आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीच्या विशेष गुणांचे संवर्धन व्हावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू जीवनधारा आणि आजची परिस्थिती ध्यानात घेत महिलांविषयक चिंतन होणे आवश्यक आहे. शाश्वत (सनातन) तत्त्वांचे आजच्या काळात अनुसरण करायचे असेल तर ते कशा रीतीने करायचे, हे पाहणे म्हणजेच युगधर्म समजून घेणे होय. जसा काळ बदलतो, जीवनातली गुंतागुंत वाढते तसे शाश्वत तत्त्वांच्या प्रकाशात जीवनमूल्ये, जीवनव्यवस्था निश्चित कराव्या लागतात. ही शाश्वत मूल्ये कोणती आहेत? संपूर्ण अस्तित्व (एक्झिस्टन्स) हे आत्मचेतनेचे प्रगटीकरण आहे.

एकच तत्त्व अनेक रूपांतून प्रगट झाले आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक घटकाचे विशेष स्थान आहे. प्रत्येकाचे प्रयोजन आहे. कोणीही निरर्थक नाही. मनुष्य हा स्वत:मध्ये एखादा स्वतंत्र (अनकनेक्टेड) घटक नाही. व्यक्ती ही मूलत: आत्मचेतना आहे. विकसित होणारी ही आत्मचेतनाच परिवार, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण सृष्टीचे रूप घेते. राष्ट्र हे विश्वाचा एक भाग असल्यामुळे तिचे प्रयोजन विश्वकल्याणासाठी आहे. एकात्म जीवनदर्शनाच्या प्रकाशात अन्य मुख्य तत्त्वे...

1. कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी हे सारे घटक एकमेकांशी जोडले गेलेले, परस्परसंबंधी व परस्परावलंबी आहेत. या अस्तित्वाची रचना मानवी शरीरासारखी आहे. जसे बाळाचे शरीर तयार होताना सुरुवातीला काही पेशी असतात, त्या पेशी ऊतींमध्ये (टिश्यू) विकसित होतात. ऊतींपासून अवयव तयार होतात. सारे अवयव क्रमश: विकसित होत मानवी शरीर तयार होेते; परंतु त्याची चेतना एकच असते. त्यामुळे सारे अवयव हे एकमेकांशी जोडले गेलेले, परस्परसंबंधित आणि परस्परावलंबी असतात.

2. या एकात्मतेची अनुभूती घेण्यासाठी प्रत्येक जीवात्मा हा त्याच्या विकासाच्या स्तराला अनुकूल शरीर
धारण करतो.

3. जिथे परस्पर अनुबंध, परस्पर संबंध आणि परस्परावलंबन आहे तिथे स्पर्धा नाही किंवा तिथे समतेचा विषयही उपस्थित होत नाही.

4. प्रत्येकाने आपले जीवन या सृष्टीच्या समरसतेसाठी (की ज्यामध्ये राष्ट्र, समाज, कुटुंब इत्यादींचा समावेश आहे.) आणि एकात्मतेची अनुभूती घेण्यासठी आत्मविकासाच्या यात्रेत पुढे सरकण्यासाठी व्यतीत करायचे आहे.

5. आत्मविकासासाठी आपल्या संस्कृतीत चतुर्विध पुरुषार्थ आणि आश्रम व्यवस्था आहे. आजही या गोष्टी अत्यंत प्रासंगिक आहेत. आजच्या परिभाषेत या बाबी समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. समता किंवा समानतेचा नव्हे, तर एकात्मतेचा हा विषय आहे. ही तत्त्वे स्त्रीच्या संदर्भात समजून घेतली पाहिजेत. जीवात्मा हा लिंगविरहित असतो; परंतु आत्मविकासाच्या यात्रेत जेव्हा तो विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट शरीर धारण करतो, त्या शरीरात त्याला काही अनुभव अवश्य घ्यायचे आहेत. समस्या महिलांच्या नाहीत तर आपल्या समाजाच्या आहेत. मुद्दा जेव्हा एकात्मतेचा असतो तेव्हा समस्या कधी केवळ एखाद्या घटकाची नसते. जसे शरीरात हृदयरोग असेल तर ती केवळ हृदयाची नव्हे, पूर्ण शरीराची समस्या असते. याच प्रकारे स्त्री भ्रूणहत्या, हुंडा, घरगुती हिंसाचार, कुपोषण आदी केवळ महिलांच्या समस्या नाहीत. या सार्‍या आपल्या समाजाच्या समस्या आहेत, ज्या समस्यांचा बळी महिला ठरलीय. आणि समाजाच्या या समस्या का निर्माण झाल्या? पाश्चिमात्य विचारांच्या झगमगाटात समाज आपली सनातन मूल्ये विसरला आहे. आणखी एक कारण आहे - आजच्या समाजजीवनाची स्थिती ध्यानात न घेता जर समाजासमोर जुन्या आदर्श व्यवस्थांनाच आपण सांगत राहिलो. स्त्रीच्या विशेष गुणांचे रक्षण करत आज व्यवस्थांमध्ये बदल घडवून आणायचे आहेत.

