आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला खडे बोल कधी सुनावणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारत आणि पाकिस्तानच्या ब्रिगेडिअर्सच्या ‘फ्लॅग मीटिंग’मुळे थोडी आशा वाटत होती, मात्र ती फलद्रूप झाली नाही. पाकिस्तानचा लष्करी प्रवक्ता आतापर्यंत जे बोलत आला त्याचीच पुनरावृत्ती पाकच्या ब्रिगेडिअरलाही करायची होती, तर फ्लॅग मीटिंग ठरवलीच कशासाठी? युद्धजन्य परिस्थितीत दिसून येणारा त्वेष आमच्या लष्करप्रमुख आणि वायुदलप्रमुखांच्या बोलण्यात दिसून आल्यामुळेच बहुधा ही मीटिंग बोलावण्यात आली असावी. पाक सरकारला भारतीयांच्या संतापाची थोडीफार कल्पना असेलच.

पाकिस्तानचे म्हणणे आहे की, भारताच्या दोन जवानांची हत्या कोणी, केव्हा आणि कोठे केली हे आम्हाला माहीत नाही. म्हणजे भारताने हा सर्व बनाव रचलाय का? हा धोकादायक खेळ खेळण्याची भारताला काय गरज आहे? भारत सरकार असे पाऊल कधीच उचलणार नाही. कारण ते आधीच अडचणीत आलेले आहे. ‘लोकपाल’, ‘काळा पैसा’ आणि ‘निर्भया’ यांसारख्या घटनांमुळे जनता इतकी भडकलेली आहे की, हे नवे संकट कशाला ओढवून घेईल? शिवाय हा भारत आहे. पाकिस्तान किंवा चीन नाही. सरकारचा प्रत्येक डाव उघड करण्याची क्षमता येथील पत्रकार व विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये नक्कीच आहे. जर नियंत्रण रेषेवर असे कृत्य सरकारने केले आहे, असा संशय जरी आला तर ते एक क्षणभरही सत्तेवर राहू शकणार नाही. त्यामुळे असा निंदनीय प्रकार भारताच्या माथी मारण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निरर्थक आहे.

पाकिस्तानचे सरकार मात्र या हत्येस अवश्य जबाबदार असू शकते. सरकार म्हणजे जरदारी सरकार नव्हे, तर खरे सरकार, म्हणजे लष्कर. पाकिस्तानचे लष्कर मोठ्या पेचात अडकलेले आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्करप्रमुख अश्फाक परवेज कयानी यांनी निवेदनात म्हटले होते की, पकिस्तानचा खरा शत्रू अंतस्थच आहे, बाहेर नव्हे! अंतस्थ म्हणजे पााकिस्तानात पसरलेला दशहतवाद हाच त्यांचा शत्रू आहे. मात्र, पाक लष्कराने एकाच आठवड्यात सगळे वातावरण बिघडवून टाकले.

याचा काय अर्थ लावावा? पाकचे सैन्य बेफाम आहे? लष्करप्रमुखाशिवाय अनेक दशहतवादी व धार्मिक घटकांचाही त्यावर गहिरा प्रभाव आहे? कयानी यांचे निवेदन बनावटी होते का? ते काहीही असले तरी पाकिस्तान भारताशी शत्रुत्वाचीच भावना बाळगतो हे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. तसे नसते तर, फ्लॅग मीटिंगमधून वेगळे काही निष्पन्न झाले असते. पाकिस्तानने जर आपली ‘चूक’ (गुन्हा) कबूल केली असती तर सद्भावनेचा पाया मजबूत झाला असता. भारताने संताप व्यक्त करूनही हे सर्व सहन केले असते, पण पाकिस्तानने त्याची चूक स्वीकारण्याऐवजी आपला नेहमीचा कुटिल डाव खेळला. त्याचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची चौकशी संयुक्त राष्‍ट्र संघाकडून करवून घ्यावी. म्हणजे आपणच आपल्या जखमेवर मीठ चोळून घ्यावे. मला अशी भीती वाटते की, हे सगळे नाटक कयानींचे ते वक्तव्य पुसून टाकण्यासाठी तर केले गेले नसेल? संयुक्त राष्‍ट्र संघात हा पेच नेऊन काश्मीर प्रश्नाचे गाडलेले मुडदे उकरण्याचा तर हा प्रकार नाही?

