आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला क्रिकेट; आलेख अधोगतीचा (अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतात नुकतीच महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाली. क्रिकेट हा भारतात धर्म मानला जातो, असे म्हणतात. या धर्माचे प्रचंड अनुयायी आहेत. महिला विश्वचषक स्पर्धेदरम्यान हे अनुयायी कुठे होते? ईएसपीएन, स्टार क्रिकेटसारख्या प्रमुख क्रिकेट वाहिन्यांवर या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत होते. भारतीय क्रिकेटची नर्सरी मानल्या गेलेल्या मुंबईत या स्पर्धेचे सामने होते.पाकिस्तान संघाच्या गटाचे सामने नंतर कटकला हलवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट अशी, मुंबईत या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यालादेखील प्रेक्षक आले नाहीत. त्यामुळे न्यूझीलंड संघाची कप्तान सुझी बेट्स हिने उद्विग्नपणे म्हटले होते की, अंतिम सामन्याकडेदेखील प्रेक्षकांनी पाठ फिरवावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कटकसारख्या ठिकाणी साखळी सामन्यांनादेखील गर्दी झाली होती. भारतीय क्रिकेटचे उगमस्थान असलेल्या मुंबईत महिला क्रिकेट एवढे दुर्लक्षित असावे, याबद्दल सुझी बेट्सने खंत व्यक्त केली होती. या परिस्थितीला पुरुषांच्या क्रिकेटचे नियंत्रण करणारी बीसीसीआय ही संघटना जबाबदार असल्याचा आरोप डायना एडुलजी या माजी महिला क्रिकेटपटूसह अनेकांनी केला. 2006 मध्ये महिला क्रिकेटचे उत्तरदायित्व बीसीसीआयने स्वीकारले. तेव्हापासून या खेळाची किती प्रगती झाली? स्थानिक क्रिकेटचा दर्जा बीसीसीआयच्या मदतीने सुधारेल, अशी अपेक्षा होती.

बीसीसीआयकडे खेळाच्या विकासाची धुरा सोपवून पूर्णपणे झोपी गेलेल्या महिला क्रिकेट संघटनेनेही त्यानंतरच्या कालखंडात किती काम केले, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी उदारमतवादी धोरणाने महिला क्रिकेटला बीसीसीआयवर प्रतिनिधित्वही दिले होते. थेट बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीला या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची मुभा, स्वातंत्र्य आणि बहुमान दिला गेला होता. त्यानंतरच्या बीसीसीआय अध्यक्षांच्या कालावधीतही तीच परंपरा सदस्यांची नाराजी स्वीकारूनही बीसीसीआयने कायम ठेवली होती. कालांतराने बीसीसीआयच्याही लक्षात यायला लागले की खेळाच्या विकासापेक्षाही खेळाडूंच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या जात आहेत.

सध्या बीसीसीआयवर तोंडसुख घेणा-या महिला क्रिकेटपटूने तर महिलांसाठी कसोटी क्रिकेट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या खेळाडूचा आग्रह यासाठी होता की महिला कसोटी खेळल्या की बीसीसीआयच्या आर्थिक अनुदान योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. त्यावर बीसीसीआयच्या पदाधिका-यांनी त्या प्रतिनिधीला स्पष्टपणे विचारले होते, तुम्हाला पैसे मिळावेत यासाठी स्पर्धा व मालिका हव्या आहेत की खेळ सुधारण्यासाठी तुम्हाला सोयी-सवलती हव्या आहेत? आज 70-80 वर्षे अनेक पुरुष क्रिकेटपटूंनी केवळ हौसेपोटी खेळलेल्या क्रिकेट या खेळाला आर्थिक लाभाची फळे लागली आहेत. अनेक माजी क्रिकेटपटूंनी केलेला त्याग आज भारतीय क्रिकेटला लाभलेल्या समृद्धीसाठी जबाबदार आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी स्वत:च्या पदराला चाट लावून हा खेळ खेळला. घरचे खाऊन लष्कराच्या भाक-या भाजल्या. त्याची परतफेड म्हणून आज बीसीसीआयने अनेक वृद्ध क्रिकेटपटूंना व त्यांच्या विधवांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्याच वेळी आयपीएलसारखी सोन्याची खाण बीसीसीआयला सापडली आणि सर्वांचीच चांदी झाली. मात्र त्यात आपल्यालाही हिस्सा हवा, अशी इच्छा काही महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आणि बीसीसीआयचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला.

