आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहिराणी ओव्यांतून स्त्रीजीवन दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


खान्देशाला वैभवशाली परंपरा लाभली आहे. पुराणकाळ, इतिहासकाळ, मध्ययुगीन, अर्वाचीन कालखंडात खान्देशात अभिरांचे वास्तव्य होते याचा संदर्भ विष्णुपुराणात येतो. म्हणून खान्देशची भाषा-अभिरांची अहिराणी म्हटली गेली. परंपरेच्या दावणीला बांधली गेलेली स्त्री ही वंशाला दिवा देत स्वत: नावागावासहजळते तेव्हा होणा-या वेदनांनी तिचे हृदय पिळवटून जाते. ती म्हणते-
‘सुख मन्हं दु:ख मन्हं कोनपा सांगू देवा
हिरदे बये डोंगर कोठे सोधू मी थंडावा’

भारतीय स्त्रीजीवनात अनेक स्थित्यंतरे येतात. एका कुटुंबातून दुस-या कुटुंबात जाताना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. सासर-माहेर दोन्हीकडचा भावानुबंध तिला जपावा लागतो. संसार सावरण्यात पुरुषापेक्षा स्त्रीचाच वाटा मोठा असतो. पण हे दिव्य साधत असता, दळण दळता दळता जणू काही तिला जीवनाचा सूर सापडला आणि प्रतिभेच्या परीसस्पर्शाने तिने आपले जगणे उत्सव बनवले. सारे जीवनच जणू तिने नादब्रह्म केले.
पहाटेची सुरुवात ती वैभवशाली शब्दांनी करते-
निघना नारायण पितांबरे झयकना
सोनाना रथमान दारे भगवान उना’

भारतीय पुराणकथांतून मनावर आलेले संस्कार प्रतिबिंबित होतात ते असे-
‘भोया रे संकर भोयं तूनं लेनं देनं
माले सापडनं बेलपतरीमा सोनं

रामना राजमा धोबी चुगल्या लावस
बीगर आन्यायनी सीता वनवास भोगस
तुयसा वं बाई नको फिरू रानेवने
चाल मना घर तुले बसाडू बिंद्रावने
देव खंडेराया झाडे धनगरना वाडा
बानाई करता देव खंड्या झाया घेडां’

सासुरवास भोगताना मुलीलाही तेच संस्कार देते-
‘सासू ननींद नं बोलनं कसं तिडीतिडी
अजान मनी मैना आयकी ले वं सोनचीडी’

‘हम दो हमारे दो’च्या आजच्या पिढीत कुटुंबसंस्था मोडकळीस येण्याचा धोका निर्माण झालेला असताना पारंपरिक ओव्या ते सावरायला मार्गदर्शक ठरतात.
‘सासु नि सासरा मन्या दौलत न्या भिती
मायबाप मन्हा काशीखंड्या मुरती’

आईच्या प्रेमासाठी देवसुद्धा स्वर्गात असूनही झुरतो, हे सांगणा-या ओव्या मानवी मनाला थक्क करतात.
‘माडलीसारखी माया नई जगमा
माऊलीना करता देव झुरे सरगमा’

आज एकीकडे स्त्री अवकाशात उड्डाण करते, दुसरीकडे तिला हुंड्यासाठी जाळले जाते, एवढेच नव्हे तर भ्रूणहत्येच्या रूपात तिला मुळासकट उपटले जाते, अशा या काळात समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने क्रांतीचा उद्घोष करणा-या , मुलगा व मुलगी यांच्यात भेद नसावा हे सांगणा-या हृदयस्पर्शी व दानवी वृत्तीला लाजवणा-या सुद्धा ओव्या आहेत.
‘वान्याना दुकाने कस्तुरी हालका मोलनी
अजान मनी मैना हिराना तोलनी
पो-या पोर सारख्या शेतस नको भेद करू
मानवताना धरमले नको छेद करू’

सासुरवास, दु:ख सांगितले तर आपली किंमत कमी होते, म्हणूनच की काय, जात्याच्या घरघरच्या आवाजात तिचे दु:ख ओव्यांच्या माध्यमातून विरून जाते-
एकंदरीत मूल्यांची जपणूक, समजूतदारपणा, कर्तव्य, जबाबदारी, स्त्रीत्व, सौजन्य जोपासताना तिच्या हृदयकमलातून जे भाव बाहेर येतात ते जीवन जगण्याचे तत्त्व सांगून जातात.
‘सईबहीन भेटनी मना बालपन नी
आशी गोट सांगू तिले गुपीत मननी’

अशा श्रमपूजा करणा-या ओव्या म्हणजे सभ्यतेचे वेदच! माणूस साकारण्याची क्षमता असणा-या या ओव्या भारतीय संस्कृतीची महाकाव्ये असून स्त्रीजीवनाची उपासना आणि आजच्या शिक्षिकांना ख-या अर्थाने सुसंस्कारित बनवण्याची ताकद या आशयसंपन्न ओव्यांमध्ये आहे. गेयता, लयबद्धता आणि हृदयस्पर्शी भावमूल्ये ऐकताना कर्णमधुर वाटतात. एवढेच नव्हे, तर भव्य अशा जीवनसागरात योग्य दिशा गवसण्यासाठी दीपस्तंभ होतात.