आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण रक्षणाचे पसायदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वर्षी वाढणारे तापमान आपल्याला अस्वस्थ करत आहे. अंगाची लाही लाही होत आहे. ‘जीवन नको नकोसे’ वाटणारी ही निसर्गावस्था खरे तर मानवनिर्मितच आहे. वारंवार पडणारा भयावह दुष्काळ, ‘अन्नासाठी दाही दिशा’ अशी केविलवाणी स्थिती... भूकबळी पडताहेत, पाण्यासाठी वणवण फिरणारे मानवी समूह, वन्य प्राणी, हजारो कोटी रुपयांचा होत असणारा धूर, अनिर्बंध जंगलतोड, कारखान्यांतून ओकणारा औद्योगिक धूर, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी युद्धे, भांडणे, सुनामीसारखे महापूर, ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा जीवसृष्टीचा -हास, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, भूमिप्रदूषण आणि दुर्विचारांचे प्राबल्य या सर्वांचा एकत्रित परिणाम सजीवसृष्टीला आव्हानच! अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. मानवी हव्यासापोटी वाढणार्‍या सिमेंटच्या जंगलामुळे शेतजमिनीवर आक्रमण होत आहे आणि स्थिती, निसर्गचक्र उलटे फिरू लागले आहे. सर्व ग्रहमालिकेतील मानवी अस्तित्व असलेली ‘वसुंधरा’ पुन्हा अश्मयुगाकडे वाटचाल करू लागली आहे. हे आव्हान खरेच!

पण अपयशाने खचून जाईल तो मानव कसला? गेल्या तीस चाळीस वर्षांत ही ‘वसुंधरा’ परत ‘हरितगर्भ’ करण्यासाठी सारे जग एकत्र येत आहे. ‘थिंक ग्लोबली, अ‍ॅक्ट लोकली’ या भूमिकेतून सार्‍या जगातले पर्यावरणमित्र संघटित होत आहे. थेंबाथेंबाने सागर निर्माण होतो तशा असंख्य छोट्या छोट्या संकल्प-प्रकल्पांतून या पृथ्वीला पुनश्च आपले हरितवैभव देण्यासाठी असंख्य रचनात्मक हात एकत्र येत आहेत. त्यांचे प्रबोधन करायला हवे... त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. प्रत्येकाला ‘राजहंस’ होता येणार नाही, पण त्या दिशेने वाटचाल तरी करायला हवी. प्रत्येक यशस्वी क्रांतीमागे हाच निर्धार होता हे लक्षात घ्यायला हवे. ‘ग्रेट थिंग्ज कॅन बी डन बाय ग्रेट सॅक्रिफाइस ओनली’ असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. जीवनात काही ‘भव्यदिव्य’ करायचे असेल तर ‘समर्पित’ जीवनच ते साध्य करू शकेल आणि ‘समर्पण’ याचा अर्थ सर्वस्वाचे, सर्वांनी मिळून केलेले ‘अर्पण’. याच समर्पित भावनेतून आपण ‘अहिंसेच्या’ माध्यमातून स्वातंत्र्य मिळविले, याच समर्पित भावनेतून देवी, पोलिओ, धनुर्वात, क्षय, प्लेग, यासारखे भयानक जंतुजन्य रोग आपण हटवले आणि मानवी आरोग्याला नवे परिमाण दिले...
‘किनारों से टकराता है उसे तूफान कहते हैं।
तूफानों से टकराता है उसे ‘जवान’ कहते हैं।’
नवनवीन आव्हाने स्वीकारून आपले जीवन अधिक सुंदर आणि रमणीय करण्यासाठी आता युवाशक्ती, महिलाशक्ती, जनशक्तीने एकत्रित समर्पण करावयास हवे!

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी करावयाचे अनेक उपाय जितके सोपे तितकेच अवघड. ‘लोकसंख्या नियंत्रण’ हा उपाय तर तरुणांच्याच हातात आहे. आपण करीत असलेल्या लोकप्रबोधनामुळे ‘हम दो हमारे दो’ याचे महत्त्व आपल्या लक्षात आले आहे, पण विकासाच्या वाटा गिळंकृत करणार्‍या प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे अजूनही निग्रह हवा. ‘हम दो हमारा एक’ ही पॉलिसी वापरून चीनने केलेली प्रगती आपण लक्षात घ्यायला हवी. यासाठी राजकीय, सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक स्तरावर कार्य करणार्‍या लोकसेवकांची प्रचंड गरज आहे. धर्म, जाती, वंशभेदापलीकडे जाऊन मानवी कल्याणाचा महत्त्वाचा सोपान म्हणून याकडे पाहिले पाहिजे.

पर्यावरण संरक्षणासाठी मृदसंधारण, जलसंधारण, याचबरोबर औद्योगिक वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ‘आपल्या गरजा जेवढ्या कमी तेवढे प्रदूषण कमी’ हा एक साधा नियम आहे. म्हणून आपली जीवनशैली बदलली पाहिजे. पेट्रोल, डिझेल, लाकूड यासारख्या प्रदूषणावर भर टाकणार्‍या बाबींवर नियंत्रण हवे. वाहनांचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. एक रुपयांची काडीपेटी आणण्यासाठी चार रुपयांचे इंधन खर्च करणे केवळ मूर्खपणा आहे. ए. सी. पंखे, दिवे आवश्यक तेवढेच वापरले तर केवढी बचत होईल. तसीच कमी पाण्यावर घेतलेली पिके पर्यावरणास पोषक ठरतील. निसर्गसंवर्धनाच्या माध्यमातून परिसर विकास ही तर फारच सुंदर कल्पना आहे. विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी, प्राणी, जलचर आणि डोंगर, दर्‍या, खोर्‍या हे निसर्गाच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा समतोल राखणे आपल्याच हातात आहे.

मानवी अस्तित्वासाठी प्राणवायूचा पुरवठा, घरे बांधण्यासाठी/ फर्निचरसाठी/ जळणासाठी, पोषणासाठी लाकूड हे मूलतत्त्व आहे. त्याशिवाय पर्जन्यमान, हवामान संतुलन यासाठी वृक्षांचे संवर्धन विलक्षण महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीने प्रतिवर्षी एक वृक्ष आपल्या वाढदिवशी लावून त्याचे संगोपन करणे यासारखा सृजनशील छंद नाही. एक झाड 200 माणसांना पुरेल एवढा प्राणवायू उत्सर्जित करीत असते. याचा विचार केल्यास केवढे तरी जीवनदानाचे पुण्यकर्म आपल्याला करता येईल. स्मृती उद्यानासारख्या संकल्पनांमधून आपण हाच महान विचार समाजासमोर मांडतो.