आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुस्ती चीतपट? ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ग्रीकांच्या प्राचीन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांपासून कुबर्तिन यांच्या आधुनिक ऑलिम्पिकपर्यंतच्या क्रीडा चळवळीचा अविभाज्य अंग असलेला कुस्ती हा क्रीडाप्रकार 2020 च्या ऑलिम्पिकमधून बाद करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीने मंजूर केला आहे. जगभरातील क्रीडाक्षेत्रच त्यामुळे हादरले आहे. अनेक डावपेच लढवून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवणा-या या खेळालाच त्यांच्या शिखर संघटनेने अस्मान दाखवले आहे. दुबळे टेलिव्हिजन रेटिंग, या खेळादरम्यान होणारी कमी तिकीट विक्री, उत्तेजकांचा या खेळाला झालेला प्रार्दुभाव आणि जागतिक स्तरावर या खेळाची घटलेली लोकप्रियता यामुळे ऑलिम्पिक खेळांचा आत्मा असलेल्या या खेळाला आज बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

एकेकाळी ऑलिम्पिक क्रीडा चळवळीचा आत्मा असलेला हा खेळ आज प्रसिद्धी आणि झगमगाट असलेल्या क्रीडा क्षेत्रात हातात कटोरा घेऊन 2020 च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी उभा आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, रोलर स्पोर्ट्स, क्लाइंबिंग, स्क्वाश, वेकबोर्डिंग आणि वूत्शू या खेळांच्या पंक्तीत या पारंपरिक खेळाला टाकण्यात आले आहे. आयओसीची मेहेरनजर झाल्यास या आठ क्रीडाप्रकारांमधून कदाचित कुस्तीला पुन्हा एकदा ऑलिम्पिक प्रवेश दिला जाईल. आयओसीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची सवय आहे. आपली स्वायत्तता दाखवण्याच्या आडून त्यांनी वेळोवेळी शक्तिप्रदर्शन केले आहे.

प्राचीन ऑलिम्पिकमधील या मुख्य क्रीडाप्रकाराचा गळा घोटताना आयओसीने हा खेळ खेळणा-या देशांची संख्यादेखील विचारात घेतली नाही. अमेरिका, जपान, युरोप, रशियामध्ये हा खेळ लोकप्रिय असूनही कुस्तीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र तसे करताना आयओसीच्या कार्यकारिणीने साळसूदपणाचा आव आणून कुस्ती या खेळात काहीच कमतरता नाही, असेही नमूद केले आहे. 2020 च्या ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेले अ‍ॅथलेटिक्स, रोइंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग, सायकलिंग, इक्वेस्टेरियन, फेन्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, स्विमिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन, तायक्वांदो, टेबल टेनिस, शूटिंग, आर्चरी, ट्रायथलॉन, सोलिंग, व्हॉलीबॉल हे 25 खेळ मुख्य असल्याचा आयओसीचा दावा आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता बदलत चालला आहे.

जाहिरातदार, टेलिव्हिजन रेटिंग व मिळणारा पैसा यांनाच अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे ग्रीक ऑलिम्पिक चळवळीचा ‘शोपीस’ म्हणून पाहिले जात असलेल्या या खेळाकडे वक्रदृष्टीने पाहण्याचे धाडस आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही कुणाला झाले नव्हते. 1990 च्या पॅरिस ऑलिम्पिकचा अपवाद वगळता आधुनिक ऑ लिम्पिकमध्येही सातत्याने खेळला जाणारा हा क्रीडाप्रकार अचानक अप्रिय का ठरला, हे एक कोडे आहे. 180 देशांचे प्रतिनिधित्व या खेळाला लाभत असतानाही हा खेळ अप्रिय कसा ठरू शकतो? अमेरिकेपासून जपानपर्यंत आणि रशियापासून संपूर्ण युरोप खंडापर्यंत आणि इराणपासून भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात या खेळाची पाळेमुळे घट्ट झाली असतानाही, हा खेळ ऑलिम्पिक चळवळीपासून कसा वेगळा केला जातो? ऑलिम्पिक खेळांचा विचार मनात आला की सर्वप्रथम कुस्ती करणा-या मंडळाचीच प्रतिमा नजरेसमोर येते.

