आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांच्या राजकारणाची पीछेहाट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन झाल्यानंतर जगभराच्या विद्वानांनी राजकारण्यांनी त्यांना आदरांजली वाहिली; परंतु इंग्लंडमधील खाणकामगार व त्यांच्या मुलांनी मात्र बिअर पिऊन जल्लोष केला. याचे एकमेव कारण म्हणजे मार्गारेट थॅचर यांनी खाण कामागारांच्या 1 वर्षापासून जास्त चालू असलेला संप मोडून काढलाच; परंतु त्याचबरोबर लंडन शहरातून व इतर शहरांतून औद्यागिक कामगार व रेल्वे कामगारांच्या संघटनाही मोडीत काढून लंडनचे स्वरूप हे औद्योगिकनगरी होते. ते बदलून मध्यमवर्गीयांची वित्तीय राजधानी असे केले व इंग्लंड देशांत कामगार संघटनांची राजकीय शक्ती ही मोडून काढली. मुंबई ही कामगारांची राजधानी श्रमिकांची मक्का, त्याची प्रचिती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या चळवळीच्या सुमारास सर्वानाच आली. कॉ. डांगे, साथी जॉर्ज फर्नांडिस, कॉ. दत्ता सामंत असे मुंबई बंदचे सम्राट या शहराने पाहिले. कॉ. पाटकर, कॉ. कृष्णा देसाई यांच्या सारखे आमदार कॉ, मिरजकरसारखा महापौर, शांती पटेल व रोजा देशपांडे यांच्या सारखे खासदारही पाहिले; परंतु 1982 नंतर गिरणी कामगारांचा प्रदीर्घ चाललेला अयशस्वी संपानंतर मुंबईत कामगारांचे स्थान काय? हा प्रश्न सातत्याने समोर येतो. विशेषत: 1 मे या कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तर सतत समोर येतो.

1 मे कामगार दिन हाच संयुक्त महाराष्ट्र दिन झाला हा योगायोग नसून कामगार चळवळीचा प्रभाव व तिचे महाराष्ट्र याज्यातील स्थापनेत असलेले अमूल्य योगदान होत याची ती प्रचिती आहे. आता ही भाई जगताप, सचिनभाऊ किंवा शिवसेनेचे काही कामगार नेते निवडून येतात; परंतु त्यात कामगार हा प्रभाव अत्यल्प असतो, तर इतर ओळखी म्हणजे मराठी किंवा जातीय, पक्षीय ओळखच जास्त प्रभावी असते. त्यामुळेच मुंबईत 1982 नंतर लंडनप्रमाणेच कामगार संघ्घ्टनेचे महत्व कमी झाले, उद्योग बाहेर गेले व बंद झाले; परंतु वित्तीय भांडवलीची राजधानी म्हणून मुंबईचे महत्त्व मात्र आबाधित राहिले, नव्हे वाढले. असे का व्हावे? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज 1 मे कामगार दिन साजरा करताना करावे. मार्गारेट थॅचर, रेनॉल्ड रेगन यांच्या सारख्या व्यक्ती या बदलाला जबाबदार आहेत काय? कामगार संघटनांनी आपल्या शक्तीचा कायाद्यांचा गैरवापर केल्यामुळे सर्वसामान्य मनुष्य त्यांच्यापासून लांब गेला काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणा त्यांची उतरे साधली जातात; परंतु वास्तव वेगळे आहे व त्याचा सामना आजही करावा लागत आहे. तंत्रज्ञानातील बदल, 1930 नंतर जगभर अमलात आलेल्या लोक कल्याणकारी राजवटीच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेले महागाईचे व कमी होणार्‍या नफ्याचे संकट निर्माण झाले. याचा फायदा घेऊन भांडवलदारी विचारसरणीच्या नेत्यांनी, पक्षांनी व सत्ताधारी वर्गाने केलेला वैचारिक हल्ला व जागतिक बॅँक, आंतरराष्ट्रीय नाणे व गॅट करारामार्फत करण्यात आलेली व्यूहरचना अशा अनेक घटनांमुळे हा बदल झाला आहे. त्यात सोवियत रशियाचे पतन हादेखील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या सर्व बदलांमुळे कामगार संघटना व कामगारांचे राजकीय व सामाजिक स्थान आणि चळवळीमागचा विचार या सर्व आघाडीवर कामगार राजकारणाची पीछेहाट झालेली पाहात आहोत. याचा अर्थ कामगारांचे आजच्या व्यवस्थेतील महत्त्व व स्थान कमी झाले आहे काय? तर वास्तव तसे नाही, उलट कामागारांकडून जास्त काम करवून घेणे त्यांना कमी दाम देणे हे स्पष्टपणे समोर येत आहे. 1070 ते 2008 पर्यंत उत्पादनांत प्रचंड वाढ होऊनदेखील कामगारांचा वाटा फक्त 4 टक्के (40 वर्षांत फक्त 4 टक्के)वाढला आहे. 1 लोकांकडे 40 टक्के संपती आहे. त्यामुळेच 1 टक्का विरुद्ध 99 टक्के अशी घोषणा देऊन वॉलस्ट्रीट विरोधी आंदोलन चालू आहे.

