Home | Editorial | Agralekh | woman with hat

हॅट घालणारी बाई !

divya marathi | Update - Jun 20, 2011, 01:26 AM IST

‘काळा सूर्य’ आणि ’हॅट घालणारी बाई’ या दोन लघुकादंब-यांचा संग्रह हे कमल देसाइंचे उच्चतम साहित्य होते.

  • woman with hat

    ‘काळा सूर्य’ आणि ’हॅट घालणारी बाई’ या दोन लघुकादंब-यांचा संग्रह हे कमल देसाइंचे उच्चतम साहित्य होते. त्यांनी स्वत: उभ्या आयुष्यात कधी डोक्यावर हॅट घातली नसेल. पण तशा रूपात आपल्या समाजात वावरणा-या नायिकेची कल्पना करणे आणि तिच्या तोंडून, तिच्या खास शैलीत एक विलक्षण कहाणी समजून घेणे हा सुजाण वाचकांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. ही हॅट घालून मुक्तपणे वावरणारी आणि आपल्या पद्धतीने जीवनाचा अनुभव देणारी स्त्री म्हणजे जणू कमल देसाइंची प्रतिभा होती. तिला मोजकेच पण रा. भा. पाटणकर, श्री. पु. भागवत, जी. ए. कुलकर्णी, अशोक शहाणे यांच्यासारखे दिग्गज चाहते लाभले. ज्या मोजक्या रसिकांनी कमलताइंची कथा आपलीशी केली त्यांना जणू नवी दृष्टी मिळाली. त्यांनी स्वत:ला धन्य मानले आणि त्या अलौकिक प्रतिभेला मनोमन सलाम केला. पण कमलताइंची कथा खरे तर मूठभरांसाठी नाही. तिचा रसाळपणा, कसदारपणा, समाजदर्शन हे सारे इतके अनोखे आणि दर्जेदार आहे की वस्तुत: ती चित्रपटासारख्या मोठ्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. पण त्याबाबतीत आपण नेहमीच फार कमी पडतो आणि कमलताइंसारख्या अमोल प्रतिभावंतांच्या नशिबी जन्मभराचा वनवास येतो.
    असा अव्वल कलावंत उघड्या आकाशाखालचे जे जीवनदर्शन आपल्या कलाकृतीतून घडवितो ते अनेक रूढ चौकटी मोडून टाकणारे असते, तशीच त्यात बंडखोरी, नावीन्य व अस्सलपणा पदोपदी जाणवत राहतो. कमलताइंच्या ‘काळा सूर्य’च्या आरंभी एक प्रसंग असा आहे...नोकरीच्या निमित्ताने नव्या गावात एकट्या राहायला आलेल्या नायिकेला शेजार लाभतो तो एका विशीतल्या तरुणीचा, जिचे आपल्या बापाबरोबर शारीरिक संबंध असतात आणि म्हणून गावाने त्यांना वाळीत टाकलेले असते. पण नायिकेला मात्र त्या दोघांबद्दल माया वाटते आणि ती त्यांना अत्यंत ममतेने वागविते. अशा प्रकारचे धक्कादायक लेखन करण्याची शिक्षा त्यांना कोणती मिळाली असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. पण सांगलीच्या आपल्या राहत्या घरातून एका अपरात्री आपल्याला बाहेर पडावे लागले होते, अशी ओझरती माहिती त्यांनी संजय आर्वीकर यांना दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत नमूद केली आहे. याच पद्धतीने त्यांना पोटासाठी भिवंडी, धुळे, मिरज, कागल अशा आडगावांमध्ये कमीअधिक काळ मुक्काम करावा लागला. पण अशा बिकट स्थितीतच त्यांच्यामधले साहित्यगुण उजळून निघाले आणि ‘रात्रंदिन आम्हां’, ‘रंग’, ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ असे विलक्षण साहित्य त्यांनी रसिकांपुढे ठेवले. गेल्या वर्षा-दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘कमल देसाई यांची निवडक कथा’ या ताज्या संग्रहात त्यांचे सर्व लेखनगुण उत्तमरीत्या सामावलेले दिसतात.
    गेल्या पन्नास-पंचाहत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक लेखिका झपाट्याने पुढे आल्या आहेत. त्यांच्यापैकी मोजकी नावे घ्यायची तर मालती बेडेकर, वसुंधरा पटवर्धन, विजया राजाध्यक्ष, आशा बगे, सानिया, मलिका अमरशेख, मेघना पेठे, कविता महाजन, प्रतिमा जोशी अशी काही नावे चटकन डोळ्यांपुढे येतात. या प्रत्येक लेखिकेचे आधुनिक मराठी साहित्यात विशिष्ट स्थान आहे, स्वत:ची म्हणून गुणवैशिष्ट्ये आहेत. पण कमलताई या सर्वांपेक्षा नि:संशय अधिक उंच आणि अधिक सन्माननीय आहेत. त्या स्त्रीवादी नव्हत्या, साम्यवादी नव्हत्या आणि हिंदुत्ववादी तर नव्हत्याच नव्हत्या. पण या सर्व संकुचित कुंपणांना ओलांडून जाणारा जीवनाचा विशाल अवकाश त्यांनी आपलासा केला होता आणि अव्वल साहित्याची अशक्यप्राय उंची सहजगत्या गाठली होती. याबाबतीत त्यांची बरोबरी होऊ शकते ती बहिणाबाई चौधरी यांच्या लोभस रचनांशी. फरक इतकाच की, बहिणाबाइंच्या रचना सर्वसामान्य रसिकासाठी सुगम व सुबोध होत्या, तर कमलताइंच्या कथा प्रथमदर्शनी तरी अपारंपरिक व अवघड असत. पण एकदा त्यांच्याशी धागा जुळला की जन्मभराचे सुखद नाते जोडले जाई. दुर्दैव असे की बहिणाबार्इंना जसे आचार्य अत्र्यांनी सामान्यांपर्यंत नेले तसे खंदे ‘मध्यस्थ’ कमलतार्इंना लाभले नाहीत. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे. नियतकालिके, इंटरनेट या सर्वांनीच त्यांची घोर उपेक्षा केली.
    जवळजवळ सर्वच अलौकिक कलावंतांचे भागधेय असे विचित्र असते की अनेकदा त्यांच्या पदरी मरणोत्तर सन्मान पडतात. चिं. त्र्यं. खानोलकर आणि भाऊ पाध्ये या दोन लेखकांची अशी उपेक्षा झालेली आपण पाहिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्हॅन गॉग या कलावंताला त्याच्या हयातीत मरणप्राय वेदना सोसाव्या लागल्या होत्या. पण कधी ना कधी, कुठे ना कुठे त्यांचा उचित सन्मान बहुधा त्यांना लाभतो. जॉन डन नावाच्या जुन्या इंग्रज कवीचे ‘उत्खनन’ करून टी. एस. एलियट यांनी विसाव्या शतकात त्याची पुनर्स्थापना केली आणि जगन्मान्यता मिळवून दिली. तो मान या जागतिकीकरणाच्या काळात कमलताइंनाही मिळावा अशा मोलाची त्यांची गुणवत्ता आहे.Trending