आज स्त्री अर्थार्जनसुद्धा करतेय, इतकेच नाही, तर ती मुलांचा अभ्यास, घरासाठी खरेदी आदी कामेही करतेय. अशा वेळी जर तिला जुने नियम सांगून घरातली सारी कामे तिनेच केली पाहिजेत, सर्वांची जेवणं झाल्यानंतरच तिने जेवले पाहिजे, असे म्हटले जात असेल तर याला हिंदू चिंतन म्हणता येणार नाही.

आपण एकात्मतेचा विचार करत असू तर पत्नीवरील कामाचा बोजा पाहून पती आपोआपच घरातल्या कामात मदतीला येईल. ही गोष्ट स्त्रीने अधिकाराची मागणी करून किंवा पुरुषाने संवेदनाहीन राहून शक्य नाही. ही गोष्ट तर एकमेकांप्रति एकात्मतेच्या अनुभूतीनेच होईल आणि ती समरसतापूर्ण असेल. बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की, पती-पत्नी हे द्विदल दाण्याप्रमाणे असतात, तसेच पती-पत्नी मिळून एक पूर्ण मानव होतो. दोघांचा आत्मा एकच आहे. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये दोघांनी मिळूनच पार पाडायची आहेत. उद्देश हा की, कुटुंब हे मुलांचे योग्य दृष्टीने सर्वांगीण विकास करणारे स्थान असावे आणि त्यात स्त्रीचे जे वैशिष्ट्य आहे की ती माता आहे, त्या वैशिष्ट्याचे रक्षणही व्हावे. येथे मातृत्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. आईच्या रूपाने जे कार्य आहे ते केवळ स्त्रीच करू शकते. त्यामुळे मातृत्व हे रक्षणीय आणि महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांच्या दृष्टीने हे कसे करायचे यावर चिंतन करावे लागेल.

आणखी एक उदाहरण एकत्र कुटुंब पद्धतीचे आहे. कुटुंबाची एकात्मता तर राहिलीच पाहिजे; पण आजच्या काळातली गुंतागुंतही ध्यानात घेतली पाहिजे. नोकरी, शिक्षण यामुळे एकत्र कुटुंब राहू शकले नाही तरी सण, आजारपण, सुट्यांचा काळ, कुलदेवता पूजन, जत्रा यासाठी संपूर्ण परिवार एकत्र येणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. याला स्थायी रूपही द्यावे लागेल, तर हे व्यवहार्य होईल.

अस्तित्वाच्या सनातन नियमांविरुद्ध जीवन जगल्यास विनाश निश्चित आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवण्यास रिकामे नाही, मग तो समाज प्राचीन असो की आधुनिक, समाजानेच सत्यापुढे मान तुकवावयास हवी आणि ते शक्य नसेल तर मरणास तयार हवे. हे सत्यही समजून घ्यावे लागेल. व्यक्तिवाद आणि भोगवाद यामुळे ज्या विकृती समाजात येत आहेत, जसे लिव्ह इन रिलेशनशिप. त्याने समाजाची काय स्थिती होईल? या दृष्टीने आपण आपल्या सनातन तत्त्वांच्या प्रकाशात काय काय उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत याचे चिंतन आवश्यक आहे. स्त्री ही गृहस्थाश्रमाची अधिष्ठात्री देवता आहे. ती कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. याचा अर्थ असा आहे का की, तिचे कार्य कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे? तर असे मुळीच नाही. गीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्येकातील ईश्वरत्वाविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, स्त्रियांमधील ईश्वरत्व कीर्ती, श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृती, क्षमा या सात गुणांनी प्रकाशित होते. हे सात गुण संस्कारक्षम कुटुंब, समाजधारणा आणि राष्ट्र पुनरुत्थानाच्या कार्यातही आवश्यक आहेत. भारताचे प्रयोजन संपूर्ण विश्वाला आध्यात्मिक जीवनपद्धती कशी असते याचे मार्गदर्शन करणे हे आहे. विशेषकरून स्त्रीतील या सप्तशक्ती एकत्र आल्या पाहिजेत.