आजच्या शहरांची रचना पाहिल्यास फेरीवाले, रिक्षावाले, स्वयंरोजगार करणारे कंत्राटी कामगार, कमी पगार घेणारे शिक्षक, छोट्या उद्यागातील असंघटित कामगार, बांधकाम कामगार, अंगणवाडी, अशा कामगार, किरकोळ हंगामी कामगार, ठेकेदारी कामगार असे 90 टक्के श्रमजिवी या देशात व शहरात आहेत. 40 कोटी कामगारांपैकी जेमतेम 8 टक्के कामगार संघटित व कामगार फायदे लागू असणारे आहेत. त्यांचे प्रश्न ही गंभीर होत आहेत. पेन्शन गायब वा कमी होत आहे. महागाई भत्ता कमी वा बंद होत आहे. कामवाढ नाही. 6 वा वेतन लागू झाला. मोठी पगारवाढ दिसली परंतु 10 ते 20 टक्के कामगार कपात दिसली नाही. अनेक उद्योगात मोठया पगार वाढीचे आकडे येतात; परंतु त्याबरोबर 480 निनिटांचे काम किंवा मल्टी मशीन चालविण्याची सक्ती व 25 ते 30 टक्के उत्पादकतेत वाढ, अशा अटी दिसतच नाही.

थोडक्यात बहुसंख्य कामगारांना कायदे नाहीत. महागाई भत्ता मिळत नाही. किमान वेतन नाही व सामाजिक सुरक्षा नाही व ज्या थोड्या कामगारांना संघर्षातून हे फायदे मिळाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात काम वाढ देण्यास भाग पाडून नफ्याचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी आजचे अर्थकारण व राजकारण होत नाही. बंद व संपाविरोधी वातावरण, कामगार संघटना विरोधी वातावरण कायम राहावे असेच प्रचार तंत्र असते व त्याला सर्व समाज, कामगारवर्गही बळी पडतो. दुसरीकडे सरंजामी समाजमन सातत्याने हीरोच्या शोधात असल्यामुळे मी तुमचे भले करतो माझ्या मागे या, मला सत्ता द्या. असे ठाम पणे सांगणार्‍या नेत्यांच्या मागे जाण्याची प्रवृती समाजात वाढताना दिसत आहे व त्याची लागण कामगारांनाही झाली आहे. या पार्श्वभूमीवर 20-21 फोब्रुवारीचा भारतभर झालेला सार्वत्रिक संप त्याचे महत्त्व लक्षात येईल. संघटित कामगारांनी असंघटित कामगारांच्या मागण्यासाठी केलेला हा अभूतपूर्व संप होत 15 कोटी कामगार या संपात सहभागी होते.

देशातील सर्व विचारसरणीच्या कामगार संघटना सामील झाल्या होत्या. अभूतपूर्व एकजुटीने हा संप लढवला गेला. कामगारांचे प्रश्न राजकारणाच्या अर्थ कारणाच्या व समाजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा हा अत्यंत चांगला प्रयत्न होता. तो पुढे नेण्याची गरज आहे; परंतु मुंबईत मात्र वित्तीय विभाग म्हणजे बॅँका, विमा व सरकारीक्षेत्र सोडल्यास इतरत्र प्रभाव जाणवला नाही कारण मुंबईतील राष्ट्रवादीचे शरदराव यांचे संकुचित राजकारण, शिवसेना व त्यांच्यामधील महानगरपालिकामधील राजकारणात चालू असलेल्या संघर्षामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था चालू राहिली. कामगार आपले वाकडे करू शकत नाही, ते आपल्यालाच देणार हा फाजील आत्मविश्वास! कामगारांनी हे वास्तव ओळखून जो मजदूर की बात करेगा, वही राज करेगा! ही घोषणा वास्तवात आणणे हाच कामगारांच्या राजकारणाचा मुख्य भाग असला पाहिजे; परंतु जुन्या पद्धतीने हे होणार नाही. तर नवीन मार्ग शोधावे लागतील. असंघटितांना संघटित करणे, किमान वेतन, निवृत्तिवेतन, आरोग्य व शिक्षणाचा, घरांचा अधिकार हा सर्वांना मिळाला पाहिजे. म्हणजे मानवी हक्क कामगार हक्क यांची सांगड घालण्यासाठी भूमिका घेऊन काम केले पाहिजे. त्याच बरोबर सरकाराची भूमिका काय असावी, हा कामगार चळवळीचा कायमच काळजीचा विषय असला पाहिजे व तो कामगारांपर्यंत नेणे आवश्यक आहे. अन्यथा जात,धर्म किंवा संकुचित भाषा प्रांत किंवा व्यक्तिनिष्ठ प्रभाव असा कामगार एकजुटीवर हल्ला करणार्‍या विचारांना व प्रवृतींना कामगार बळी पडतील. आजपर्यंत हाच अनुभव आहे. येत्या 1 मे या कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांनी काळाची पावले ओळखून एकजुटीने कामगारांचे प्रश्न राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील यासाठी क्रियाशील होणे गरजेचे आहे.