आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिकता म्हणजे नक्की काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील अत्यंत महत्त्वाचे शहर. युरोप व आशियाला जोडणारे फक्त भौगोलिक शहर नसून युरोपियन व आशियाई संस्कृती, ख्रिश्चन व इस्लाम संस्कृती त्याचबरोबर युरोपियन धर्मनिरपेक्षता व आशियाई धर्मपरंपरा, आधुनिक व्यवस्थापन पद्धती व पारंपरिक पद्धती अशा अनेक विरोधाभासाने नटलेला देश म्हणजे तुर्कस्तान. या विविधतेने नटलेले व सतत सांस्कृतिक व राजकीय संघर्षात असलेले शहर म्हणजे इस्तूंबल किंवा पूर्वीचे कॉन्स्टॅटिनोपल.


युरोपियन देश एकत्र येऊन युरोपियन सामुदायिक बाजारपेठ झाल्यापासून तुर्कस्तानचा प्रयत्न या समुदायाचा भाग होण्याचा प्रयत्न आहे. या समुदायात भाग घेता यावा म्हणून लोकशाही प्रथा, परंपरा व मानवी हक्कासंदर्भात अनेक बदल या राष्‍ट्रात घडवून आणले गेले. सर्व युरोपियन राष्‍ट्र ख्रिश्चन वा धर्मनिरपेक्ष, तर तुर्कस्तान हा बहुसंख्य इस्लाम धार्मिक, परंतु तरीही धर्मनिरपेक्ष! परंतु आज जगात सांस्कृतिक संघर्ष विशेषत: ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम असा पाहण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे तुर्कस्तानच्या युरोपियन समुदायाचा भाग होण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे व संघर्ष चालू आहे.


इस्लाम व लोकशाही एकत्र नांदू शकत नाही, इस्लाम, धर्मनिरपेक्षता व लोकशाही तर एकत्र येऊच शकत नाही असा प्रचार सर्वत्र असतो. या प्रचाराला छेद देणार देश म्हणजे तुर्कस्तान! त्यामुळे आज सर्व अरब व इस्लामी देशांत प्रचंड उलथापालथ होत असताना तुर्कस्तान हे आधुनिकतेचे, लोकशाहीचे मॉडेल म्हणून उभे राहत आहे.


मुस्लिम परंपरेप्रमाणे डोक्यावरून स्कार्फ घेणे हा अत्यंत वादग्रस्त व राजकारणाचा मुद्दा झाला आहे. ओरान पामुक या नोबेल पारितोषिक विजेत्या तुर्क साहित्यकाराने या संघर्षावर एक कादंबरीच लिहिली आहे. ‘स्नो’ या कादंबरीचे नाव, जी भारतीयांनी वाचालयाच पाहिजे. म्हणजे आज आपल्याकडे हिंदुत्ववादी व धर्मनिरपेक्षवादी यांच्यात चालू असलेल्या संघर्षाचे सर्व पदर व पैलू ध्यानात येतील. 1980 पर्यंत हुकूमशहाच या देशावर राज्य करीत होते, त्यानंतर इस्लामिक परंपरांना महत्त्व देणारी, इस्तंबूलच्या बाहेरील शहरात व ग्रामीण भागात मूळ पसरलेली इस्लामिक पार्टी सत्तेवर आली. ती सेक्युलर घटना मानत नाही म्हणून सैन्याने ते सरकार बरखास्त केले, परंतु नाव बदलून तोच पक्ष पुन्हा सत्तेवर आला व गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने 50 टक्क्यांहून जास्त मते मिळवून हा पक्ष सत्तेवर आहे. अर्थात या पक्षाला ही सार्वजनिक संस्था व सरकारी संस्थेत अद्याप स्कार्फ बंदीसारखे कायदे बदलण्यात यश मिळालेले नाही, परंतु सैन्याचे वर्चस्व कमी करून लोकशाही आणण्याचे श्रेय मात्र निश्चितच आहे. अ‍ॅरागॉदन या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने आजवर सर्व देशभर आपला पक्ष व प्रभाव कायम ठेवला आहे व त्याचबरोबर युरोपबरोबर संबंध वाढवून त्याच वेळेस अरब जगाबरोबर आणि इराणबरोबरही संबंध वाढवून आपल्या राजकीय परिपक्वतेचा परिचय दिला आहे. या पंतप्रधान व राष्‍ट्राध्यक्ष गुल अहमद यांची पत्नी या दोघी जाणीवपूर्वक सार्वजनिक सभेत डोक्याला स्कार्फ गुंडाळून, बदललेल्या इस्लामिक तुर्कस्तानची ओळख जाणीवपूर्वक करून देत असतात.


