आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांमधील ‘मिळून सा-या जणी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दशकात कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढवून महिला कर्मचा-यांची संख्या पुरेशा प्रमाणावर करण्यासाठी विशेष आणि योजनाबद्ध प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना फलदायी यश पण येत आहे. आपल्या याच प्रयत्नांचा एक भाग व पुढील टप्पा म्हणून आपापल्या कंपन्यांमधील महिला कर्मचा-यांची संख्या आणि टक्केवारीमध्ये पुरेशी वाढ आणि अधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने काही कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांसाठी त्यांनी महिला उमेदवार विविध जागांसाठी सुचवून त्यांची निवड झाल्यास अशा प्रकारे महिला उमेदवारांना सुचवणा-या कंपनीतील संबंधित कर्मचा-याला अधिक उत्तेजन देण्यासाठी विशेष प्रोत्साहनपर राशी देण्याच्या अभिनव कल्पनेची अंमलबजावणी केली असून त्याचीच ही यशोगाथा-
महिला कर्मचा-यांची संख्या योजनाबद्ध पद्धतीने व तुलनेने जलदगतीने वाढवण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विभिन्न कंपन्या नोकरी संदर्भातील जाहिराती, विशेषज्ञांची मदत, पोर्टस्पवर देण्यात येणारी माहिती इ. प्रचलित व प्रस्थापित प्रयत्नांच्या जोडीलाच आता कंपनीतील कर्मचा-यांचे पण सहकार्य घेत असून, या कामी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्या उपाय योजना करीत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पुढील योजनांचा आवर्जून समावेश करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे कंपनीतील कर्मचा-याला त्यांनी कंपनीतील जागेसाठी उमेदवार सुचवून त्यांची निवड झाल्यास जी रक्कम देण्यात येते त्यापेक्षा सुमारे 15 ते 20% अधिक रक्कम कर्मचा-यांनी महिला उमेदवार सुचवल्यास देण्यात येते.


या संदर्भात उदाहरणादाखल व विशेष उल्लेखनीय स्वरूपात ज्या कंपन्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख करावा लागेल त्यामध्ये एचएसबीसी ते आपल्या कर्मचा-यांनी कंपनीतील उपलब्ध जागांसाठी बाहेरील उमेदवार सुचवताना महिला उमेदवारांना प्राधान्य वा अग्रक्रम मिळावा या दृष्टीने विशेष उपक्रमच सुरू केला आहे. याच उपक्रमांतर्गत कर्मचा-यांना मिळणा-या महिला उमेदवारांच्या संदर्भातील प्रोत्साहन राशीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. लेनोव्हो इंडिया कंपनीने तर आपल्या कर्मचा-यांनी सुचवलेल्या महिला उमेदवारांची कंपनीत निवड झाल्यास संबंधित कर्मचा-याला मिळणा-या रकमेत 15% अतिरिक्त अशी भरीव स्वरूपाची वाढ केली आहे तर अ‍ॅक्सेंच्युअरसारख्या कंपन्या आपल्या कंपनीत महिला कर्मचा-यांना आणण्याच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय स्वरूपाचे काम करणा-या कर्मचा-यांना पदोन्नती वा अन्य फायदे विशेष स्वरूपात देत आहेत.


अशाच प्रकारचे प्रयत्न आणि उपक्रम विविध कंपन्यांद्वारे घेण्यात येत असून त्यांची अंमलबजावणी पण करण्यात येत असते. या प्रयत्नांवरून कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांची आपापल्या कंपनीतील महिला कर्मचा-यांचे प्रमाण आणि संख्या वाढवण्यासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांचे स्वरूप सहजगत्या लक्षात येते. मुख्य म्हणजे कंपन्यांच्या महिला कर्मचा-यांच्या संदर्भातील प्रयत्नांना प्रामाणिकपणाची साथ लाभली आहे. उदाहरणार्थ एचएसबीसीसारख्या कंपन्यांनी तर आपल्या कंपनीतील कर्मचा-यांमधील पुरुष व महिला कर्मचा-यांचे सध्या असणारे 68:32 हे प्रमाण पुढील वर्षापर्यंत म्हणजेच 2014 मध्ये 60:40 एवढे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लेवोव्हो इंडिया कंपनीमध्ये कर्मचा-यांनी महिला उमेदवार सुचवून अशा उमेदवार कंपनीत प्रत्यक्ष रुजू झाल्यावर त्या उमेदवारांना सुचवणा-या कर्मचा-यांना संबंधित महिला कर्मचा-यांच्या श्रेणी व वेतनमानानुसार विशेष प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. याच संदर्भातील विशेष प्रयत्न अ‍ॅक्सेंच्युअर इंडिया कंपनीमध्ये करण्यात येत आहेत. अ‍ॅक्सेंच्युअरमध्ये महिला कर्मचा-यांची निवड नेमणुकीसाठी विशेष योगदान देणा-या कर्मचा-यांना काही अनुषंगिक फायद्यांच्या जोडीला पदोन्नतीसारखे फायदेसुद्धा देण्यात येतात. असे केल्याने ज्या कर्मचा-याला असे फायदे मिळतात त्यांना कर सवलतीसारखे अनुषंगिक फायदेसुद्धा मिळू शकतात.


कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी अधिकाधिक संख्येत याव्यात यासाठी कंपनी जगतात सुरू असणा-या या प्रयत्न आणि उपकरणांचे लोण आता बँका, वित्तीय संस्था, जाहिरात व जनसंपर्कविषयक कंपन्या, पर्यटन व आदारतिथ्य आणि संगणक विज्ञान-सेवा क्षेत्रातही पोहोचले असून या क्षेत्रातील कंपन्यांनी पण आपल्या एकूण कर्मचा-यांमध्ये महिलांचे प्रमाण आणि टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रातील नवागत कंपन्यासुद्धा या कामी आपल्या कर्मचा-यांची मदत आणि सहकार्य घेत असून, त्यांना यासंदर्भात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.