आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आणि महिलांचे व्यवस्थापन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत महिला सशक्तीकरण वा महिलांच्या संदर्भात त्यांना अधिकाधिक अधिकार प्रदान करून अव्वल स्थान देण्याचे प्रयत्न सातत्याने होत असले तरी महिलांची व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापक म्हणून असणारी संख्या आणि स्थिती ही आजही एक प्रश्नचिन्ह आहे. मुख्य म्हणजे भारत आणि भारतीय महिलांच्या संदर्भात असणारी ही स्थिती जागतिक स्तरावरही अशाच स्वरूपात आहे, हे विशेष.

‘मर्सर’ या व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य अशा सल्लागार संस्थेद्वारा नव्यानेच व्यवस्थापन क्षेत्रातील महिला आणि व्यवस्थापक महिला यांच्या संदर्भात जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. या सर्वेक्षणात प्रामुख्याने असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय आघाडीच्या व निवडक कंपन्यांमधील व्यवस्थापन वा उच्चपदस्थ महिला केवळ 26 कंपन्यांमध्ये कार्यरत असून एकूण महिला कर्मचा-यांच्या संस्थेत अशा महिलांचे प्रमाण अवघे 5% आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी केवळ 11% कंपन्यांनी त्यांच्या एकूण कर्मचा-यांच्या संख्येत महिलांचे व्यवस्थापन वा उच्च पातळीवरील प्रमाण व टक्केवारी 30% असण्याला दुजोरा दिला आहे. सर्वेक्षणात भारतातील 55 तर आशियातील 663 कंपन्यांचा समावेश होता, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

पुरेशा प्रमाणात प्रातिनिधिक स्वरूपात असणा-या या सर्वेक्षणावर आधारित असणा-या अहवालाची जमेची बाजू म्हणजे सर्वेक्षणात सामील बहुसंख्य म्हणजेच 64% कंपन्यांनी त्यांच्या कंपनी व्यवस्थापनात महिला अधिका-यांनी व्यवस्थापन वा उच्च पातळीवर काम करण्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याची पुष्टी केली आहे, हे विशेष. महिला व्यवस्थापकांचे व्यवस्थापनातील प्रमाण कमी असण्याच्या संदर्भात सर्वेक्षणात सामील प्रतिसाद देणा-यांच्या मते भारतीय कंपन्यांमध्ये असे होण्याचे कारण अशा महिला व्यवस्थापकांचे वरिष्ठ असून, इतर आशियाई देशांमध्ये महिलांचे व्यवस्थापक स्तरावरील प्रमाण अल्प असण्यास त्यांचे व्यवस्थापक कारणीभूत असण्याचे प्रमाण आहे 15%. याचाच अर्थ, भारतीय व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांनी आपल्या सहकारी म्हणून महिला उमेदवारांची निवड करण्यासाठी लक्षणीय स्वरूपात उदारता दाखवली आहे.

कंपनी स्तरावरील प्रतिसादाच्या संदर्भात सांगायचे तर 19% भारतीय कंपन्यांमधील व्यवस्थापकांची महिला उमेदवारांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित व्यवस्थापक बनवण्याची तयारी नसते. मात्र या मानसिकतेत आता प्रकर्षाने व लक्षणीय स्वरूपात बदल होत असून काही कंपन्यांमध्ये तर महिला कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापकांचे प्रमाण वाढवण्याची जबाबदारी कंपनीच्या सर्वोच्च अशा संचालक मंडळांवर टाकण्यात आली असून त्याचा ठरावीक कालावधीनंतर आढावा-मागोवासुद्धा घेण्यात येत असतो. याशिवाय काही विशेष महत्त्वाची व जबाबदारीची कामेही आता महिलांना कटाक्षाने देण्यात येणार आहेत.

सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झालेली एक अन्य बाब म्हणजे महिलांची कार्यपद्धती, नेतृत्वक्षमता, यामुळे पण त्याच्या करिअर व कार्यकर्तृत्वाला विशेषत: मोठ्या पदावरील जबाबदारी घेऊन आपले कर्तृत्व आणि नेतृत्व प्रस्थापित करून सिद्ध करण्यासाठी मर्यादा पडतात. असे प्रतिसाद देणा-या कंपन्यांचे प्रमाण सुमारे 14% आहे. यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळ स्तरावरील महिला व्यवस्थापकांचा समावेश नाही, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. विशेषत: कंपनीच्या सर्वोच्च स्थानावरील वा मुख्याधिकारी पदावर महिला अत्यल्प वा नगण्य संख्या आणि स्वरूपात आहेत, यामागे हेच कारण आहे.

महिलांचे व्यवस्थापनातील स्थान आणि त्यांना वरिष्ठ पातळीवर उपलब्ध होणा-या रोजगार संधी यावर वरिष्ठ पातळीवर उमेदवारांची निवड करण्यासाठी सल्ला-सेवा देणा-या काही प्रमुख सल्लागार संस्थांच्या मते हल्ली महिलांना सल्ला, सेवा, वित्तीय क्षेत्रातच नव्हे तर इंजिनिअरिंग, उत्पादन क्षेत्रातसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिकारी म्हणून नेमण्याकडे कंपन्यांचा कल आहे. त्यामुळे महिलांना व महिलांसाठी सर्वोच्च पद वा पातळीवर नेमण्याच्याही संधी आता उपलब्ध होत असून ही स्थिती नक्कीच आशादायी आहे.

या सल्लागार निवड सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या मते व्यवस्थापनांची महिला उमेदवार, व्यवस्थापकांच्या संदर्भातील मानसिकताच आता मुळातून व नव्याने बदलत असून त्याचा फायदा कार्यक्षम व प्रभावी महिला व्यवस्थापकांना नक्कीच होणार आहे. मुख्य म्हणजे महिला व्यवस्थापकांच्या कामाच्या तासांच्या संदर्भात आता कुणाला कुठलाच मुद्दा नसून, त्यांच्या कामाची परिणामकारकता व व्यावसायिक फायदे यावर आता जोर देण्यात येणार आहे. हा बदल अर्थातच लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण आहे. काही कंपन्या तर आपल्या महिला कर्मचा-यांना प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन देऊन त्याद्वारे त्यांना व्यवस्थापनपर व व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांच्यामधून उद्याच्या यशस्वी महिला व्यवस्थापक तयार करण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत.

r dattatraya.ambulkar@surtion.com