आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्द नि:शब्द झाले!(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काबुलीवार बंगाली बऊ’ ही आशयघन कादंबरी लिहिणा-या बंगाली लेखिका सुश्मिता बॅनर्जी यांची अफगाणिस्तानात बुधवारी क्रूर हत्या झाली; ती तालिबानींच्या हिंस्र वृत्तीचे निदर्शक आहे. अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या लष्कराने आक्रमण केल्यानंतर त्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने इस्लामी मूलतत्त्ववादी मुजाहिदीनांना हाताशी धरले होते. सोव्हिएत रशियाच्या फौजा माघारी फिरल्या याचे एक कारण मुजाहिदीन व इतर इस्लामी धर्मवादी होते. पुढे या मुजाहिदीनांतून तालिबानचे भूत निर्माण होऊन ते अफगाणिस्तान व अमेरिकेच्या कायम बोकांडी बसले. वस्तुत: तालिबान हे अमेरिकन सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांचेच अपत्य आहे. त्यातूनच ओसामा बिन लादेन या अमेरिकेने निर्माण केलेल्या भस्मासुराचा उदय झाला. अमेरिकेवर त्यातूनच 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला.अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत तालिबान्यांनी आपले हातपाय पसरून आणि मुजाहिदीन संघटनेला नामोहरम करून अत्यंत धर्मांध राजवट त्या देशावर लादली.

स्त्रियांचे स्वातंत्र्य त्यांनी पूर्णपणे हिरावून घेतले, संगीतासारख्या ललित कलांनाही बंदी घातली. तालिबानी राजवट अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानवर स्वारी करून मोडून काढली. 1990च्या दशकाच्या प्रारंभी सुश्मिता बॅनर्जी यांचे वास्तव्य सुमारे चार वर्षे अफगाणिस्तानमध्ये होते. तालिबान्यांच्या एका गटाने त्यांचे एकदा अपहरण केले होते. त्यातून सुश्मिता बॅनर्जी यांनी अत्यंत चाणाक्षपणे स्वत:ची सुटका करून घेतली होती. मूळच्या कोलकात्याच्या रहिवासी असलेल्या सुश्मिता अफगाण उद्योगपती जाँबाज खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वजनांचा तीव्र विरोध होईल, याची कल्पना असल्याने अतिशय गुप्तता पाळून हा विवाह पार पडला होता. जाँबाज खान व सुश्मिता (विवाहानंतरचे नाव सईदा कमाला) यांनी परस्परांशी घटस्फोट घ्यावा, असे जोरकस प्रयत्न हा विवाह मान्य नसणा-यांकडून करण्यात आले होते. मात्र त्यांना दाद लागू न देता आपल्या पतीसमवेत सुश्मिता बॅनर्जी अफगाणिस्तानला रवाना झाल्या. तालिबान्यांची अफगाणिस्तानवर घट्ट पकड असलेल्या काळात त्या देशातील मुस्कटदाबीचे वातावरण सुश्मिता यांना खूपच जवळून पाहता आले.

जाँबाज खान यांचा व्यवसाय कोलकाता शहरात केंद्रित झालेला असल्याने काही काळानंतर ते पुन्हा तेथे परतले, पण सुश्मिता काही अडचणींमुळे भारतात त्या वेळी परतू शकल्या नव्हत्या. आजूबाजूच्या अफगाणी स्त्रियांची होणारी विलक्षण कुचंबणा त्या आपल्या डोळ्यांनी पाहत होत्या. तालिबान्यांनी चालवलेल्या कारभारामुळे अफगाणिस्तानचा विकास तर साफ खुंटलाच होता, पायाभूत सुविधांचा पत्ता नव्हता, शहरी, निमशहरी तसेच अतिशय दुर्गम अशा ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. या संकटांना अफगाणिस्तानमधील गोरगरीब जनता तोंड देत होती. फतव्यांचा वरंवटा फिरवून तालिबानी सत्तापिपासू सर्वसामान्यांना चिरडत होते. सुश्मिता बॅनर्जी या मुळात बंडखोर स्वभावाच्या होत्या.

