आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैश्विक जाणिवांचा बंडखोर लेखक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक आणि कवी ‘झाले बहु होतील बहु’ पण वैश्विक जाणिवांना प्रत्यक्ष जीवनात आणि लिखाणात उतरवणारा बंडखोर लेखक म्हणून कै. विश्राम बेडेकर रसिक वाचकांच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. बेडेकरांचे लिखाण नवनव्या विषयांचा शोध घेत असे. प्रचलित साहित्यातील गुळगुळीत वाटा नाकारून अनेकदा बेडेकरांनी प्रयोगशील धाडसी लिखाण केले आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील मोलाची कामगिरी म्हणून ‘ब्रह्मकुमारी’ (नाटक), ‘रणांगण’ (कादंबरी) ‘सिप्लिसबर्गची पत्रे’ (प्रवासपत्रे) आणि ‘एक झाड दोन पक्षी’ (आत्मचरित्र) ही पुस्तके अमर अक्षरे ठरतात. खरे तर कै. विश्राम बेडेकरांसारख्या मुक्त प्रतिभेच्या लेखकाची ओळख करून देणारा लेख लिहिण्याची विवेक जोशीसारखा लेखकास गरज नसते. असे लेखक आपल्या स्वयंतेजाने चमकत असतात. मग लिखाणाचे प्रयोजन कै. विश्राम बेडेकरांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करणे हेच आहे. 13 ऑगस्ट 1906 रोजी जन्मलेल्या कै. विश्राम बेडेकरांची 13 ऑगस्ट 2013 ही 107वी जयंती आहे. बेडेकरांचे साहित्य गूढ प्रतिभेप्रमाणे आहे. बर्फाच्छादित हिमशिल्पांसारखे कळो वा न कळो, पण ओळखीच्या खुणा सांगणारे लिखाण, पूर्वजन्माच्या वाटांवरील प्रवास भासतो. असा लेखक शतकात एखादाच जन्मतो.

‘ब्रह्मकुमारी’ हे नाटक एका खुन्नसने लिहिले होते. हरिभाऊ मोटे आणि बेडेकर एकदा रेल्वेने प्रवास करीत होते. तेव्हा रेल्वेच्या स्टॉलवर हरिभाऊ मोट्यांनी एक नवे नाटक वाचावयास विकत घेतले. विश्राम बेडेकरांनी ते चाळून पाहिले आणि ‘भिक्कार’ म्हणून चक्क रेल्वेच्या खिडकीतून भिरकावून दिले. मित्राचे हे विक्षिप्त कृत्य पाहून हरिभाऊ चिडले आणि आश्चर्यचकितही झाले. चिडण्याचे कारणही तसेच होते. ते नाटक होते नाट्याचार्य ही पदवी प्राप्त असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे! रसिकमान्य लेखकाला बेडेकर ‘भिकार’ ठरवत होते आणि तेही स्वत: काहीही न लिहिता! त्यांच्या मित्राला त्यांचा हा विक्षिप्तपणा चांगलाच झोंबला. त्यावर हरिभाऊ मोटे म्हणाले, ‘विश्राम, टीका करणे फार सोपे आहे.’ एवढे बोलून ते खिडकीबाहेर पाहू लागले. त्यावर बेडेकर उत्तरले, ‘खाडिलकरांनी एक चांगला पौराणिक विषय अगदीच वाया घालवला आहे. यावर एक चांगले नाटक मीच लिहून दाखवतो.’ आणि बेडेकरांनी लिहिलेले ते नाटक म्हणजे ‘ब्रह्मकुमारी’!

बेडेकरांनी 1939 (ऑगस्ट, सप्टेंबर)मध्ये ‘रणांगण’ ही पहिली कादंबरी लिहिली. ती निनावी छापली आणि त्या कादंबरीला रसिकांची नि:संदिग्ध मान्यता मिळायला पुरी 20 वर्षे उलटावी लागली. आज ‘रणांगण’ ही कादंबरी मराठी साहित्यातील कादंबरीचा एक मापदंड मानला जातो. आयुष्यात एकच कादंबरी लिहून समग्र कादंबरी वाङ्मय साहित्य प्रकारावर आपला ठसा उमटवणारी ही प्रतिभा शतकातून एकदाच प्रगटते. 74 वर्षांपूर्वीच अशी प्रतिभा बेडेकरांच्या लेखणीतून मराठी साहित्य क्षेत्रात तळपती आहे. वाजे पाऊल आपुले, नरो वा कुंजरो वा, टिळक व आगरकर ही नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली. चित्रपट व नाट्यसृष्टीच्या इतिहासात ‘विश्राम बेडेकर’ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांचे त्या व्यवसायातील अपयशही थोरच ठरले. प्रतिभेच्या प्रवाहाविरुद्ध पोहून समकालीनांपेक्षा विलक्षण वेगळे असे काही करून दाखवणे की जेणेकरून त्या त्या क्षेत्रांवर ठसा कायमचा उमटवणे ही बेडेकरांची विलक्षण जिद्द होती. ‘एक झाड दोन पक्षी’ या वैशिष्ट्यपूर्ण आत्मचरित्रात लेखकाने दोन व्यक्तिमत्त्वे साकारलेली आहेत. एक जीवन जगणारा माणूस, शोक-अशोक भोगणारा आणि दुसरा या सर्वांचा साक्षीदार लेखक! एक उपभोक्ता आणि दुसरा तटस्थ निरीक्षक. बेडेकरांच्या वाङ््मयीन व्यक्तिमत्त्वात ही दोन प्रतिबिंबे आहेतच.

आयुष्याच्या एकाच देठावर असलेली दोन पुष्परूपे! नाटक, कादंबरी, चित्रपट या तिन्ही क्षेत्रांवरचे हे ‘एक झाड दोन पक्षी’ आत्मचरित्र अपूर्व, अमर झाले आहे. या सर्व लेखनावर कळस चढवला तो त्यांच्या ‘एक झाड आणि दोन पक्षी’ या आत्मचरित्रानेच! 1984 मध्ये प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्राला मराठी साहित्य क्षेत्रात ध्रुवतार्‍याचे अढळ स्थान प्राप्त झाले आहे. यापूर्वी स्वत:कडे त्रयस्थ आणि तटस्थपणे पाहून आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न कुणीही केला नव्हता.

सुमारे पंचाहत्तर वर्षांच्या जीवनाचे पृथक्करण करताना बेडेकरांनी त्यांच्याच गुण-दोषांच्या चिंतनाचे पैलू या आत्मचरित्रात प्रकाशित केलेले आहेत. एकच खरे आहे की, प्रत्येक नवनिर्मितीवादी व्यक्ती जीवनाचा नायक-नायिका असते. अशा लेखकांच्या साहित्यकृतींचे अभूतपूर्व व अमरत्व हे काळच ठरवत असतो. समकालीनांना त्यांच्या साहित्यकृतीच्या मोठेपणाचे आकलन होत नाही. पुढील काळाची कठोर पावले साहित्यकृतींचे अस्तित्व ठरवत असतात. काळाची ही पावले कदाचित आजची अनेक मातब्बर नावे मिटवून टाकतील. स्मृतिचित्रे, क-हेचे पाणी, बनगरवाडी, चिमणरावांचे च-हाट, कोसला, स्वामी, ययाति, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली यांच्यासारखी बोटांवर मोजण्यासारखी काही पुस्तके असतील, पण ‘रणांगण’ हे नाव आणि विश्राम बेडेकर हे नाव अमीट असेल. मागील 74 वर्षांची साक्ष आहे. पुढील शेकडो वर्षे अशीच जावोत.