टेलिव्हिजन कॅमे-यांच्या चौकटीत सहज बसणा-या या खेळाला फुटबॉल मैदानाच्या मोठ्या व्याप्तीचा वेग नसेलही; बास्केटबॉल या खेळात सतत उंचावणा-या उंचीचे आव्हानही नसेल; मात्र ऑ लिम्पिक ब्रीदवाक्यातील ‘बलशाली’ या शब्दाची वारंवार जाणीव करून देणारा हा खेळ आहे. ग्रीको-रोमन स्टाइल आणि फ्रीस्टाइल यांनी नियमांच्या चौकटीत अधिक घट्ट बसलेला हा खेळ भारतासारख्या खंडप्राय देशात मातीच्या आखाड्यात एक परंपरा बनून राहिलेला आहे. मातीतून हा खेळ मॅटवर आला आणि भारतात तरी या खेळाची रयाच निघून गेली. राजे-महाराजे यांचा आसरा लाभलेला हा खेळ जनमानसातही आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करू शकला. मॅटवरील शिस्तीच्या कुस्तीला आज आखाड्यांच्या कुस्तीची मजा नव्हती, फडांची लोकप्रियता नव्हती. तरीही ऑलिम्पिकमध्ये झेंडा घेऊन जाणा-या भारतीयांशी हे सारे कुस्ती रसिक इमान राखून होते. महाराष्ट्रातल्या विविध गावांमधील तालमीमधील उपस्थिती आता रोडावू लागली, हे जरी खरे असले तरीही त्याच परंपरांमधील कुस्तीमध्ये हजारो, लाखो प्रेक्षक कुस्तीच्या फडांकडे खेचून आणण्याची ताकद आजही आहे.

जुन्या आणि नव्या कुस्तीच्या रस्सीखेचीमध्ये हा खेळ मात्र पुढे न जाता तेथेच खिळून राहिला. भारताप्रमाणे जगातील अन्य देशांमध्येही या खेळाने अशीच लोकप्रियता मिळवली आहे. कुस्ती या खेळाची प्रत्येक देशामधील, खंडांमधील रूपे विविध आहेत. नियम वेगळे आहेत, स्वरूप वेगळे आहे. जपानमधील ‘सुमो’ कुस्ती आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करू शकली. भीमकाय देहयष्टीचे सुमो मल्ल आणि त्यांची वेगळ्या शैलीची कुस्ती जपानमध्ये खेळ आणि पावित्र्य अशा दोन्ही बाजूंचे दर्शन घडवणारी ठरली. मार्शल आर्ट्सच्या प्रकारांचा आधार घेत तयार झालेली ‘कॉम्बॅट’ कुस्ती मिलिटरी, पोलिस, सुरक्षा रक्षक यांमध्ये लोकप्रिय ठरली. 6 मीटर्सच्या परिघात समुद्रकिना-या वरच्या वाळूत खेळली जाणारी ‘बीच’ कुस्ती आधुनिक युगातली. तुर्कस्तानात तेल लावून होणारी कुस्ती ‘ग्रीस’ कुस्ती म्हणून लोकप्रिय आहे. ऑलिंट ऑइल लावून लढणा-या मल्लांची कुस्ती पाहणे टर्की लोकांचा आवडता छंद आहे. तुर्कस्तानचा तो राष्ट्रीय खेळच आहे. एकेकाळी प्रदीर्घ काळापर्यंत म्हणजे दोन दिवसांपर्यंत चालणा-या या कुस्त्यांचा कालखंड आता 40 मिनिटांवर आणण्यात आला आहे. सोव्हिएत युनियनमध्ये ‘सांबो’ या नावाने खेळली जाणारी कुस्ती लोकप्रिय आहे. हत्याराशिवाय खेळल्या जाणा-या या कलेचे शिक्षण स्वरक्षणार्थ घेतले जायचे. ग्रीको-रोमन शैलीतील कुस्ती आणि ज्युडो यांचे मिश्रण करून हा कुस्तीचा प्रकार तयार करण्यात आला होता. ‘पॅन्कारर्शन’ ही ग्रीक लोकांची कुस्ती शैली. जगाच्या विविध भागांमध्ये अशी वेगवेगळ्या शैलीमध्ये आणि नावाने कुस्ती खेळली जायची, आजही खेळली जाते. त्या सर्वांच्या शैलीची एकत्र मोट बांधण्याचे अभूतपूर्व कार्य आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने केले होते. तब्बल 180 देशांना एकत्र बांधणे हीच अवघड गोष्ट आहे. ते अग्निदिव्य पार करणा-या संघटनेवर आयओसीने केलेला आघात मोठा आहे. पराभवातूनही विजयाकडे पाहण्याची शिकवण देणारा हा खेळ पूर्णपणे चीतपट झालेला नाही. येत्या मे महिन्यात सात खेळांच्या बरोबरीने कुस्ती या खेळाला 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये समावेशाबाबत आपली बाजू समर्थपणे मांडता येईल.