पाकिस्तानच्या परराष्‍ट्र धोरणाच्या नव्या अध्यायाचा हा आरंभही असू शकतो. तसे पाहता पाकिस्तानमध्ये परराष्‍ट्र धोरण नावाचा प्रकारच नाही. भारताबाबतच्या धोरणांनाच तो आपले परराष्‍ट्र धोरण म्हणतो. कारण तो भारत-भयाने ग्रस्त आहे. तिकडे वॉशिंग्टनमध्ये अफगाणचे राष्‍ट्र पती हमीद करझाई यांच्याशी बराक ओबामा अफगाण मोकळा करण्याविषयी पुन्हा पुन्हा बोलणी करत आहेत आणि तिकडे कयानी भारतावर काही गोष्टी लादत आहेत. मोकळा अफगाणिस्तान कोण भरणार? पाकिस्तान भरेल. तेथे प्रथम तालिबान्यांना पाठवेल. मग स्वत: जाऊन पोहोचेल. हे मनोराज्य पूर्ण होण्यात भारत हाच मोठा अडसर आहे. भारताने आपला माल, सैन्य आणि रसद पोहोचवण्यासाठी देलाराम ते जरंज रस्ता बनवला आहे. त्याला पाकिस्तानवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तो इराणमार्गे सहजतेने काबूलपर्यंत पोहोचू शकतो. हा धोका टाळण्याचा एक मार्ग दिसतो, काश्मीरचा तापलेला प्रश्न आहेच, त्याला ऐरणीवर घ्या. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सर्व आत्मघाती संघटनांना आतापासूनच काश्मीरमध्ये पाठवा. भारत संकटाच्या जाळ्यात इतका गुंतेल की, अफगाणिस्तानचा तो विचारही करू शकणार नाही.

आतापर्यंत मुंबई हल्ल्यासारख्या घटनांसाठी पाक लष्कर आणि सरकार गैरसरकारी घटकांच्या माथी दोषी असल्याचे भासवून हात झटकत होते; पण नियंत्रण रेषेवर झालेल्या या हत्याकांडासाठी लष्करच जबाबदार आहे. तसे पाहता, जगात कोठेही नियंत्रण रेषेवर छोट्या-मोठ्या चकमकी चालू असतात. त्यात जवान शहीदही होतात; पण या घटनेला वेगळाच वास येतो आहे.

आता काय केले पाहिजे? आपल्या देशातील प्रमुख नेत्यांची गुपचिळी सर्वांना धक्कादायक वाटते आहे. आपल्या सैन्यप्रमुखांची निवेदने वेगळीच भासत आहेत. कडक भाषेचा अर्थ युद्धाच्या इशा-या सारखा वाटत नाही. फक्त आपल्या जनतेच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा प्रकार आहे; पण त्यांनी तसे का करावे? ते ज्या स्थानावर आहेत, तेथे त्यांना जनतेने बसवले आहे का? अशा वेळी संयम बाळगणे आवश्यक आहे. पण ते तर अण्णा हजारेंचीच प्रतिकृती दिसत आहेत. एक जण युद्धाची भाषा बोलत आहे, तर दुसरा यावर मौन बाळगून आहे. देश हतबल झाल्यासारखा वाटतो आहे. यावरून असे लक्षात येते की, या मुद्द्यावर पाकिस्तानात जेवढी खळबळ माजली नाही तेवढी भारतात माजली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी मोठा लोकक्षोभ निर्माण केला आहे. तिकडे 120 शिया पंथीयांची झालेली हत्या आणि ताहीर-उल-कादरीची चळवळ चर्चेत आहे. संकटात सापडलेल्या पाकिस्तानी नेत्यांशी थेट बोलणी करण्याचे धाडस आमचे नेते का करत नाहीत? पाकिस्तानी नेत्यांच्या मनात आम्ही काही सहानुभूती निर्माण करू शकलो तर ते आपल्या लष्कराच्या नेत्यांशी काही तरी बोलतील. पुढाकार घेण्यास टाळाटाळ करण्याच्या या वृत्तीमुळे भारत-पाकमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास अडथळे येत आहेत. हे आपण ठणकावून सांगणार कधी?

(लेखक प्रख्यात राजकीय विचारवंत आहेत)