आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा नवा डाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला फारसे यश न मिळालेल्या भाजप-शिवसेना युतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे युतीचा हात करून नवा डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेसारखा तगडा साथीदार मिळाल्याने युतीची स्थिती मजबूत झाली आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या वेळी शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात प्रभावी कामगिरी केलेल्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ग्रामिणविकास मंत्री जयंत पाटील यांना रिंगणात उतरवण्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गेल्यावेळी निवेदिता माने यांचा पराभव करून राष्ट्रवादीला जबर धक्का दिला होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या दोन्ही मतदारसंघांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व असतानाही, त्यांनी आपली सारी ताकद पणाला लावली असतानाही निवेदिता माने यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी येथून जयंत पाटील यांनाच लढवण्याचा डाव राष्ट्रवादीने टाकला आहे.

वास्तवीक राजू शेट्टी यांची गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाबरोबरच सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाच्या निमित्ताने ताकद वाढली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनाही ही निवडणूक सोपी जाणार नाही. त्यातच गोपीनाथ मुंडे यांनी इस्लामपूर या जयंत पाटील यांच्या गावात येऊन राजू शेट्टींना महायुतीचे बळ देण्याचा शब्द दिल्याने शेट्टी यांचे पारडे आणखी जड झाले आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीत भाजप - सेनेला स्वाभिमानीचे बळ मिळणार आहे. भाजपचे हे बेरजेचे राजकारण कितपत चालणार हे विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होईल.