आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धरली काेटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकानुशतकापासून पिचलेल्या समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून देत, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने बहाल केला, ते विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर म्हणजे अखिल मानवासाठी मुक्तीची द्वारे खुले करून देणारा मुक्तिदाता अाहे. अांबेडकरी विचारांमुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अार्थिक अाणि राजकीय जीवनात झालेला बदल अाश्चर्यकारक म्हणता येईल. ‘शिका, संघटित व्हा अाणि संघर्ष करा,’ या मूलमंत्राने तर दलित जीवनात नवा प्रकाश पेरण्याचे काम केले अाहे. शिक्षण वाघिणीचे दूध अाहे. ते प्राशन केले तर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. जणू याचाच कित्ता समाजाने गिरवत शिक्षणाला सर्वांगीण सुधारण्याचे हत्यार बनवले अाहे. त्याच बळावर डाॅ. भालचंद्र मुणगेकर, डाॅ. नरेंद्र जाधव, डाॅ. वासुदेव गाढे, डाॅ. सुधीर मेश्राम, डाॅ. चाेपडे यांनी कुलगुरूपदापर्यंत झेप घेतली. हमालपुऱ्यातील अर्थात झाेपडपट्टीतील मुलगा बाबासाहेबांच्या विचारांनी विद्यापीठाचा कुलगुरू हाेताे. ही घटना ‘शिक्षणाचे’ माेल सांगण्यासाठी पुरेशी अाहे. अाज जनगणनेचा अाधार घेऊन अस्पृश्यातला बाैद्ध घटकाची साक्षरता ७४ टक्के एवढी अाहे. 
 
ज्या समाजाला शाळेची पायरी चढण्याची मुभा नव्हती, त्या समाजाने घेतलेला हा ‘टेक अाॅफ’ अाहे. शिक्षणामुळे सामाजिक जीवनात अभूतपूर्व बदल घडून अाला अाहे. साहित्य, नाट्य, संगीत यात गावाकुसाबाहेरील कलावंतांनी अापली छाप साेडली अाहे. कवी वामन कर्डक, प्रल्हाद शिंदे, अानंद शिंदे, विठ्ठल उमप, नंदेश उमप, संजय लाेंढे, संभाजी भगत, प्रतापसिंग बाेदडे, यांनी भीमगीतांचे अांबेडकरी जलशाला प्रबाेधनाचे माध्यम बनवले अाहे. ज्ञानसूर्याच्या वैचारिकतेचा वारसा जाेपासत डाॅ. गंगाधर पानतावणे पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. डाॅ. यशवंत मनाेहर, राजा ढाले, अर्जुन डांगळे, वामन निंबाळकर, उत्तम कांबळे, केशव मेश्राम, बाबुराव बागुल, डाॅ. मनाेहर जाधव, ते प्रज्ञा पवार अशा कित्येक साहित्यिकांची जडण-घडण निव्वळ अांबेडकरी विचारांमुळे झाली. फक्त सामाजिक सांस्कृतिक जीवनात बदल झाला नाही तर अार्थिक सुबत्ता अाणण्याचे काम शिक्षणामुळे झाले. जाेहार मायबाप म्हणणारे हात या देशाच्या उभारणीसाठी झटत अाहेत. ‘डिक्की’च्या माध्यमातून मिलिंद कांबळे यांनी दलित समाजातील लाेकांना उद्याेग उभारणीसाठी उद्युक्त केले अाहे. ‘राजा-राणीच्या जाेडीला, चार इमले माडीला, सांगा कुणाचे याेगदान लालदिव्याच्या गाडीला,’ असा कृतज्ञतेचा सांगावा पाठवत बाबासाहेबांच्या या क्रांती विचाराने ई. झेड. खाेब्रागडे, किशाेर गजभिये, संजय चहांदे, हर्षदीप कांबळे, अार.के. गायकवाड, दिनेश वाघमारे, राजेश डाबरे, उत्तम खाेब्रागडे, अशी कित्येक मंडळी प्रशासनात लालदिव्याच्या गाडीत विराजमान झाली.राजकीय क्षेत्रात प्रकाश अांबेडकर, रामदास अाठवले, जाेगेंद्र कवाडे, चंद्रकांत हांडाेरे, राजकुमार बडाेले, दिलीप कांबळे, लक्ष्मण ढाेबळे, यासारखी दिग्गज मंडळी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवून पाय राेवून उभी अाहेत. ‘जखडबंद पायातील साखळदंड, तटातटा तुटले, तू ठाेकताच दंड, झाले गुलाम माेकळे.... भीमा तुझ्यामुळे!’ लाेककवी वामन कर्डक यांच्या शब्दात बाबासाहेबांची क्रांती एेतिहासिक अाणि भव्य अाहे. याचा प्रत्यय अाल्यावाचून राहत नाही. 
 
(लेखकबेंडाळे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख अाहे.) 
 
बातम्या आणखी आहेत...