आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूटफेकीचे ‘जागतिक’ अवतार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणाचाही निषेध करण्यासाठी शांततामय निदर्शने, आंदोलन करणे हे योग्य मार्ग असले तरी ते आजकाल कमीच वापरले जाऊ लागले आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन लास वेगासमध्ये एका कार्यक्रमात भाषण करीत असताना अ‍ॅलिसन अर्नस्ट या महिलेने त्यांच्यावर फेकून मारलेला बूट हिलरी क्लिंटन यांनी चुकवला. 2015 मध्ये अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असलेल्या हिलरी क्लिंटनना त्यांच्यावर होणारे बूटफेकीचे प्रसंग काही नवे नाहीत. दोन वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मोहंमद मोर्सी इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्या देशात भेटीसाठी गेलेल्या हिलरी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर बूट व अंडी फेकून मारण्यात आली होती. अमेरिकेचे युद्धखोर माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश हे 2008 मध्ये इराकच्या दौर्‍यावर गेले असताना इराकी पत्रकार मुंतदेर अल-झैदी याने भर पत्रकार परिषदेत बुश यांच्यावर बूट फेकून मारला होता.

त्यानंतर सातच आठवड्यांनी चीनचे तत्कालीन अध्यक्ष वेन जिआबो हे इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये भाषण देत असताना त्यांच्या दिशेने एका निदर्शकाने पादत्राण फेकले होते. इराक युद्धाचा निषेध करणार्‍यांनी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यावर 2010 मध्ये डब्लीन येथील एका पुस्तक समारंभात बूटफेक केली होती. बूटफेक सर्वसामान्यांकडूनच होते असे नाही तर दुसर्‍याची मुस्कटदाबी करण्यासाठी आपला बूट काढून दाखवण्याचा प्रकार रशियाचे तत्कालीन अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनीही केला होता. पूर्व युरोपीय देशांतील नागरिकांच्या हक्कांची सोव्हिएत रशिया कशी गळचेपी करीत आहे याची कहाणी फिलिपाइन्सचे प्रतिनिधी लोर्नेझे सुमुलाँग हे 1960 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या भर आमसभेत सांगत असताना त्यांना संतापलेल्या क्रुश्चेव्ह यांनी आपल्या पायातील बूट काढून दाखवला होता. या सगळ्या प्रकारांत बूट मात्र संभ्रमात पडला आहे! आपला जन्म लोकांच्या पायसेवेसाठी आहे की लोकांवर फेकून मारण्यासाठी झाला आहे हेच त्याला कळेनासे झाले आहे!