आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी निवडणुकांचे लाभार्थी कोण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलाही सार्वजनिक निर्णय घेत असताना विशेषत: ज्याचा खोलवर परिणाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर पडणार असल्यास असा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे ही निर्णयकर्त्यांची जबाबदारी असते. सध्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा विचार होत आहे. निवडणुकीने खरेच विद्यार्थ्यांना लाभ होईल की कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या पक्षांना तयार कार्यकर्ते मिळतील, हा खरा प्रश्न आहे.


विद्यार्थी चळवळीने या देशाला अनेक महत्त्वाचे नेते दिले आहेत. सध्या राजकारणात शीर्षस्थानी असलेल्या अनेकांचे राजकीय करिअर या विद्यार्थी चळवळीने बनवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय, ध्येयधोरणे यात विद्यार्थी चळवळीचे योगदान परिणामकारक असायचे. किंबहुना सध्या निवडणुका नसतानाही ते आहे. एका विलक्षण ध्येयवादाने भारलेला तो काळ होता. वैयक्तिक स्वार्थापेक्षा देश, समाजहिताचा अग्रक्रमाने विचार होत होता. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती एकदम वेगळी आहे. लोकशाहीचे शिक्षण या गोंडस नावाखाली या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. पण ही शुद्ध बनवेगिरी आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी आघाड्या आहेत. प्रत्येकाला आपले वर्चस्व हवे आहे. त्यामुळे ही सत्तास्पर्धा अक्षरश: गुंडगिरीमध्ये परिवर्तित होते. विद्यार्थी निवडणुका दहशत, हाणामा-या यांनीच गाजतात. या विद्यार्थी निवडणुकांमध्ये ठरावीक काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या डिसुझा नावाच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. तेव्हापासून या निवडणुकांवर बंदी आहे. बंदी असूनही राजकीय नेते चालवत असलेल्या विद्यार्थी संघटना आजही धुमाकूळ घालतच आहेत. कुलगुरूंना धक्काबुक्कीपर्यंत मजल जाते. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात तर विद्यार्थी संघटनांच्या दररोज होणा-या त्रासामुळे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी संघटनांना बंदी घालावी लागली. तेव्हा विद्यार्थी निवडणुकांचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होईल या दाव्यात फार काही तथ्य नाही.


देशात इतर काही ठिकाणी विद्यार्थी निवडणुका होतात तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खूप मोठे हित साधले गेले, असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही.
दुसरे असे की, सध्या राजकीय पक्षांना तरुण, उत्साही, दिलेला आदेश निमूटपणे पाळणारे, मोबदल्याची अपेक्षा न करता राबणारे, राजकीय महत्त्वाकांक्षा नसणारे कार्यकर्ते मिळत नाहीत. हे सर्वच पक्षांचे दुखणे आहे. असा कार्यकर्ता हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कणा समजला जातो. अलीकडे अनेक कारणांनी हा कणा मोडकळीस आला आहे. विद्यार्थी आघाडीचा कार्यकर्ता हा या अर्थाने तयार कार्यकर्ता. महाविद्यालयीन काळात नैसर्गिकरीत्या काहीतरी भव्य दिव्य करावेसे वाटते. नवी उमेद असते. दिलेले काम बेधडकपणे पार पाडण्याची भारीच हौस असते. तेव्हा या अर्थाने विद्यार्थी आघाडी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. मग काय मोर्चा असो की सभा, विद्यार्थी कार्यकर्ता जोरदार प्रचार करतो. वरिष्ठांच्या पाठीवरील एका कौतुकाच्या एका थापेने काहीतरी जबरदस्त केल्याचा आभास निर्माण होतो. परंतु निवडणुका बंद झाल्याने असे कार्यकर्ते निर्माण होण्याचा प्रवाह थांबला. म्हणून निवडणुका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय कार्यकर्ते मिळवण्याच्या हेतूने असल्याचा संशय निर्माण होण्यास भरपूर वाव आहे.


विद्यार्थी मात्र याकडे आपले प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ असे जरी पाहत असले तरी याचा खरा लाभ राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळवण्यासाठीच होणार आहे. कारण विद्यार्थी आघाडी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता काही ठोस उपक्रम राबवताना दिसत नाही. फीवाढ, जाचक अटी, नियम यासारखे प्रश्न राजकीय विद्यार्थी संघटनेशिवायसुद्धा सोडवले जाऊ शकतात. त्यासाठी निवडणुकांची फार काही आवश्यकता निश्चितच नाही.


विद्यार्थ्यांना खरी गरज आहे ती परवडणा-या शुल्कामध्ये उच्च शिक्षणाची. शिक्षणानंतर नोकरीच्या संधीची. यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करून त्यांना प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण संशोधनाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. राष्‍ट्राविकासात संशोधक विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी केवळ लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्ते मिळवण्यासाठी विद्यार्थी निवडणुका घेण्याचा घाट घातला जात असेल तर त्याहून मोठे दुर्दैव कोणतेही नसेल.