आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिकीकरण आणि देशीवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनिक फीचर्स’तर्फे वेबसाइटवर भरवण्यात येणा-या तिस-या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन 20 मार्च 2013 रोजी मुंबईत होत आहे. या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जागतिकीकरण व देशीवाद यांच्यातील परस्परसंबंधांबाबत आणि आजकालच्या मराठी साहित्याबद्दल व्यक्त केलेले विचार...

सुरुवातीलाच मराठी आणि उर्वरित भारतीय भाषांच्या संदर्भात जागतिक साहित्यातल्या संदर्भांना आपण पुसटसा जरी स्पर्श केला तरी आपल्याला आपल्या साहित्यविषयक बोलण्याचं भान येईल. मी अनेक वर्षे जागतिक साहित्य शिकवत आलो, भारतीय साहित्याचा एक पेपरही मला शिकवावा लागत होता आणि मराठी साहित्य हा माझ्या आवडीचा विषय आहे. याशिवाय मी लिहितो आणि मुख्य म्हणजे अगदी अलीकडच्या साहित्यापर्यंत वाचत असतो. हे सर्व पाहून मला असं वाटतं की, मराठीत लिहिणं, वाचणं आणि मराठीत असणं ही एक चांगल्या भाग्याची गोष्ट आहे. कारण, अशी व्हायब्रंट वाङ्मयीन संस्कृती जगातल्या फार थोड्या भाषांमध्ये आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन यांच्याइतकी आपली वाङ्मयीन संस्कृती जागरूक नसली तरी आफ्रिका, मध्यपूर्वेतील देश किंवा चीन यांच्या तुलनेत आपली वाङ्मयीन परंपरा अतिशय जागरूक असल्याचं दिसतं. याचं कारण आपल्याकडे पहिल्यापासून सगळ्या क्षेत्रांतल्या लोकांनी साहित्यात योगदान दिलेलं आहे. चोखामेळा, नामदेव शिंपी यांच्यापासून ते आताचे लक्ष्मण गायकवाड, अशोक पवार यांच्यापर्यंत असं विविध सामाजिक गटांमधल्या लोकांचं योगदान मराठी साहित्यात राहिलेलं आहे. अशी परंपरा जगात क्वचितच पाहायला मिळते.
मराठीत विविध पातळ्यांवरच्या लोकांचं जगणं साहित्यात येत असल्याचं जरी आपण म्हटलं तरी ज्या प्रमाणात परिघावरचं लेखन केंद्रस्थानी यायला हवं, तितक्या प्रमाणात ते येत नाही. उदाहरणार्थ, नामदेव शिंप्यासारख्या महत्त्वाच्या लेखकाला तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या प्रमाणात वारकरी संप्रदायात महत्त्व नाही. सबंध हिंदुस्थानात फिरून क्रांतिकारी भूमिका घेणारा असा हा मोठा माणूस, पण त्याचं साहित्य वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी येत नाही. याला काही समाजशास्त्रीय कारणं असतील, पण एक साहित्यिक म्हणून मला वाटतं की, असं व्हायला नको.

दोष काढण्याची सुरुवात करायची तर आम्ही 1960च्या दशकात लिहायला लागलो तेव्हापासून करता येईल. आम्ही लिट्ल मॅगझिन्स काढली साधारण 61 सालापासून. दहा वर्षांनंतर आम्ही आमचा अनियतकालिकांचा उपक्रम थांबवला, कारण आमच्या असं लक्षात आलं की, त्यांची आता गरज उरलेली नाही. कारण, आम्हाला जे करायचं होतं ते इतर प्रकाशन संस्थांनी, मासिकांनी स्वत:हून जोरात करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, आम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा ‘सत्यकथा’ या प्रस्थापित मासिकात तेच तेच लोक, तेच तेच अनुभव असं फार असायचं, पण दहा वर्षांत त्यांनी घूमजाव करून विदर्भापासून विविध प्रांतांमधल्या लोकांचं साहित्य एकत्र आणून आपलं स्वरूप बदललं. यात आमच्या योगदानापेक्षा सत्यकथेच्या प्रकाशकांचं मोठेपण होतं, असंच म्हणायला पाहिजे. पण एकदा आधीची बैठक बदलली की ती संस्था नामशेषच होण्याची शक्यता असते. तसंच सत्यकथेचंही झालं आणि पुढे ते मासिक बंद पडलं, पण नंतर निघालेल्या अनेक मासिकांनी, प्रकाशकांनी अधिक खुला दृष्टिकोन आत्मसात केला. उदाहरणार्थ, पहिली दलित आत्मकथा पुण्यातल्या जोश्यांनी प्रकाशित केली. तिच्या प्रकाशनासाठी कोणाला प्रस्थापित व्यवस्थेशी भांडावं लागलं नाही.

