आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाचे आमिष आणि लैंगिक शोषण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीचे लैंगिक शोषण हे अनादी कालापासून सुरू आहे. त्यावर अनंत लिखाणही केले गेले. असंख्य खटले चालले. तरीही अजून हे घडतच आहे. किती कायदे केले तरीही मुली व स्त्रिया अजूनही पुरुषी वासनेला बळी पडत आहेत हे सामाजिक वास्तव आहे. समाजमनावर आपल्या न्यायालयीन निर्णयांचा दूरगामी परिणाम होत असतो म्हणूनच प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला जावा व त्याचा आपण विचारही (शक्य असल्यास) करायला हवा. काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील एका केसमध्ये लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यास वाग्दत्त वधूस युवकाने प्रवृत्त केले व नंतर लग्न केलेच नाही. म्हणून त्या मुलीने बलात्काराचा खटला दाखल केला मात्र त्यात न्यायालयाने आरोपीला निव्वळ मुलीची संमती गृहीत धरत निर्दोष मानले व आरोपीची सुटका झाली. मात्र दिल्लीमध्ये अशाच एका खटल्यामध्ये न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत निर्णय दिला. या प्रकरणात लग्न ठरले. साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलाने लैंगिक संबंधांसाठी मुलीवर बळजबरी केली, मात्र कालांतराने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणाच्या खटल्यामध्ये मात्र न्यायालयाच्या निर्णयनुसार त्या मुलाला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. मुळात स्त्रियांवरील बलात्काराच्या संदर्भात वेगवेगळ्या घटना समोर येतात. त्या अनेक घटनांमधील परिस्थिती निरनिराळी असली तरी स्त्रीची हतबलता मात्र सारखीच असते.
अशीच आणखी एक घटना बघूया. यामध्ये एका मुलाने मुलीला लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले व नंतर लग्नास नकार दिला. मात्र तिने बलात्काराची केस दाखल केल्यावर संतोष (नाव बदलले आहे) या मुलाने तिच्याशी लग्न केले. त्या प्रकरणामध्ये बलात्काराच्या आरोपातून तो मुलगा तर सुटलाच, पण त्याने या मुलीच्या नकळत दुसºया मुलीलाही लग्नाचे खोटे वचन दिले. तिचेदेखील शोषण केले आणि हुंड्यासाठी छळून लग्न करण्यास नकार दिला. ही परिस्थिती पहिल्या पत्नीने ठोकलेल्या दाव्यात पुढे आली होती. त्याची दखल घेऊन या प्रकरणात दुसºया मुलीने बलात्काराची केस त्या आरोपी मुलावर टाकावी असे सुचवण्यात आले तेही खुद्द न्यायाधीशांद्वारे. वरील तीनही प्रकरणांचे विश्लेषण करताना हे जाणवले की स्त्रियांचा गैरफायदा खूप सहजतेने घेतला जातो. मुलींकडे बघण्याचा पुरुषप्रधान समाजाचा दृष्टिकोन जसा अयोग्य व संकुचित आहे तसेच मुलींची हतबलतादेखील तितकीच अयोग्य आहे. मुलींचे विवाह ठरल्यानंतर काही वेळेस त्या अत्यंत घायकुतीला येऊन वागतात. या स्थितीवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. खरे तर लग्न ठरल्यावर शारीरिक जवळीक निर्माण होणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण त्यात संयम बाळगणे हेदेखील महत्त्वाचे असते. अनेकदा यादरम्यान मुलांकडून शारीरिक सुखाची मागणी केली जाते व त्या वेळी नाही म्हणणे मुलीला अत्यंत जड जाते.
एकीकडे शारीरिक ओढ, तर दुसरीकडे त्याला नाही म्हटले तर मला हा सोडून देईल का ही भीती आणि तिसरीकडे लग्न ही एक अत्यंत महत्त्वाची व मुलीचाच नव्हे तर तिच्या पित्याच्याही कुटुंबाचा समाजातील दर्जा ठरवणारा एक नाजूक विषय असतो. त्यातून मग ‘नाही कशी म्हणू तुला’ ही मन:स्थिती निर्माण होते. अशा पद्धतीने बळजबरी करून कालांतराने लग्नाला नकार देणारे महाभाग आपल्याकडे भरपूर असतात. कदाचित शरीरसुख मिळवण्याचा तो एक राजमार्ग आहे असे भयानक वास्तव समोर येतेय. लग्न मोडण्याची भीती इतकी जबरदस्त असते की कितीही सुशील मुलगी असली तरीही लग्न ज्याच्याशी ठरले त्याच्या मागणीला नकार देणे तिला कठीण जाते. लग्न न करता, लग्नाचे आमिष, फसवी आश्वासने देऊन मुलींचे लैंगिक शोषण होत असेल तर त्याकडे बलात्कार म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. त्यामधून सुटण्यासाठी म्हणून जर लग्न केले जात असेल तर अशा लग्नासाठी मुलींनी खरेच तयार व्हावे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर मुलींनी जरूर विचार करावा.
swatidharmadhikarinagpur@gmail.com