बांधणीकरिता करायला हवा. असे केल्याने नाल्या-ओढ्यांत खोदलेल्या खड्ड्यांच्या दोन्ही बाजूंना (आणि काही ठिकाणी तळालाही) असलेले (खड्डे खोदण्यापूर्वी बुजले गेलेले) भूस्तर मोकळे होतील. पृष्ठभागावरच्या मातीच्या थरांखाली असणारे विविध प्रकारचे स्तर (काळी माती, कच्चा मुरूम, रेती, बारीक वाळू, मोठी वाळू, पिवळी माती, पांढरी माती, मांजर्‍या, भेगाळलेले खडक इत्यादी) दिसू लागतील. या स्तरापैकी जे पाणी मुरवण्यास/जिरवण्यास उपयुक्त असतील ते उघडे झाल्यामुळे आता खड्ड्यांत पाणी साचले तर ते त्यातून मुरू/जिरू लागेल. पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी नाल्या-ओढ्यांतून वाहताना, या सिमेंट बंधार्‍यामागचे हे सर्व रुंद-खोल डोह पाण्याने तुडुंब भरतील. हे साठलेले डोहातले पाणी जलदाबामुळे आजूबाजूच्या (आणि तळाच्या) सच्छिद्र आणि पायर्‍या स्तरातून झिरपेल. याच्या परिणामी ओढ्यापासून दोन्ही बाजूंच्या एक-एक किलोमीटर परिसरातील विहिरी आणि बोअरमधील पाण्याची पातळी वाढेल. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दरवाजे व सांडवे नसलेले सिमेंटचे पक्के बांध पाणी साठवून ठेवायला सुरुवात करतील. एकदा का डोह भरले की मग नंतर पडणार्‍या पावसाचे पाणी बंधार्‍यावरून ओसंडून वाहत पुढे नद्यांना जाऊन मिळेल.
शिरपूर तालुक्यात खानापूरकरांनी ओढे-नाले जेथून उगम पावतात त्या डोंगर-टेकड्यांच्या पायथ्यापासून पुढे दक्षिणेकडे तापी नदीच्या पात्राच्या दिशेने अशा डोह-बांध रचना जेसीबी आणि ट्रॅक्टरसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करून तयार केल्या आहेत. त्याशिवाय धरणाचे गाळीव पाणी वापरून मृत विहिरींचे आणि बोअरचे पुनर्भरण केले आहे. या विहिरींचे पुनर्भरण केल्यामुळे अर्थातच हे पुनर्भरणाचे पाणी सच्छिद्र्र आणि पार्य भूस्तरांतून आजूबाजूला पाझरत गेले आहे.
शिरपूर पॅटर्नचे अध्ययन करून त्याबाबत अहवाल सादर करण्याकरिता काही वर्षांपूर्वी शासनाने भूगर्भ वैज्ञानिक (दिवंगत) मुकुंद घारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आयोजित केली होती, असे सांगितले जाते. या समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालात या उपक्रमासंबंधी आक्षेप नोंदवलेले आहेत. हा अहवाल मिळावा म्हणून मी जे प्रयत्न केले त्याला यश आले नाही. त्यामुळे नेमके कोणते आक्षेप घेतले गेलेत ते समजले नाही. शिरपूर पॅटर्न सृष्टीशाश्वततेच्या दृष्टीने अतिशय घातक (Ecologically disastrous) आहे, अशी धारदार परखड टिप्पणी एका प्रख्यात जलभूगर्भ वैज्ञानिकाने केली आहे. या वैज्ञानिकांच्या संस्थेने भारतातील अनेक राज्यांत (कर्नाटकपासून नागालँडपर्यंत आणि अर्थातच महाराष्ट्रात) भूस्तरांचा आणि भूगर्भातील जलस्रोत-प्रवाहांचा काटेकोर वैज्ञानिक पद्धतींचा जास्तीत जास्त उपयोग करून मृद-जलसंधारणासाठी रचना उभ्या करण्याकरिता व्यावहारिक यशस्वी मार्गदर्शन केले आहे. शिरपूर पॅटर्नविषयी त्यांचे म्हणणे असे की, नाले-ओढे अशा पद्धतीने रुंद व खोल करून जे काही केले जात आहे ते म्हणजे ओढ्या-नाल्यांत विहिरी खोदणेच आहे. कोणत्याही पाणलोट क्षेत्राचा विचार करताना त्या क्षेत्रातील सर्वात खालचा तळ म्हणजे नदी, नाले किंवा ओढेच असतात. पाणी नेहमी समपातळीत वाहते असे आपण म्हणतो, ते खोटे नाही, पण पृथ्वीचा पृष्ठभाग बिंदू-बिंदूवर उंच-सखल आहे. त्यामुळे मुख्यत: नैसर्गिकरीत्या गुरुत्वाकर्षणामुळे (वक्रनलिका आणि केशाकर्षण बाजूला ठेवा) ते उताराच्या दिशेनेच वाहते. ज्या पर्वत-डोंगर-टेकड्यांच्या उंच भागातून हे नाले-ओढे उगम पावतात त्या डोंगर-टेकड्यांच्या माथ्यावर पडणारे पाणी जसे या नाल्या-ओढ्यात येते तसेच या नाल्या-ओढ्यांना मिळणार्‍या अन्य ओहोळांचे नैसर्गिक चरांचे पाणी देखील येते. इतकेच नव्हे तर या नाल्या-ओढ्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर पडणारे पाणी, त्या जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाल्यावर/थांबल्यावर उताराच्या दिशेने वाहत या नाल्या-ओढ्यांनाच येऊन मिळते. म्हणजे ओढे-नाले त्या त्या पाणलोट क्षेत्रातले लोटून आलेले पाणी स्वत:च्या पोटात (किंवा उथळ असल्यास पोटावर) घेत असतात. कारण ते सर्वात खालच्या तळाच्या उतारावर असतात.
(उत्तरार्ध उद्याच्या अंकात)
[email protected]

X
COMMENT