आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचनसंस्कृतीचा अनोखा जागर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहवीर्यं करवावहै..असे आपल्या प्राचीन संस्कृतीत म्हटले आहे. ‘आपण सारे एकत्र येऊन (चांगले) काम करूया’ असा या वचनाचा मथितार्थ आहे. पुण्यात झालेला ‘वाचन जागर महोत्सव’ या प्राचीन वचनाचे जणू सप्रयोग सादरीकरण  हाेते. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साहित्य व्यवहाराशी निगडित असलेले लेखक, प्रकाशक, विक्रेते या साऱ्यांना वाचकाशी थेट जोडण्याचे काम या महाेत्सवाने केले. आठ मान्यवर प्रकाशक, विक्रेते यांनी वाचकप्रिय लेखकांच्या सहकार्याने आरंभिलेला हा ‘जागर’ त्याचा हेतू साध्य करत हाेता, हे चित्र नक्कीच दिलासादायक असेच हाेते.  
 
साहित्य व्यवहार बहुपेडी असतो हे सर्वज्ञात आहेच.. लेखकाची सर्जनशीलता वाचकापर्यंत पोहाेचवण्यासाठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते हे दुवा म्हणून कार्यरत असतात. ग्रंथाच्या रूपाने वाचकांपर्यंत लेखक पोहाेचत असले तरी ‘कवी तो होता कसा आननी’ याची उत्सुकता वाचकाला सतेच.. शिवाय स्वत:च्या लेखनाविषयी, अनुभवविश्वाविषयी. चिंतनाविषयीचे लेखकाचे मनोगत ‘फर्स्ट हॅण्ड’ जाणून घेण्याची उत्सुकताही वाचकांना असते. लेखकाप्रमाणेच पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे चित्रकार, पुस्तकाची सजावट करणारे कलाकार, मांडणीकार हेही ग्रंथव्यवहारातील महत्त्वाचे घटक असतात. ग्रंथव्यवहाराविषयी बोलताना बालवाचक हा घटक फारच दुर्लक्षिला जातो. सध्या सुरू असलेल्या ‘वाचन जागर महोत्सवा’ने  हे सारे घटक गांभीर्याने विचारात घेत उपक्रमांचा धडाका सुरू केला हाेता आणि महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद ‘वाचन संस्कृती’विषयी आश्वासक चित्र निर्माण करणारे आहे, असे बहुतेक प्रकाशक व लेखकांचे म्हणणे आहे.

‘वाचन जागर महोत्सवा’त राजहंस, रोहन, डायमंड, मनोविकास, ज्योत्स्ना, समकालीन, मॅजेस्टिक या प्रकाशनगृहांसह अक्षरधारा, पुस्तकपेठ, रसिक साहित्य, साधना, बुकगंगा ही ग्रंथदालने आणि ग्रंथविक्रेत्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले हाेते. रोज सकाळी व सायंकाळी लेखकांशी गप्पा, पुस्तकप्रकाशने, व्याख्याने, मुलाखती यांची रेलचेलच हाेती.  ‘वाचन जागर महोत्सवा’विषयी प्रसिद्ध लेखक संजय भास्कर जोशी म्हणाले, “वाचन संस्कृतीसाठी आम्ही संकल्पनात्मक पाच कलमी कार्यक्रम सुचविला अाहे. सहकार, तंत्रज्ञान, स्वत:पलीकडे जाणे, विक्री-विपणन-वितरण आणि ग्राहकाभिमुखता अशी ही पाच कलमे आहेत. त्यांचा सकारात्मक विचार करून वाचनाचा जागर अधिकाधिक लोकाश्रयी कसा करता येईल, याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. चित्रपट, नाटक, चित्र व शिल्पकला या कलांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही ‘लोकप्रिय’ आणि ‘अभिजात’ असा फरक केला जातो. दोन्ही बाजूंकडे समर्थक, विरोधक तयार असतात. त्यामुळे  फरकाची दरी रुंदावत जाते. त्यातूनच ‘वाचकाभिमुख’ आणि ‘वाचकानुनयी’ यांची गल्लत होते आणि त्याचा थेट परिणाम वाचनसंस्कृतीवर होतो. वाचक विभागण्याच्या शक्यता वाढतात.
 
शिवाय वाचकांमध्येही आवडत्या लेखकाविषयीचा  अभिनिवेश तयार होऊ लागतो. या साऱ्यांचा विचार करून प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांनी एकत्रितपणे सुरू केलेला हा उपक्रम वाचकांच्या वाढत्या प्रतिसादाने आपल्या उद्देशाची पूर्तता करणार, असे म्हणायला हरकत नाही.”  मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर म्हणाले, “या उपक्रमाला प्रकाशक, विक्रेते, वाचक या साऱ्यांनीच जो प्रतिसाद दिला, तो उत्साहवर्धक हाेता. केवळ ग्रंथविक्रीच्या दृष्टीने हे म्हणत नाही. तर यानिमित्ताने लेखकांची जी  मांदियाळी वाचकांसमोर अाली, त्यावरून म्हणत आहे. साहित्य संमेलनप्रसंगीही इतक्या संख्येने लेखक एकत्र येत नाहीत. लेखकांची थेट भेट, चर्चा करताना वाचक दिसत हाेते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व उपक्रमांत सर्व लेखक कुठलेही मानधन वा प्रवासखर्च न घेता सहभागी झाले हाेते” ज्योत्स्ना प्रकाशनाचे मिलिंद परांजपे यांनीही उपक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. रोहन प्रकाशनचे  रोहन चंपानेरकर म्हणाले, ‘आजवर प्रकाशक, विक्रेते एकेकटे उपक्रम करत असत. प्रथमच यानिमित्ताने आठ प्रकाशक आणि आठ ग्रंथविक्रेते एकत्रित येऊन उपक्रम पार पडल्याने एकत्रित प्रयत्नांतून अधिक आशादायी चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. 
 
जयश्री बाेकील, पुणे, jayubokil@gmail.com
बातम्या आणखी आहेत...