आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरित अर्थव्यवस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून 1972. स्टॉकहोममध्ये युनायटेड नेशनची परिषद. विषय मानवीय पर्यावरण (Human Environment). 5 जूनपासून 10 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये 5 जून हा दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी एका शहराची निवड करण्यात येते आणि तो त्या संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू असतो. त्या दिवशी जगभरातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येतात आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये म्हणून काय नवीन उपाययोजना करता येतील त्याबाबत चर्चासत्र चालते. दरवर्षी एक नवीन विषयसूत्र (theme) ठरवले जाते आणि त्या अनुषंगाने या मान्यवर व्यक्ती आपापले विचार मांडतात. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जातात आणि पुढील कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाते.
या वर्षीचे विषयसूत्र आहे ‘हरित अर्थव्यवस्था’. आता प्रश्न पडतो, ‘हरित अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय?’ सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सामान्य नागरिकांनी आणि कंपन्यांनी आपापल्या परीने सहभागी होऊन पैसे आणि श्रम खर्च करून वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे, जैविक विविधता आहे त्याचा नाश होणार नाही याची काळजी घ्यायची, कार्यक्षमता वाढवायची आणि ऊर्जेची बचत करायची. हे सर्व साध्य करण्यासाठी सरकारने कायद्यामध्ये योग्य ते फेरफार करायचे, धोरणांमध्ये सुधारणा घडवून आणायच्या आणि त्यासाठी जनकल्याणासाठी जो निधी असतो त्यामध्ये योग्य ती तरतूद करायची. 2011 च्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश भारत होता आणि त्याचे विषयसूत्र होते, ‘जंगले वाढवा’. जगातील सुमारे 160 कोटी जनतेचे जीवन पूर्णत: जंगलांवर अवलंबून असते, त्यासाठी पृथ्वीचा एक तृतीयांश भाग तरी जंगलांनी व्यापला जाणे आवश्यक आहे. जंगलांमुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण राखले जाते, कार्बन डायआॅक्साइड वायूच्या प्रमाणावर नियंत्रण येते, पावसाचे प्रमाण वाढते, दुष्काळाची शक्यता कमी होते. थोडक्यात, पर्यावरणातील समतोल राखला जातो.
5 जून 1972 पासून दरवर्षी एक नवीन विषय घेऊन त्यानुसार बनवलेल्या कार्यक्रमाचा पाठपुरावा करायचा, हा जागतिक पर्यावरण दिनाचा मूळ उद्देश. पाणी वाचवा, जंगले वाढवा, कारखान्यांमुळे तयार होणा-या प्रदूषणावर नियंत्रण करा, वाळवंटाचे विस्तार आटोक्यात ठेवा, गरिबी निराकरण, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण अशी अनेक विषयसूत्रे घेऊन दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. सामान्य नागरिकांपर्यंत हे संदेश पोहोचले जावेत म्हणून विविध कार्यक्रमांची आखणी केली जाते. आपल्या देशात आजपर्यंत इतके वृक्षारोपण झाले आहे की त्यापैकी 10 टक्के झाडे जरी आज जिवंत असती तर माणसांना राहण्यासाठी जागाच राहिली नसती. आपल्या इथे अशा कार्यक्रमांमध्ये अवडंबर जास्त आणि गांभीर्य कमी हा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण सर्वजण वैयक्तिक पातळीवर हा कार्यक्रम राबवत नाही, तोपर्यंत त्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही.
आता प्रश्न पडतो, वैयक्तिक पातळीवर मी काय करायचे? दररोजच्या जीवनात आपण खूप काही चुका करत असतो. आपल्याला त्याचे भानही नसते. त्या गोष्टीची काळजी घेतली तर पर्यावरण संतुलनाच्या बाबतीत आपण फार मोठे योगदान दिल्याचे समाधान मिळेल. विजेची बचत - काही मिनिटांसाठीही खोलीच्या बाहेर जाणे झाले तर लाइट बंद करायचा. मिक्सर, ओव्हन यासारखी उपकरणे कायमस्वरूपी वापरात नसतात. काम झाले की त्यांचा प्लग काढून ठेवायचा. विजेचे बटन बंद असेल तरीही त्यात सूक्ष्म प्रवाह चालू असतो.
घरामधील ओला व सुका कचरा वेगळा करावा. शक्य असेल तर भाजीपाल्याच्या टाकाऊ भागाचा गांडूळ खतासाठी वापर करावा. आपल्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये किंवा सामूहिकरीत्या हा कार्यक्रम राबवता येतो. कल्पना जरा विक्षिप्त किंवा किळसवाणी वाटते, परंतु त्यामुळे टाकाऊ भागाचा चांगल्या कामासाठी उपयोग होतो आणि पहिल्या पावसानंतरच्या मातीच्या सुगंधाइतका छान सुगंध वातावरणात पसरतो. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. घरामधील कुंड्यांमध्ये जी रोपे असतात, त्यांना दिवसाकाठी 200 मि. लि. पाणी पुरेसे असते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी वापरले जाते आणि त्यातील अर्धेअधिक वाया जाते. गोष्ट क्षुल्लक वाटते. जरा विचार करा. आपल्या गल्लीत किती कुंड्या आहेत आणि दर कुंडीमागे दररोज 300 मि. लि. पाणी वाचले तर अख्ख्या गल्लीमागे किती वाचेल? हा हिशेब केला तर विषयाचे गांभीर्य लक्षात येईल. रस्ता कितीही रिकामा असला तरी 50 ते 60 कि. मी. पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणार नाही, असा स्वत:वर निर्बंध घालून घ्या. जास्त वेगामुळे अनाठायी वाया जाणा-या पेट्रोलची बचत होईल. हे खिशालाही परवडेल आणि पर्यावरण संतुलनालाही हातभार लागेल.अशा प्रकारे एक ना अनेक गोष्टी आपण वैयक्तिक स्तरावर करू शकतो. वर वर त्या फार किरकोळ वाटतात, परंतु प्रत्येकाने स्वत: तयार केलेला हा खारीचा वाटा पर्यावरणावरील संकटावर मात करण्यासाठी फार मोलाचा आहे.