आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’ची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्तू आणि सेवांची प्रचंड मागणी असलेला देश म्हणून जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारताच्या या ‘ग्रोथ स्टोरी’वर त्यांचा विश्वास आगामी काळात आणखी वाढणार आहे. मग त्याकडे आपल्याला कसे दुर्लक्ष करता येईल?
आपण आपल्या देशाविषयी सध्या काय म्हणतो हे राजकीयकोलाहलात अनेकदा शोधावे लागते. मात्र परकीय गुंतवणूकदार आणि देशाच्या आर्थिक विकासाची फळे चाखणारे आपल्याच देशातील श्रीमंत नागरिक भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर सध्या खुश आहेत. देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्यास एक ठिणगी पुरेशी आहे आणि विषमता वाढत चालली ही गोष्ट खरीच आहे, पण जगाचे अर्थकारण सतत गटांगळ्या खात असताना जगाचे (सर्व विसंगती मान्य करूनही) भारताकडे लक्ष आहे हेही तेवढेच खरे आहे. असे का? असे कोणा तज्ज्ञाला विचारले तर त्याचे एक ठरलेले उत्तर आहे, ते म्हणजे भारताचे ‘फंडामेंटल स्ट्राँग’ आहेत, म्हणजे आर्थिक विकासाला पोषक ज्या मूलभूत गोष्टी लागतात त्या मजबूत आहेत. तज्ज्ञ म्हणतात, ते खरे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे कळण्यासाठी तज्ज्ञ असण्याची खरे तर काही गरज नाही.
भारत हा जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांत सर्वाधिक वेगाने (७.६ टक्के) विकास करणारा देश आहे यावर जगाने आता शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या बुधवारी राज्यसभेने जीएसटीचे विधेयक एकमताने मंजूर करून आणि त्याच वेळी देशात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने हा वेग नजीकच्या काळात आणखी वाढू शकतो असा विश्वास दिला आहे. जीएसटी ही काही जादूची कांडी नाही आणि त्याचे परिणाम दिसून येण्यास अजून वेळ लागणार आहे हे मान्य करूनही करांची गुंतागुंत आम्हाला नको आहे, असा संदेश संसदेने एकमताने दिला हे अतिशय महत्त्वाचे आहे. वरुणराजाची कृपा तर छप्पर फाडके झाली आहे. त्यामुळे देशाला भेडसावणाऱ्या सर्वात गंभीर अशा पाणीटंचाईशी मुकाबला करण्यात जी शक्ती खर्च होते ती आता वाचणार आहे. कळीच्या प्रश्नावर राजकीय पक्ष आणि नेते समजूतदार भूमिका घेऊ शकतात आणि निसर्गाने साथ दिली तर भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’ला कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
भारताच्या वेगवान विकासाला मर्यादा असल्याचा चीनचा दावा आहे आणि चीनच्या वेगाने भारत पळू शकणार नाही असे तेथील तज्ज्ञ मंडळींना वाटते ते शंभर टक्के खरे आहे. हुकूमशाही आणि लोकशाही देशात तेवढा फरक राहणार आणि तो राहिलाच पाहिजे. कारण त्या वेगाने केलेल्या विकासाचे काय होऊ शकते हे तेथील महापुरांनी, शहरांतील जीवघेण्या दूषित हवेने आणि बांधून रिकाम्या पडलेल्या ‘घोस्ट सिटी’ने दाखवून दिले आहे. त्यामुळे तो वेग आम्हाला नकोच आहे. अर्थात, आमची वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची वाढती गरज लक्षात घेता सातच्या घरात अडकून पडणे भारताला परवडणारे नाही. त्याला किमान आठ ते नऊचा वेग गाठावाच लागणार आहे.

भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’ची गोष्ट असे सांगते की, ते अजिबात अशक्य नाही. त्याची कारणे अशी (१) मान्सूनने उत्तम साथ दिली असून त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवांना मागणी वाढेल. (२) वाढणारा मध्यमवर्ग आणि सातवा वेतन आयोग यामुळे शहरांतीलही वस्तू आणि सेवांची मागणी सातत्याने वाढतेच आहे. (३) देशाचे आर्थिक गणित बिघडविणाऱ्या इंधनाचा दर गेले दीड वर्ष कमी राहिला असून पुढील वर्षभरात तो प्रतिपिंप ५० ते ६० डॉलर राहील, असा अंदाज आहे. शिवाय सोन्याची मागणीही कमी झाल्यामुळे आयात-निर्यात व्यापारातील तूट मर्यादेत राहिली आहे. त्यामुळेच वित्तीय तूट ३.९ टक्के म्हणजे आवाक्यात राहिल्याने भारत हा आर्थिक शिस्त पाळणारा देश असल्याचा संदेश जगाला गेला आहे. (४) सरकारने अलीकडेच अनेक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. (५) ब्रिटन युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्याचा फटका भारताला जगाच्या तुलनेत कमी बसला. त्यामुळेच भारतीय चलन जगाच्या तुलनेत कमी घसरले आहे. (६) भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असल्याने जगात वस्तूंच्या किंमती कमी झाल्याचा फायदा भारताला सर्वाधिक होतो. जगातील मागणी रोडावल्याने वस्तूंच्या किमती पुढे वर्षभर वाढण्याची शक्यता नाही. (७) अनिवासी भारतीयांच्या वाढलेल्या ठेवी आणि सोन्याची आयात कमी झाल्याने रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलनाचा (प्रामुख्याने डॉलर) साठा ३६० अब्ज डॉलर इतका झाला आहे. तो अतिशय चांगला मानला जातो (आखातातील पडझडीचा काही प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतो). (८) राजकीय स्थैर्य आर्थिक विकासात फार महत्त्वाचे असते. ते भारतात असल्याने त्याचा गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होतो आहे. (९) इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारत काही घरे पुढे सरकला असून जीएसटीमुळे त्यात आणखी सुधारणा होणार आहे. (१०) आधार, जनधनसारख्या योजना आणि डिजिटल इंडियामुळे काळ्या पैशांचे प्रमाण आणि सरकारी योजनांतील गळती कमी झाली असून व्यवहारांत पारदर्शकता येऊ लागली आहे. भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर आपण विश्वास ठेवला पाहिजे याची अशी हजार कारणे आहेत. प्रश्न आहे, आपला आपल्या देशावर विश्वास आहे का?
(ymalkar@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...