आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारू मोकाट सुटलेल्या मुजोरीला लाथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या...आपण महान आहात. आपला जन्म आम्ही साजरा करू शकलो नाही, करंट्या माणसांना काय कळणार की या भूतलावर आणखी एक मसिहा उगवला आहे. आपल्या थोरपणाची सर्व चिन्हे पाळण्यात दिसू लागली होती म्हणूनच आपण बालवाडीत, शाळा, कॉलेजात सेनापती झालात. करंट्या माणसांनी मग आपली चूक मान्य केली आणि आपल्या जन्मदिनी उत्सव साजरे करायला सुरुवात केली. तेव्हापासून आपल्याच कृपेने करंट्या माणसांच्या पोटात दोन गोड घास जायला लागले.....

आपल्या पायाला लागलेली माती आम्ही आमच्या मस्तकी लावू लागलो आणि आपलाच झेंडा फडकावत ठेवू लागलो. त्यामुळेच तर आपण आम्हाला आपल्या कळपात सामील करून घेतलंत, मग डोक्यावर टोप्या आल्या आणि कधी-कधी खांद्यावर शालही. आमचे, आमच्या कुटुंबीयांचे, आमच्या नातेवाइकांचे जिणे सुखी झाले. म्हणजे आम्हाला रेशनवर धान्य, साखर, तेल आणि गावात सलाम मिळू लागले आणि म्हणून तर करंट्या माणसांच्या घरादारांना रंग चढू लागले ....
मुलाला बालवाडीत प्रवेश मिळत नव्हता तेव्हा, बायकोची बदली होत नव्हती तेव्हा, सोसायटीचे कर्ज मिळत नव्हते तेव्हा, सरकारी पास मिळत नव्हता तेव्हा आणि मुलामुलींना पोटापाण्याला लावायचे होते तेव्हाही... आपण नुसत्या फोनवर नाही.. नाही हा नन्नाचा पाढा हो होचा करून टाकलात. आम्ही तर आश्चर्याने आपल्याकडे नुसते पाहतच राहिलो. थक्क झालो. आम्ही तेव्हा आपले खरे मोठेपण जाणले होते... आणि आम्ही किती पामराचा जन्म जगतो आहोत, याची त्याच वेळी जाणीव झाली होती. असे किती प्रसंग विसरलो आम्ही करंटे... पण म्हणूनच तर करंट्या माणसांच्या घरांवर आज गुढ्या उभ्या राहिल्या ....

भाईबंदांनी आणि जातभार्इंनी निवडणुकीत खोडा घातला तेव्हा, गावाच्या मारामारीत पोलिसांनी आम्हास हिसका दाखवला तेव्हा, त्या मास्तरड्याने आमच्याविरुद्ध तक्रार केली तेव्हा आणि बँकेची जप्ती आली तेव्हाही आपणच आमची लाज राखली. आपल्या थोरपणाची अनुभूती यापेक्षा वेगळी ती काय असू शकते ? जगण्याला आम्ही जणू नालायक आहोत, असेच जणू वाटायला लागले होते. मात्र, आपले ते भारदस्त शब्द कानावर पडले आणि धन्य झालो आम्ही. तेव्हापासून तर करंट्या माणसांच्या आयुष्यात ही पालवी फुटली ...

आपल्या कृपेनेच चारीधाम तीर्थयात्रा घडल्या, आमच्या घरासमोरील नाल्या वाहायला लागल्या, रस्त्यात खडी पडली, अतिक्रमण यादीतून आमच्या भिंतीचे नाव वगळले गेले, फुटपाथच्या नव्या फरशा आमच्या ओट्याला लागल्या आणि निवडणुकीच्या ऐन फडात आपण नोटांची गाठोडी दाखवली तेव्हा तर आमची बोबडीच वळली...अन् आणखी एकदा खात्री पटली की आपण महानच आहात आणि आम्ही लहानच आहोत. आपणच आहात ज्यांनी आम्हाला एक वेगळी ओळख दिली. आपल्यासारख्या महान माणसाच्या लहरीवर जगणारा लहान लाचार माणूस.. नाही म्हटले तरी मनाला टोचले.. बोचले.. पण आम्हाला माहीत होते, करंट्या माणसांच्या मंडपातील पताका म्हणजे झिरमिर्‍या आपणच तर पाठवल्या आहेत...

आम्ही मानत होतो की आमच्या कर्तृत्वावर आम्ही संसार उभा केला, पण सराईत जादूगाराने जादू करावी तसे आपल्या इशार्‍यावर आमचे अवयव हलू लागले, तोंड भडाभड बोलू लागले, आपण म्हणाल तसेच चेहरे चढू लागले, हसू आणि आसू .., शिट्या आणि टाळ्या.. याच्याही वेळा आपणच ठरवल्या होत्या, हे लक्षात आले तेव्हा सर्व फडफड संपली आणि आम्ही पुन्हा शरण आलो. सपशेल शरण. एवढेच ना... सारे ठीक होईल या आपल्या आश्वस्त आवाजाने आम्ही पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली.. अवघड होते स्वीकारणे ... पण करंट्या माणसांच्या मनाचा ठाव घेणारे सर्व अड्डे तर आपल्याच कृपेने उजळले आहेत...

सर्व मानवी जीवनाचा आधार असलेली माती आणि ऊन, वारा, पाऊसपाणी... अंत नसलेले आकाश आणि वेळ... निखळ जगण्यासाठी काडी काडी जमा करताना निथळणारा घाम... हे आम्ही जाणतोच. कारण ते नैसर्गिक आहे.

कच्च्याबच्च्यांना वाढवताना अपरिहार्य झालेली कसरत आणि मानवी प्रतिष्ठेसाठीचा अव्याहत सुरू असलेला आक्रोश...तोही आम्ही व्यवहार म्हणून स्वीकारला आहे, पण आता आम्हाला आणि सर्वांनाच कळले आहे ...दिवे चालू-बंद करणारे, पाणी अडवणारे आणि सोडणारे, बांधणारे आणि तोडणारे, खरीदणारे आणि विकणारे आपणच आहात. आपणास एम टॉनिकचा माज चढला आहे. म्हणूनच आता त्या तुम्ही लादलेल्या आमच्यातल्या लाचारीला आणि मोकाट सुटलेल्या तुमच्यातल्या मुजोरीला आम्ही लाथ मारणार आहोत...!