आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीमुक्ती : एक गहन प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐंशीच्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळ जोरात होती. त्या वेळी आपण आवर्जून म्हणायचो की, स्त्रीमुक्तीतच पुरुषमुक्ती आहे. ही मुक्ती म्हणूनच स्त्री-पुरुष दोघांनी मिळून साधायची आहे. समाजात मुलीला असे वाढवायचे आहे की, ज्यामुळे तिने आत्मनिर्भर होऊन स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास सक्षम बनायचे आहे. स्वतंत्र विचारांबरोबर, समान हक्कांबरोबर संसाराची व घर चालवण्याची जबाबदारी समान असायला हवी. जबाबदारी घेतल्याशिवाय हक्क मिळत नसतात. आपण असेही म्हणायचो की, याचा अर्थ पुरुषासारखे बनणे नव्हे. कारण आपण नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसासारखे बनण्याचा प्रयत्न करतो व आपण पुरुषाला श्रेष्ठ नाही तर बरोबरीचा मानतो. चांगला माणूस बनवण्यासाठी त्याने काही बायकी मानले गेलेले गुण अंगी बाळगायला हरकत नाही. उदा. दुसर्‍याबद्दल असणारी काळजी, प्रेम, आपुलकी ही नुसती असून भागत नाही, तर ती दर्शवायला पाहिजे. त्या भावनांपोटी लोक काय म्हणतील याची पर्वा न करता रडावेसे वाटले तर रडावे. हळुवारपणा दर्शवायला घाबरू नये. बायको जर नोकरी करून अर्थार्जनाला हातभार लावत असेल तर नवर्‍यानेही घरकामातला वाटा उचलावा. एक स्वतंत्र स्त्रीच पुरुषाची खर्‍या अर्थाने सहचरी होऊ शकेल. वगैरे वगैरे. तसेच मुलीलाही मुलांसारखे माना. तिला शिकू द्या. स्वत:च्या पायावर उभे राहू द्या. असे घडले तरच तिच्या अंगी निर्णयक्षमता येईल तसेच घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे शक्य होईल. लग्नाअंतर्गत नाइलाजाने राहणे हे सर्वथा मानवीयतेला बट्टा लावणारे व विचार केल्यास पुरुषासाठी अपमानास्पद वाटत नाही का? ही मांडणी चुकीची होती असे आजही वाटत नाही. जुन्या काळची समाजरचना वेगळी होती. त्या वेळी स्त्रिया जरी शिकू लागल्या होत्या तरी शिक्षणाने जागृत झालेल्या आकांक्षा पुर्‍या होणे समाजाच्या मनोधारणेमुळे अवघड होत होते. आधुनिक सुशिक्षित स्त्री-पुरुषांच्या आकांक्षा अपेक्षा वेगळ्या होत्या. बराच काळ असे वाटत होते की, स्त्रीमुक्ती जेवढी स्त्रियांनी आत्मसात केली आहे तेवढे प्रबोधन पुरुषांचे केले गेले नाही. अशा तर्‍हेची मांडणीही झालेली आठवते की, आता आपण पुरुषांना बदलण्याचा प्रयत्न करूया! कारण भारतातील स्त्री चळवळीने कधीही पुरुषविरहित समाजाची मांडणी व इच्छा केलेली नाही. अशा परिस्थितीत अचानक वेगळ्याच प्रश्नांना तोंड द्यायची वेळ आली आहे.