साधारण 1975-80च्या दरम्यान मला देशीवादाच्या संकल्पनेचं महत्त्व जाणवलं. खरं तर त्या आधी आमचे वाङ्मयीन स्रोत म्हणून ज्या परंपरांचा उल्लेख केला त्या देशीच होत्या, पण जागतिकीकरणाच्या जाणिवेतूनच देशीवादाचा जन्म झाला. आपण आपल्या गोष्टी गमावतोय, या जाणिवेतून देशीवाद तयार झाला. आपल्या गोष्टी सुंदर आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली ग्रामसंस्था होती, ती सुंदर पद्धतीची होती, तिच्यात अंतर्गत सुधारणा करणं शक्य होतं, पण सगळ्याच समाजाकडून आक्रस्ताळे निर्णय झाले. अगदी संतमंडळी असतील, आंबेडकरी चळवळ किंवा शेतकरी चळवळीनेही आधीचं टाकाऊ होत चाललंय आणि आपल्याला काही तरी नवीन ‘सेक्युलर’ आणावं लागेल, अशी भूमिका घेतली. खेडी सोडून शहरांकडे जावं लागेल, असं त्यांचं म्हणणं होतं. या पार्श्वभूमीवर देशीवादाची जाणीव तयार झाली.

सिमल्यातल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज्’मध्ये मी देशीवादासंबंधी दिलेल्या चार भाषणांचं इंग्रजी पुस्तक त्याच संस्थेनं काढलंय. त्या पुस्तकाचाही मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाल्याचं दिसतंय. अनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमाला लावलं गेलंय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये ते राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलंय. याचं कारण असं की, नष्ट होत असलेल्या गोष्टी किमान आपल्या जाणिवांमध्ये जागृत ठेवाव्या असं लोकांना वाटत असतं, त्यामुळे जागतिकीकरण वाढत जाईल तितका देशीवादाचा स्वीकारही वाढत जाईल. देशीवादाची व्याख्या अशी आहे की, तुमचा जो भौगोलिक परिसर असेल त्याच्यावर प्रेम करा, त्यात वनस्पती असतील, आजूबाजूला वाढीला लागलेल्या अनेक गोष्टी असतील. अगदी शेंदूर लावलेलं एखादं देऊळ असेल तर तेही या परिसरात आलं, त्यामुळे त्यावरही प्रेम केलं पाहिजे, कारण ते आता एक भौगोलिक भाग झालेलं आहे, केवळ धार्मिक वास्तू उरलेलं नाही.

जातिव्यवस्था मोडणं शक्य नाही, कारण आपली व्यवस्थाच तशी आहे. आपल्याला आपली आयडेंटिटी लागते. तरीही आपल्या देशात जास्तीत जास्त जेनेटिक सरमिसळ आहे. हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आलं की, आदिवासींपासून सर्व जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत आलेत आणि ‘शुद्ध’ आर्य असं काही सापडलेलं नाही. ही वृत्ती मधल्या काळात मात्र गेली, त्यामुळे संघटित पातळीवरची धार्मिक, जातीय आणि पितृसत्ताक व्यवस्था निर्माण झाली. अगदी हिंदुत्ववाद घेतला तरी तो ब्रिटिश साम्राज्यवादानंतर आला. त्यापूर्वी तसलं काही नव्हतं. पूर्वी वारकरी मंडळी असतील किंवा सुफी परंपरेतही सगळ्या धर्मांना सहभागी होण्याचं स्वातंत्र्य होतं. त्यामुळे हिंदुत्ववाद हाच मुळात देशी नाही, असं मग सिद्ध होतं. देशीवाद म्हणजे भौगोलिक परिसर निश्चित करून भूसांस्कृतिक विचार करणं. देशीवाद आणि देशीपण यांतला फरकही समजून घ्यायला पाहिजे. आधी जे उदाहरण दिलं शिंगडोबाला नमस्कार करण्याचं, ते त्यामागचं कारण समजून घेऊन केलं तर तो देशीवाद झाला, अन्यथा ते केवळ देशीपण झालं. परंपरा समजून घेऊन ती जाणिवेत उतरवणं म्हणजे देशीवाद. केवळ आपलं आहे म्हणून तसंच केलं पाहिजे, असा आग्रहच करत राहिलं तर त्यात यश येऊ शकत नाही. जागतिकीकरण वाढणार तसा देशीवाद वाढणार, हे निश्चित. एका अर्थी, पूर्वग्रह न ठेवता भूमिका घ्यायची तर जागतिकीकरण आणि देशीवाद हे एकमेकांना पूरकच आहेत, असं म्हणता येईल. म्हणजे आम्हाला जागतिकीकरणाला विरोध करायचा नाही, तर आमचं जे सुंदर आहे ते टिकवायचंय म्हणून देशीवाद महत्त्वाचा.