आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. डांगेंचे स्मारक का नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माननीय
पृथ्वीराज चव्हाण,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मारकासंबंधी
महोदय,
महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील लोक, स्वातंत्र्यसैनिक व कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांच्या भावना व्यक्त करणारे हे पत्र आपल्या विचारार्थ लिहित आहे. मुंबईत बंद गिरण्यांच्या जागेवर अनेक मान्यवर दिवंगत नेत्यांची स्मारके उभी करण्याच्या अनेक योजना आपणापुढे सादर होत आहेत व महाराष्ट्र शासनाच्या त्या संबंधित सकारात्मक भूमिका आहेत, हे प्रत्ययाला येत आहे याचा आनंद आहे, परंतु मुंबईच्या व महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मारकासंबंधी विचार पुढे येत नाही, याचे दु:ख आहे.


विशेषत: कापड गिरण्यांचा कॉ. डांगेंइतका संबंध कोणत्याही नेत्याचा आलेला नाही. मुंबईच्या दीड लाख गिरणी कामगारांचे जे अग्रगण्य नेते होते, भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एवढ्या मोठ्या कामगार शक्तीचा सक्रिय सहभाग केवळ डॉ. डांगेंमुळेच शक्य झाला. कॉ. डांगे यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. इंग्रजांच्या राजवटीत ते तेरा वर्षे खडतर तुरुंगवास भोगत राहिले. आयटक या कामगार संघटनेची धुरा त्यांनी जगभर आपल्या शिरावर समर्थपणे पेलली. जागतिक कामगार संघटनेचे ते संस्थापक व उपाध्यक्ष होते. सोविएत युनियनच्या पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी नवस्वतंत्र राष्ट्राच्या विकासाचे प्रश्न अग्रक्रमाने मांडले. असे भाषण करण्याचा मान फार कमी राष्ट्र नेत्यांना मिळालेला आहे. कॉ. डांगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षांकरवी त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन हा बहुमानाचा किताब देण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व त्याच्या सामाजिक, आर्थिक पुनरुत्थानात, नवीन भारताच्या उभारणीत त्यांच्या भरीव योगदानामुळे संसदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. राज्यघटनेवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे सर्वपक्षीय चर्चा झाली. कॉ. डांगेंचा त्यामध्ये सहभाग होता. राज्यघटनेमध्ये सार्वभौम गणराज्याची स्थापना, वयस्कर मताधिकार, सांसदीय लोकशाही, मूलभूत अधिकार व जबाबदार राज्य पद्धती इत्यादी सूचना कॉ. डांगे यांनी केल्या व पुढे अशीच राज्यघटना अमलात आली व याच सभेमध्ये त्यांनी भाषावार प्रांतरचनेचीही सूचना केलेली होती. काँग्रेसच्या 1920 च्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी एका वर्षात स्वराज्याची घोषणा केली. तेव्हा कॉ. डांगे यांनी स्वराज्य म्हणजे काय व ते कोणाचे स्वराज्य राहील, असा प्रश्न उपस्थित करून हे स्वराज्य श्रमिकांचे, कामगारांचे व शेतक-यांचे राहील असा स्वराज्याचा आशय असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.


दुसरे महायुद्ध सुरू झाले. हे युद्ध साम्राज्यवादी राष्ट्रांमधील युद्ध आहे, हे युद्ध बड्या भांडवलदारांनी नफ्यासाठी जनतेवर लादलेले युद्ध आहे, अशी भूमिका पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कॉ. डांगे यांनी घेतली. त्यासाठी डॉ. डांगे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उघड्या लॉरीमधून फिरले व लाल बावटा व निळा झेंडा यांच्या युतीचे संकेत जनतेला दिले. आरमारी सैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले. गिरणी कामगारास बंडखोर सैनिकांना पाठिंबा देण्याचे कॉ. डांगे यांनी आवाहन केले. गिरणी कामगारांनी सार्वत्रिक संप पुकारला. ब्रिटिश सैनिक व कामगार यांच्यामध्ये रस्तोरस्ती संघर्ष झाला, त्यामध्ये तीनशे कामगार हुतात्मे झाले. भारत- चीन युद्धाच्या वेळी युद्ध विरामानंतर पं. नेहरूंनी अनेक देशांमध्ये दूत पाठवून भारताची बाजू स्पष्ट करण्याची योजना आखली. सोव्हिएत युनियन व इतर समाजवादी राष्ट्रांमध्ये भारताची बाजू मांडण्याची जबाबदारी पं. नेहरूंनी कॉ. डांगेवर सोपवली. कॉ. डांगेंनी मोहीम पूर्ण करून नेहरूंकडे आपला अहवाल सादर केला.