थोडक्यात, धर्मनिरपेक्षता व इस्लामी परंपरा लोकशाही व हुकूमशाही यांच्यातील सातत्याने होणारा संघर्ष व समन्वय यांच्या खुणा या देशांत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्तंबूल शहरात तास्किन चौकात गेल्या 80 वर्षांपासून असलेले छोटे उद्यान व सैन्याची छोटी छावणी पाडून त्या ठिकाणी आधुनिक मॉल उभे करण्याची सरकारची योजना जाहीर झाली व 60-80 पर्यावरणवाद्यांनी याला विरोध म्हणून धरणे धरले. या निदर्शकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केली त्याची दृश्ये पाहिल्यावर प्रचंड प्रमाणांत सर्व शहरांतून लोक जमले व मॉल विरुद्ध पर्यावरण हा संघर्ष पाहतापाहता आधुनिक, परंतु इस्लामिक असलेले लोक विरुद्ध लोकशाहीवादी परंतु इस्लामिक पारंपरिक पद्धतींचा आग्रह धरणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षात त्याचे रूपांतर झाले. पंतप्रधानांनी आधी दम देऊन आंदोलकांना परत जाण्यास सांगितले, नंतर आपल्या पक्षाला व राजवटीला समर्थन देणा-या हजारो लोकांचे मेळावे घेऊन इशाराही दिला. पोलिस पाठवून निदर्शकांना पांगवण्यात आले याला उत्तर म्हणून शांतपणे उभे राहून आपला विरोध नोंदवण्याचे आधुनिक व नावीन्यपूर्ण आंदोलन मॉलच्या विरोधी असलेल्या लोकांनी व विरोधी पक्षाच्या पाठीराख्यांनी सुरू केले आहे. हा संघर्ष अद्याप चालू आहे व तो इतर शहरांत पसरत आहे.


पंतप्रधानांनी मॉल रद्द करून त्या ठिकाणी म्युझियम बांधण्याचा निर्णय जाहीर करूनही निदर्शने थांबली नाहीत. त्यामुळे लोकशाही मार्गाने आमचा पराभव न करू शकणा-या शक्तीने हा खेळ चालू केल्याचा आरोप सत्ताधारी करीत आहेत, तर लोकशाहीच्या नावाखाली सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक परंपरावादी इस्लामिक पुनरुज्जीवनवादी शक्तीला मदत करून धर्मनिरपेक्षता व आधुनिकता नष्ट करीत असल्याचा आरोप निदर्शक व विशेषत: तरुण करीत आहेत.


सर्वसाधारणपणे अशी आंदोलने अर्थव्यवस्थेत मंदी होत असताना, बेरोजगारी वाढत असताना होतात, परंतु तुर्की अर्थव्यवस्था आज तरी मजबूत आहे व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीत वाढ दिसत आहे, त्यामुळे या अनपेक्षित संघर्षामुळे तज्ज्ञ मंडळी अचंबित झाली आहेत. जुन्याच पद्धतीने धार्मिक, सांस्कृतिक वा वांशिक पद्धतीने वा सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यातील संघर्ष म्हणून पाहिले जात आहे, परंतु वस्तुस्थिती यापेक्षा वेगळीच असल्याची लक्षणे आहेत. आज जगभर शहरीकरण म्हणजे अमेरिकन पद्धतीप्रमाणे मोठी बांधकामे, इमारती व रस्ते असे चित्र आहे. युरोपमध्येच अनेक शहरे वेगळी आहेत. परंपरा, जुन्या इमारतींचे रक्षण करून आधुनिक शहरे वाढवण्याचा युरोपियन राष्‍ट्रांचा प्रयत्न असतो.
हाच संघर्ष आज इस्तंबूलमध्ये आहे. यात विरोधाभास म्हणजे परंपरावादी इस्लामिक चेहरा असलेले सरकार मॉलला पाठिंबा देत आहे, तर आधुनिक, धर्मनिरपेक्ष चेहरा असलेले इस्लामिक तरुण मॉलला विरोध करीत आहेत. आधुनिकता व प्रगती म्हणजे नक्की काय, हा प्रश्न उभा करणारा हा इस्तंबूलचा संघर्ष आहे. तुर्कस्तानच्या सरहद्दीवर सिरियाचा तीव्र संघर्ष चालू आहे, याचेही पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका शहरातील छोट्याशा उद्यानाला वाचवण्याचे प्रयत्न विरुद्ध आधुनिक मॉल उभारण्याचा सरकारचा निर्णय, असा छोट्याशा मुद्द्यावर उभा झालेला संघर्ष आजच्या काळात दिसते तसे नसते किंवा जे दिसते त्यापेक्षा जास्त न दिसणारे असते, अशा आधुनिक जगाचा परिचय करून देत आहे.