आजच्या पन्नाशीतील आयांचे मुलगे लग्नाला आले आहेत व त्यांनी स्वत:चे ठरवलेले नाही. त्यांच्या आयांनी बहुतेक वेळी कुटुंबाला प्राधान्य देत. जमेल तसे व जमेल तर करिअर केले आहे. आज त्यांची सुनांकडून त्यांनीही असेच करावे, अशी अपेक्षा नाही. तर सुनांना त्यांचे करिअर करण्यासाठी पाठिंबा द्यायची त्यांची इच्छा व तयारी आहे, परंतु मुलांना सांगून आलेल्या मुलींचा अ‍ॅटिट्यूड हा मुलांना व त्यांना काळजी करण्यासारखा वाटतो. घाबरवून टाकतो. स्त्री-मुक्तीच्या विचारांची प्रतिनिधी म्हणून हे सर्व पाहून व ऐकून मला वाइट वाटते व काळजीही वाटते. या मुली असे प्रश्न विचारतात की, एक मुलगा म्हणाला, ‘मला नोकरीसाठी मुलाखत देत आहे असेच वाटले.’ म्हणजे जर बर्‍यापैकी उच्च मध्यमवर्गीय, एकच मुलगा, सुबत्ता दिसते, पण प्रश्न असे ‘वडिलांच्या बिझनेसमध्ये तुझा किती टक्के शेअर’ अथवा आणखी एका मुलाला तिने सांगितले की, स्वयंपाकघरात पाऊल टकणार नाही. अमेरिकेत स्वयंपाकघरात पाऊल न टाकल्यास हाऊस हजबंड चालणार असतो का? तुझ्या काय आवडी-निवडी? आयुष्य कसे घालवायचे याविषयी काही कल्पना? याची अजिबात चर्चा नाही. स्वत:च्या आयुष्याविषयीचे काही विचार नाहीत. मुलाच्या वडिलांनी खरेदी केलेल्या घरात त्यांना वडील माणसे नकोत. त्याच घरात बसून धाकटा भाऊ असल्यास त्याचे काय हेही विचारले जाते. आई-वडील म्हणतात, ‘आम्ही आमच्या मुलीला मुलासारखी वाढवली आहे.’ म्हणजे मुलांसारखीच स्वकेंद्रित व नेहमी दुसर्‍याने आपल्याशी जुळवून घ्यावे ही अपेक्षा ठेवणारी? आपण मुलांना थोडे मुलींसारखे वाढवा म्हणत होतो, तर इथे मुली मुलांसारख्या झाल्या आहेत. एवढे करून या मुली आपल्या ज्ञानाने, बुद्धीने या मुलांना इंप्रेस करतात का? तर तेही नाही. त्यांचा सहजीवनात सहभाग कोणता व किती हेही सांगता येत नाही. मुले हवी असल्यास करिअरचे काय याचा विचार केलेला नसतो. ही जोडपी एकमेकांना पूरक कशी होणार? यांच्या आयुष्यात रोमान्स आहे का फक्त व्यवहार? घर दोघांचे असते म्हणून हक्क व जबाबदार्‍याही समान असाव्यात, अशी विचारसरणी पूर्वी मांडण्यात येत होती, इथे मात्र दिसतात ते फक्त हक्क. जबाबदारीची बातच नाही. पूर्वी मुलाने लग्न केले तर उपकार होते. आज मुली उपकार करत आहेत का? इथे समानता कुठे आहे?
बहुसंख्य मुली अशा असतील असे नव्हे, परंतु अशा मुलींची संख्या वाढते आहे वा दुर्दैवाने अशा मुली अवतीभोवती जास्त संख्येने दिसत आहेत. यामुळे विवाह संस्थेचे काय होणार वगैरे मला म्हणायचे नाही, परंतु माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. या मुलींनाही सहजीवनाची इच्छा असते म्हणूनच त्या स्थळाकडे भेटायला वगैरे जातात. नाहीतर लग्न करणार नाही, असे रटवणार्‍याही मुली असतात. त्या निदान विचाराने स्पष्ट तरी असतात. प्रश्न या हक्कांची जाणीव असणार्‍या, पण जबाबदार्‍यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असणार्‍या
मुलींचा असतो.
विचार केल्यावर वाटते की, या मुलींना कुठल्याही दुसर्‍या माणसाबरोबर राहण्याच्या ‘स्किल्स’ ज्या आई-वडिलांनी शिकवायची गरज असते, त्या शिकवल्या जात नाहीत. पूर्वी एक टोक होते. म्हणजे मुलींना फक्त आणि फक्त सासरी जुळवून घ्यायचेच आहे व तसे झाले नाही तर आयुष्य संपले असेच सांगितले जात होते. ते वाईटच होते व त्याविरुद्धच स्त्री-मुक्ती चळवळ उभारावी लागली, मुलगी अथवा स्वकेंद्रित मुलगा दोघेही अगदी सख्ख्या आई-वडिलांसाठीही पुढे जादा त्रासदायक झाल्याची, नकोशी झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. यामुळे मुले नोकरी करून घरी पैसे आणतही असतील, पण त्या पैशांचे जेवण बनवणे. घर स्वच्छ ठेवणे वगैरे आपोआप होत नसते व पैशांच्या बरोबरीने याही महत्त्वाच्या जबाबदार्‍या आहेत याचे भान मुलगा व मुलगी या दोघांनाही करून देणे हे वळण लावण्याचाच भाग असला पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या आई-वडिलांना अथवा वडील माणसांना डस्टबिन्स म्हणताना मुलींनी स्वत:चे आई-वडीलही डोळ्यासमोर आणावेत. दुसर्‍याबरोबर जुळवून घेऊन राहणे हे शिक्षण, ही मुलगा व मुलगी दोघांची गरज आहे. एवढे लक्षात घेतले तर खूप चांगले होईल. स्वसुखासाठी व समाजस्वास्थ्यासाठी याची गरज आहे.