आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी डायना आजी होते तेव्हा... (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टन या राजेशाही दांपत्याला सरत्या आठवड्यात पुत्रप्राप्ती झाली. अवघ्या इंग्लंडभर राजेशाही थाटात नव्या राजपुत्राचे (जॉर्ज अलेक्झांडर लुइस) स्वागत झाले. पण केवळ इंग्लंडच कशाला, कॅनडासारख्या कॉमनवेल्थ देशातही जगप्रसिद्ध नायगरा धबधब्यावर रंगीबेरंगी प्रकाशकिरणांची उधळण करत पुत्रजन्माचा आनंद साजरा करण्यात आला. दूर कॅरेबियन बेटांत गस्तीवर असलेल्या ‘रॉयल नेव्ही शिप’वरील नौसैनिकांनी मिळून डेकवर 'Boy' अशा आकारात एकत्र येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ब्रिटिश टेलिकॉमच्या टॉवरवर ‘इट्स अ बॉय’ अशी ठसठशीत अक्षरे उमटली. लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलच्या बाहेर टोनी अ‍ॅपल्टन नामक स्वयंस्फूर्त ‘टाऊन क्रायर’ ऊर्फ शिरस्तेदाराने राजेशाही परंपरेला साजेशी राजपुत्र जन्माची हाळी दिली. थेम्स नदीच्या किनार्‍यावर वसलेले ‘लंडन आय’ नामक ‘जायंट व्हील’ लाल-निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या रोषणाईने उजळून निघाले. लंडन रिझर्व्ह आर्मीने 62 तोफांची सलामी दिली. राजपुत्राचे पिता प्रिन्स विल्यम्सचे अभीष्टचिंतन करण्यासाठी हर्षोल्हासित सामान्य ब्रिटिशांनी ब्रिडिंग्टन, यॉर्कशायर येथे एकच गर्दी केली. हे कमी की काय म्हणून तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी राजशिष्टाचार पाळत हा भाग्याचा क्षण आहे म्हणत विल्यम आणि केट दांपत्याचे जाहीर अभिनंदन केले आणि इकडे मुंबईत विल्यम्सच्या पित्याला म्हणजेच नवजात राजपुत्राच्या आजोबांना प्रिन्स चार्ल्सना भुरळ पाडलेल्या मुंबईच्या डबेवाल्या मित्रांनी एकमेकांना पेढे भरवून राजपुत्र जन्माचा आनंद साजरा केला. हे सगळे घडत असताना जगभरातला प्रिंट आणि टीव्ही मीडियासुद्धा सर्व तयारीनिशी या सोहळ्यात सामील झालेला दिसला, इतका The Sun या वृत्तपत्राने The Son असे एक दिवसापुरते स्वत:चे नामकरण करून राजेशाही कुटुंबाला अगदी कमरेतून लवून कुर्निसात केला. एक प्रकारे लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणार्‍या इंग्लंडच्या जनतेने राजेशाही घराण्याचे माहात्म्य कायम राखले. रुढी-परंपरेने चालत आलेला मानमरातब जपला आणि राजघराण्याशी असलेले भावनिक बंधही जपले. याला कुणी आधुनिक गुलामगिरीचे लक्षण मानो वा आचरटपणाचा कळस, पण प्रारंभापासूनच इंग्लंडच्या राजघराण्याचे महत्त्व ब्रिटिश समाजाच्या लेखी अनन्यसाधारण होते. म्हणूनच इंग्लंडमधील वृत्तपत्रांत ‘रॉयल कॉरस्पाँडंट’ नेमण्याची परंपरा रुजली. कालांतराने समाजमान्यसुद्धा झाली. त्याचमुळे राजघराण्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक लहानसहान घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या वृत्तपत्रीय कार्यपद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त होत गेली. परिणामी, राजघराण्याशी जोडले गेलेले कुतूहल शमवण्यास वा जागे ठेवण्यास