व्यवस्थेने नाकारलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याची त्यांना आस होती. आरोग्यसेवेचे शिक्षण घेतलेल्या सुश्मिता यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग अफगाणिस्तानमधील लोकांसाठी करण्याचे ठरवले. त्यांनी पक्तिता प्रांतातील खराना गावी आपल्या निवासस्थानी स्त्रियांसाठी आरोग्य सेवा केंद्र सुरू केले. तेथे उपचारांसाठी येणा-या अफगाणी महिलांकडून अनेक दर्दभ-या कहाण्या त्यांना कळू लागल्या. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त परपुरुषांशी महिलांनी बोलायचे नाही, कुटुंबातील पुरुषाची सोबत घेऊनच घराबाहेर जायचे; अन्यथा सार्वजनिक ठिकाणी एकट्याने फिरायचे नाही, अशी अनेकानेक बंधने होती. महिलांसाठी असलेल्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तालिबान्यांनी बळजोरीने बंद पाडली. या विपरीत परिस्थितीतही सुश्मिता यांनी महिलांसाठीचे सेवाकार्य मोठ्या धैर्याने सुरूच ठेवले. या घटनेचा डूख ठेवून तालिबानी दहशतवाद्यांनी मे 1995 मध्ये या दवाखान्यावर हल्ला केला.

सुश्मिता यांना बेदम मारहाण करण्यात आली व गावामध्येच एका ठिकाणी नजरकैदेत ठेवले. ‘धर्मविरोधी’ कृत्य केल्याच्या गुन्ह्याबद्दल तालिबान्यांनी सुश्मिता बॅनर्जी यांना शिक्षा म्हणून 22 जुलै 1995 रोजी ठार मारण्याचे ठरवले. त्यासाठी फतवा जारी करण्यात आला होता. मात्र खराना गावच्या मुखियाला सुश्मिता बॅनर्जी यांच्याविषयी सहानुभूती होती. त्याच्या मदतीने सुश्मिता यांनी तालिबान्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर दरमजल करीत त्या काबूलला पोहोचल्या व तेथून विमानप्रवास करून अखेर 12 ऑगस्ट 1995 रोजी त्या कोलकात्यात दाखल झाल्या. या थरारक अनुभवावर त्यांनी 1995 मध्ये लिहिलेल्या ‘काबुलीवार बंगाली बऊ’ या कादंबरीमुळे अफगाणिस्तानातील एक वेगळेच जग लोकांसमोर आले. या कादंबरीवरून प्रेरणा घेऊन 2003 मध्ये ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला, ज्यात मनीषा कोईरालाने नायिकेची भूमिका केली होती. ज्वलंत आशयामुळे हा चित्रपट गाजला होता.

दु:ख वेशीवर टांगणे हे सुश्मिता यांच्या लेखनाचे प्राणतत्त्व होते. त्याला अनुसरूनच त्यांनी आणखी काही पुस्तकांचे लेखन केले. सुश्मिता बॅनर्जी यांनी 1995 पासून यंदाच्या वर्षीच्या प्रारंभीपर्यंत भारतातच प्रदीर्घ वास्तव्य केले व नुकत्याच त्या अफगाणिस्तानात परतल्या होत्या. तेथे आरोग्यसेविका या नात्याने त्यांनी पुन्हा आपले समाजकार्य सुरू केले होते व अफगाणिस्तानी महिलांच्या जीवनावर लघुपट बनवण्याचेही त्यांच्या मनाने घेतले होते. त्यासाठी काही चित्रीकरणही त्या करीत होत्या. या कालावधीत अमेरिकेने तालिबान राजवट उलथवून लावली, अफगाणिस्तानात लोकशाही राजवटीचा अंमल सुरू झाला, असे बरेच काही घडले असले तरी तेथील तालिबानी प्रवृत्ती समूळ नष्ट झालेल्या नाहीत. अमेरिकी फौजा निघून गेल्यानंतर अफगाणिस्तान पुन्हा तालिबानींच्या विळख्यात सापडणार तर नाही ना, अशी भीती अनेकांना सतावत आहे. सुश्मिता बॅनर्जी हत्येसारख्या घटनांतून ही शंका अधिक प्रबळ होते.

दुस-या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करणा-यांची मानसिकताही तालिबान्यांशी मिळतीजुळती अशीच आहे. भारत-अफगाणिस्तानचे राजनैतिक-सांस्कृतिक पातळीवर प्राचीन काळापासून स्नेहसंबंध जुळलेले आहेत. अफगाणिस्तानच्या विकासात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा समयी दोन्ही देशांमधील समर्थ दुवा म्हणून कार्यरत असणा-या सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या झाल्याने बंडखोर शब्द आता नि:शब्द झाले आहेत!