आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान कराच! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाकारे-पिटारे, ढोल, ताशे आणि झांज, स्वकर्तृत्वाच्या तुताऱ्या, आश्वासनांची खैरात, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी असे सारे सोपस्कार पार पडल्यानंतर आज राज्यातल्या १० प्रमुख महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांच्या मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत झालेली चिखलफेक बघून अनेकांना त्याचा उबग आला असेल. 
 
 
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आपल्या दैनंदिन जीवनाशी सर्वाधिक निगडित आहे, हे लक्षात घेता ही निवडणूकसुद्धा लोकसभेएवढीच महत्त्वाची असल्याचे समजून प्रत्येकाने आपले शहर बदलण्याकरिता मतदानासाठी बाहेर पडायला हवे. 
 
लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तशा दुर्लक्षित राहतात. पण, खरे पाहता संसदेइतकीच स्थानिक स्वराज्य संस्थाही महत्त्वाची असते.  कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणारे कामकाज दैनंदिन जीवनाशी थेटे निगडित असते. पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, आरोग्य, अंतर्गत रस्ते, वाहतूक, मिळकतविषयक नियम, बांधकाम परवानग्या, स्थानिक कर ही कामे प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असतात. असे असतानाही सामान्यत: या संस्थांच्या कारभारावर आपली फारशी नजर नसते. 
 
माध्यमांद्वारेसुद्धा त्याकडे अपेक्षेनुसार लक्ष पुरवले जात नाही. त्यामुळे देशाच्या वा राज्याच्या अर्थसंकल्पाची जेवढी चर्चा होते त्या तुलनेत महापालिकेच्या वा जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची होत नाही. वास्तवात आपले रोजचे जगणे सुसह्य करायचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्याची सुरुवात मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आणि चांगल्यात चांगले उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून देऊन करायला हवी. 
 
मात्र, नेमकी इथेच अनेकांची गफलत होते. अर्थात त्यामागे कारणेही आहेत. राजकारण्यांची लयाला गेलेली विश्वासार्हता, गुंड-पुंडांना सामावून घेण्यासाठी पक्षोपक्षांत लागलेली चढाओढ, प्रचाराच्या उडवली जाणारी बेछूट आरोपांची राळ,अशा वातावरणात नको ते राजकारण, असे अनेकांना वाटू लागते. या निवडणुकांमध्येसुद्धा राजकीय पटलावर वेगळे काही घडलेले नाही. एकमेकांवरील चिखलफेकीत नागरी प्रश्न, मूळ मुद्दे तसे बाजूलाच पडले आहेत. पण, त्यासाठी दोष फक्त राजकारण्यांना देता येणार नाही. 
 

सर्वसामान्यांची वा मतदारांची उदासीनतासुद्धा त्याला तेवढीच जबाबदार आहे. कारण, एरवी सरकारच्या कामावर ऊठसूट टीका-टिप्पणी करणारा मध्यम, उच्च मध्यम आणि विशेषत: उच्चभ्रू वर्गच मतदानासाठी टाळाटाळ करताना दिसतो. मतदानाच्या सुटीत सहकुटुंब जवळपास कुठे तरी पर्यटनाला जाऊन मतदानाकडे पाठ फिरवण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत आहे. त्यातून एकप्रकारे आपणच राजकारण्यांना वाट्टेल तसा कारभार करण्यासाठी मोकळे रान देत असतो. 

कारण, पांढरपेशा वा विचारी मंडळींचा भर कृतीऐवजी उक्तीवरच अधिक असतो हे चाणाक्ष राजकारणी जाणून असतात. त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी झोपडपट्ट्या, गरीब वस्त्या, आर्थिकदृष्ट्या खालचा वर्ग यांना आपल्याकडे वळवून मते आपल्या पारड्यात पाडून घेतात. अलीकडे तर दुर्दैवाने काही मध्यमवर्गीय वा उच्चभ्रू रहिवासी संकुलातील मंडळीसुद्धा राजकारण्यांकडून इमारत रंगवून घे, सोसायटीसाठी एखाद्या खेळाचे साहित्य घे असे तात्कालिक लाभ पदरात पाडून घेतात. 

राजकारणी मंडळीही या काळात मतदारांची सारी बडदास्त ठेवतात आणि एकदा निवडून गेले की पुन्हा फिरकायचीही तसदी घेत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला नगरसेवक कोण किंवा प्रभाग कोणता त्याचेही विस्मरण होते. हे टाळायचे असेल आणि आपले गाव, शहर तसेच देश बदलायचा असेल तर त्याची सुरुवात मतदानापासून करायला हवी. विविध विधायक उपक्रमांत अग्रेसर असणाऱ्या ‘दिव्य मराठी’ने त्यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला आहे.

 स्थानिक रहिवाशांच्या अपेक्षांनुसार बनवलेला प्रभागनिहाय जाहीरनामा असो की संख्येने ५० टक्के असणाऱ्या महिलांना राजकीय प्रवाहात सक्रिय करण्यासाठी हाती घेतलेले ‘ती’ची निवडणूक हे अभियान असो, ते सुरू करण्यामागे लोकांना राजकीयदृष्ट्या सजग करावे, त्या माध्यमातून चांगले उमेदवार निवडून जावेत आणि मतदानाचा टक्का वाढावा हाच प्रमुख उद्देश आहे. 

नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावतीसह ठिकठिकाणच्या वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला ही बाब नक्कीच आशादायी आहे. सकारात्मकतेवर भर देणाऱ्या दैनिक भास्कर समूहाने त्याच मानसिकतेतून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे व्रत स्वीकारले आहे. तेव्हा आज जिथे जिथे मतदान होत आहे, तिथल्या प्रत्येकाने आपले परम कर्तव्य समजून मतदान करायलाच हवे.
 
बातम्या आणखी आहेत...