महिला क्रिकेटच्या विकासाचे ओझे केवळ बीसीसीआयच्या खांद्यावर टाकून महिला क्रिकेटचा विकास होणार नाही. त्यासाठी महिला क्रिकेट संघटनांनी स्थानिक पातळीवर हा खेळ कसा रुजेल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी शालेय पातळीवर पालकांच्या आणि पाल्यांच्या मनावर हा खेळ रुजवणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयांनी मुलांच्या क्रिकेटएवढेच मुलींच्या क्रिकेटच्या विकासासाठी आग्रही असणे गरजेचे आहे. आज पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सुनील गावसकरांपासून कपिलदेव, सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक आदर्श तरुण पिढीपुढे आहेत. त्यामुळे मुलांच्या क्रिकेटसाठी अनेक आयकॉन आहेत.

महिला क्रिकेटच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे सायना नेहवाल, सानिया मिर्झा, पी. टी. उषा यांच्यासारख्या महिला खेळाडूंचे आदर्श जपत अनेक मुलींनी क्रिकेटऐवजी अन्य खेळांचीच निवड केल्याचे लक्षात येते. महिला क्रिकेटने या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न प्रथम करणे गरजेचे आहे. बीसीसीआयकडे अंगुलिनिर्देश करण्यापेक्षा महिला क्रिकेट संघटनांनी स्वत:ही काहीतरी वेगळे करून दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी अनेक खासगी क्रीडा संस्था, अकॅडमीज किंवा दानशूर व्यक्तींच्या मदतीने खेळाचा पाया व्यापक करण्याची गरज आहे. क्रिकेट साहित्य पुरवणे गरजेचे आहे. गुणवत्ता शोधण्यासाठी शहरांबाहेर पडून ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणे गरजेचे आहे. त्या गुणवत्तेला पुरेसा वाव देण्यासाठी त्या त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागातील अनेक होतकरू मुलींना सरावासाठी पुरेशा महिला खेळाडूही उपलब्ध होत नाहीत. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सोलापूरसारख्या ठिकाणी एक होतकरू मुलगी क्रिकेट खेळायला महिला साथीदार नाहीत म्हणून मुलांसोबत क्रिकेट खेळताना आढळली. जवळजवळ हेच चित्र अन्य भागातही पाहायला मिळते. बीसीसीआयच्या लाभार्थींच्या पंक्तीत बसण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा माजी महिला क्रिकेटपटूंनी छोट्या छोट्या मुलींना आपल्या अनुभवाचा, ओळखीचा, संपर्काचा लाभ करून देणे गरजेचे आहे. भारतात विश्वचषक स्पर्धा असताना या महिला क्रिकेट संघटकांनी शाळांमधील मुलींना या स्पर्धेचे सामने स्टेडियमवर आणून दाखवणे गरजेचे होते. स्टेडियमवर प्रेक्षक येत नाहीत म्हणून रडगाणे गाण्यापेक्षा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी या वर्गाने काहीही केले नाही. उलट महिला खेळाडूंना ‘इकॉनॉमी’ क्लासच्या विमानप्रवासाऐवजी ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासची तिकिटे दिली नाहीत म्हणून याच माजी खेळाडूंनी आगपाखड केली. शिवसेना व अन्य पक्षांनी पाकिस्तानला मुंबईत खेळण्यास विरोध केल्यानंतर केवळ महिला विश्वचषक स्पर्धेचे अस्तित्व जाणवले होते. भारतीय संघाने सलामी धूमधडाक्यात जिंकल्यानंतर उत्सुकता वाढायला लागली होती. त्यानंतरच्या दोन्ही लढती भारतातने गमावल्या आणि साखळी सामन्यातच भारताचा विश्वचषक संपला.

जागतिक संघात भारताचा एकही खेळाडू स्थान निर्माण करू शकला नाही. ऑस्‍ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज या महिला संघातील खेळाडूंच्या दर्जापुढे भारतीय खेळाडू कुठे आहेत, याचेही महिला क्रिकेट संघटना, पदाधिकारी व संघटक यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. हा खेळ एका दिवसात पुढे जाणार नाही. त्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करण्याची तयारी हवी. संयम हवा. त्यागाची वृत्तीही हवी. महिला क्रिकेटप्रेमींनी या खेळाचा प्रचार शाळा आणि कॉलेजमधील मुलींमध्ये केला नाही. बीसीसीआयने पैसे आणि सुविधा दिल्या की आपली जबाबदारी संपली असा पवित्रा घेतला. त्यामुळे महिला क्रिकेटचा प्रसार होण्याऐवजी अधोगतीच झाली.