कामगार चळवळ कॉ. डांगेंचा जिव्हाळ्याचा प्रश्न. भारतीय कामगार चळवळीचे कॉ. डांगे अग्रगण्य नेते. मुंबईचा गिरणी कामगार त्यांनी लढवय्या बनवला व त्यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी रोमहर्षक इतिहास निर्माण केला. 1924-25-27मध्ये गिरणी कामगाराचे संप होत राहिले, पण 1928चा प्रचंड मोठा ऐतिहासिक संप सहा महिने चालला. कामगारांच्या सतरा मागण्या होत्या. दीड लाख कामगार संपात सामील झाले व संप यशस्वी झाला. या संपास डॉ. आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला होता. सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, व्ही. व्ही. गिरी हेदेखील आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. संपाच्या वेळी सुभाषचंद्र बोस एका सभेलाही हजर होते. कॉ. डांगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तेव्हाचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे डांगे यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे आंदोलन. त्यामध्ये त्यांनी पूर्ण ताकदीने भाग घेतला. या काळात घडलेल्या रोमहर्षक घटनांचे डांगे नायक ठरले. मुंबईच्या गिरणी कामगारांनी डॉ. डांगेंच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या अपूर्व लढ्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक ताकद मिळाली. याच कामगारांतून 105 हुतात्मे अमर झाले. 1962 पूर्वी संयुक्त महाराष्ट्र झाला नाही, तर 1962च्या निवडणुकीत महाराष्ट्र केरळ झाल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वाढत्या कामगारशक्तीचा घेतलेला हा धसका होता, असे म्हणायला हरकत नाही.


कॉ. डांगे कामगारांचे व जनतेचे पुढारी होते; तसेच ते इतिहास, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक व चिंतकही होते. वैचारिक क्षेत्रातील कॉ. डांगे यांचे योगदान लक्षणीय आहे, असे म्हणायला हरकत नाही. देवळीच्या तुरुंगात असताना डांगे यांनी प्राचीन इतिहास व संस्कृतीचा सखोल अभ्यास केला व त्यांनी Primitive Communism To Slavery हे पुस्तक लिहिले. तसेच वाङ्मय व जनता हा प्रदीर्घ प्रबंध लिहिला. शिवचरित्रातून दोन सूत्रे त्यांनी प्रतिपादन केली. पहिले म्हणजे, परकीयांचा पराभव करून स्वराज्य स्थापन करणे व स्वराज्याचा पाया कष्टाळू जनतेच्या पायावर उभा करणे. तसेच डांगे यांनी गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक लिहून स्वराज्य प्राप्तीनंतर आम्ही कोणत्या प्रकारचा समाज स्थापन करणार आहोत, असा प्रश्न निर्माण केला. डांगेंचे हे मोठे वैचारिक योगदान स्वातंत्र्य चळवळीला मिळाले, हे नि:संशय. त्यांच्या मते, साहित्य जनतेच्या दु:खात आशा-आकांक्षांना अभिव्यक्त करते. त्यांच्या मते, कलेचे स्रोत जिवंत मानवी जीवन सरितेतून घेतले पाहिजे, तरच ते श्रेष्ठ वाङ्मय व कला ठरते. संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. असे हे डांगे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. जीवनाच्या कोणत्या अंगाला स्पर्श केला नाही असे नाही. श्री. माडखोलकरांनी त्यांचे यथायोग्य वर्णन केलेले आहे. चारित्र्य, स्वार्र्थत्याग, झुंझारपणा, मुत्सद्देगिरी, विद्वत्ता याबाबत डांगे फक्त टिळकांशी बरोबरी करतात, असे त्यांनी म्हटले आहे. अशा या झुंजार नेत्याचे महाराष्ट्राला विस्मरण होऊ नये व त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळाली पाहिजे. यासाठी कोणत्याही गिरणीच्या जागेवर त्यांचे यथोचित स्मारक
होणे गरजेचे आहे.