आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठे आहे ‘टीम इंडिया’?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करण्याचा संकल्प केला होता आणि त्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. भारताच्या विकासाला जो राजकीय रोग लागला आहे, त्यावर मोदी मात करतील आणि सर्व देश किमान विकासकामांसाठी एकत्र होईल, अशी आशा निर्माण झाली होती. खरे म्हणजे निवडणुका झाल्या की जयपराजयातून बाहेर पडून सर्व नेत्यांनी एकदिलाने काम करावे, ही भारतीय नागरिकांची इच्छा आहे. राजकारण काही इतके सरळ नसते, याचीही सर्वांना जाणीव आहे, त्यामुळे अधूनमधून धुसफूस ही चालूच राहणार, हेही मान्य आहे. पण बारा महिने चोवीस तास सर्व निर्णय राजकीय हेतूंनीच घेण्याचा किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत यात मोठा फरक पडण्याची शक्यता नाही. नीती आयोगाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतून तरी ही निराशा हाती आली आहे. भूमी अधिग्रहण हे वादग्रस्त विधेयक आणि देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर सहमती करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एनडीएसंबंधित आणि काही इतर अशा फक्त १६ मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला हजेरी लावली, तर १३ मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. सहकार्याचे नवे पर्व सुरू करू, असे आवाहन गेल्या बैठकीत मोदी यांनी केले होते, मात्र गेल्या सहा- आठ महिन्यांत पुलाखालून इतके पाणी गेले आहे की ते सहकार्य सोडाच, पण राजकारण देशाला घेऊन कोठे जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आपल्याला मिळालेले यश विसरायला तयार नाही, तर काँग्रेस आपला दारुण पराभव पचवू शकत नाही. त्यामुळे देशात जे काही घडते किंवा घडवले पाहिजे, याविषयी टोकाची दोन राजकीय मते तयार होतात आणि तो तिढा काही केल्या सुटत नाही. उलट त्या विषयावर आपली पोळी आगामी ज्या काही निवडणुका असतील, त्या काळात भाजून घेण्याची वृत्ती दिसून येते. या पेचातून बाहेर पडण्यासाठी देशाला अतिशय परिपक्व नेत्यांची गरज आहे. असे नेते काही आभाळातून पडणार नाहीत, ते याच मातीत तयार व्हावे लागतील. देशाला अनेक स्वप्न दाखवणाऱ्या आणि देशात मोठ्या काळानंतर आशावाद जागविणारे नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अहंकार त्यासाठी कमी व्हावे लागतील. पण ते कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चालले आहे, असे नीती आयोगाच्या बुधवारच्या खास बैठकीत जे घडले, त्यावरून म्हणता येईल. हे चित्र देशाच्या राजकीय व्यवस्थेसाठी फारसे शोभादायक नाही आणि अाशादायकही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
पंतप्रधान म्हणून विरोधकांना विश्वासात घेणे, ही जबाबदारी अर्थातच नरेंद्र मोदी यांचीच आहे. त्यांनी आता काँग्रेसच्या विरोधातील धार कमी केली पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की खूप जुन्या गोष्टी उकरून काढण्याऐवजी तो तो विषय तेवढ्यावरच संपविला पाहिजे. सुरुवातीच्या विदेश दौऱ्यात त्यांनी काँग्रेसने देशाची लूट केली, असे विधान केले होते. आणखीही टीका त्यांनी केली होती. ती काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. इतक्या टोकाच्या टीकेचे आता प्रयोजन नाही. पण मोदी वैयक्तिक अनुभवातून बाहेर येत नाहीत, असे दिसते आहे. तर इकडे काँग्रेसने दुसरे टोक गाठले आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला मतदारांनी निवडणुकीत नाकारले आहे, हे त्या पक्षाला अजूनही पचत नाही. त्यामुळेच विषय कोणताही असो, त्याला विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम त्याने हाती घेतला आहे. नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. बैठकीला उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी काँग्रेसला घेता आली असती. राहिला प्रश्न भूमी अधिग्रहण विधेयकाचा. ते तर आता संसदीय समितीसमोर गेले आहे. शिवाय भूमी अधिग्रहणात राज्याला त्यांच्या गरजेनुसार बदल करण्याचा प्रस्ताव पुढे येऊ शकतो किंवा अशाच आणखी काही प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते. असे काही पर्याय शोधण्याशिवाय पर्याय तरी काय आहे? सार्वजनिक सेवासुविधांसाठी जमीन ताब्यात घेण्याशिवाय तरणोपाय नाही, हे काँग्रेसलाही चांगले माहीत आहे. ती कशी घ्यायची, याविषयी काही तरी सहमती तर करावीच लागणार आहे, हे भान काँग्रेसला नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, त्रिपुराचे माणिक सरकार असे बिगर भाजपचे सरकार असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आले होते, ही चांगली गोष्ट आहे. काँग्रेसच्या बहिष्कारामुळे आपसात सहकार्य असलेल्या संघराज्यीय पद्धतीला धक्का बसतो, हे काँग्रेसने लक्षात घ्यावे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते बरोबर असले तरी या सहकार्याची सुरुवात सत्ताधारी म्हणून भाजपपासून होते, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ‘टीम इंडिया’ म्हटल्याने तयार होणार नाही, त्यासाठी बरीच मशागत करावी लागेल, हे ‘टीम भाजप’ला जितके लवकर कळेल, तितके चांगले!
बातम्या आणखी आहेत...