जसे मीडियास यश आले तसेच याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनातले राजघराण्याचे अढळस्थानही कधी ढळले नाही. अर्थात, याच मीडियाने अनेक प्रसंगी राजघराण्यातील प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तींच्या खासगी आयुष्यात डोकावत सभ्यतेची हद्द ओलांडली आणि राणीच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या हीरकमहोत्सवी क्षणांचा ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रसार-प्रचारही केला. पण या सगळ्यात ब्रिटिश जनतेला राजघराण्याविषयी वाटणारे आकर्षण तसूभरही कमी झाले नाही की, राजघराण्याला जनतेने आपल्या मनातून कधी बेदखलही केले नाही. पण या राजपुत्र जन्माच्या सगळ्या धामधुमीत ‘प्राऊड फादर’ बनलेल्या विल्यम्सच्या आईची, जन्मलेल्या राजपुत्राच्या आजीची, म्हणजेच एकेकाळच्या ब्रिटिश जनतेच्या लाडक्या लेडी डायनाची जाणीवपूर्वक आठवण निघाल्याचे ऐकिवात आले नाही. अशा शुभप्रसंगी त्या कटू स्मृतींना कोण उजाळा देईल, असा सवालही काही जण येथे करतील. पण क्षणभर गृहीत धरले की, पॅरिसच्या टनेलमधून दोदी फायेदसह भरधाव कारने प्रवास करणारी डायना ‘पापाराझ्झी’च्या (दोदी फायेदच्या वडिलांनी - अल फायेद यांनी डायना-दोदीचा अपघाती मृत्यू नसून त्या वेळचे इंग्लंडचे पंतप्रधान गुप्तचर संघटना एम-15, 16 आणि इंग्लंडचे त्या वेळचे फ्रान्समधील राजदूत यांनी राजघराण्याच्या सांगण्यावरून कारस्थान रचून घडवून आणलेला खून आहे, असा आरोप करून 2008 मध्ये खळबळ माजवली होती हा भाग निराळा.) दुष्टाव्याला बळी पडली नसती तर या क्षणी वयाने 52 वर्षांची असती. पण मग प्रिन्स चार्ल्सपासून कधीच विभक्त झालेल्या डायनाने आपल्या नातवाच्या आगमनाचे स्वागत कसे केले असते? आपण आजी झाल्याचा आनंद कशा प्रकारे व्यक्त केला असता? राजघराण्याने बेदखल केलेल्या डायनाच्या आनंदाची इतक्याच उत्साहात दखल घेतली गेली असती? मुलाऐवजी मुलगी जन्माला आली असती तर तिला अधिक आनंद झाला असता? सर्वांसमक्ष ती आपल्या नातवाला प्रेमभराने छातीशी कवटाळू शकली असती? की राजघराण्यापासून दुरावल्यामुळे दुरूनच डबडबल्या नेत्रांनी तिला हा सोहळा अनुभवावा लागला असता ? डायना जिवंत असतीच तर या घटनेने भावुक होऊन अधिक जोमाने तिने इथिओपिया, सोमालिया वा हैतीमधील शोषित, पीडित मुलांसाठी आयुष्य वेचले असते. अधिक प्रेमभराने उपेक्षितांना छातीशी कवटाळले असते. पण डायनाला झालेला आनंद ब्रिटिश जनता आणि मीडियापर्यंत सहजी पोहोचला असता? अर्थात, यातील काहीही घडले असते तरीही आजी झाल्याचा तिला वाटणारा अभिमान कुणालाही हिरावून घेता आला नसता! अगदी ब्रिटनच्या राजघराण्यालासुद्धा! एरवी शिष्टाचारात अन् त्यातही राजशिष्टाचारात भावनेला मोल असते का? मग कशी निघावी डायनाची आठवण? पण कुणी सांगावे, जन्माला आलेल्या राजपुत्राला छातीशी कवटाळताना प्रिन्स विल्यम्सच्या डोळ्यांतून ओघळलेल्या आनंदाश्रूंमधला एक थेंब हयात नसलेल्या आपल्या आईच्या म्हणजेच लेडी डायनाच्या नावाचाही असावा आणि तो थेंब कदाचित जगाला दिसलाही नसावा...