आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिश्रीमंतांचे श्रीमंत पुणे ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक पुण्यात का येतात, याचे ३०-४० वर्षांपूर्वीचे कारण असे सांगितले जात होते की, पुण्यात हवापाणी फार चांगले आहे, पण त्या वेळी पुणेकर होणार्‍यांत निवृत्तांचा वाटा अधिक होता. गेल्या २५ वर्षांत म्हणजे जागतिकीकरणानंतर हे शहर इतक्या वेगाने बदलले आहे की, एका टुमदार शहराचे रूपांतर आज एका महानगरात होऊ घातले आहे. भारतातील महानगरांत पुणे लोकसंख्या आणि आकाराने आठव्या, नवव्या क्रमांकावर विराजमान झाले आहे. पश्चिमेला पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, उत्तरेला चाकण, मंचर, पूर्वेला कोरेगाव भीमा, शिरूर, दक्षिणेला शिरवळपर्यंतचा साडेचारशे चौरस किलोमीटरचा विस्तार आणि प्रति किलोमीटर ६०० लोकसंख्येच्या घनतेमुळे पुणे हे ५० लाखांचे महानगर झाले आहे. सह्याद्रीवर पडणार्‍या पावसाच्या कृपेने मुबलक पाणी, शहरावर पडणारा मध्यम पाऊस, जिल्ह्यात आणि शहरांत असलेली झाडीची चांगली घनता, या सर्व नैसर्गिक देणगीसह आधुनिक पुण्याला राजकीय नेतृत्वाचीही साथ मिळाली आणि पुण्याने कधी मागे वळून पाहिले नाही. आता पुण्याच्या या लौकिकात एक मोलाची भर पडली आहे, ती म्हणजे अतिश्रीमंत लोकांच्या टक्केवारीत पुणे हे अव्वल ठरले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या या पुण्यात श्रीमंतांची संख्या वेगाने वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे.

‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ संस्था जगातील वाढत्या श्रीमंतांची नोंद ठेवते. तिच्या ताज्या अहवालात आशिया-प्रशांत खंडातील २० प्रमुख शहरांत सात भारतीय शहरांचा समावेश आहे. यात पुणे, मुंबई व दिल्लीचा समावेश असून पुण्यात अतिश्रीमंत लोकांचे प्रमाण सर्वाधिक वेगाने वाढते आहे. अहवाल असे सांगतो की, २००४ मध्ये असे पुण्यात ६० अतिश्रीमंत लोक होते आणि २०१४ मध्ये ही संख्या २५० इतकी झाली आहे! असे ‘सुपर रिच’ मुंबई, दिल्लीत साहजिकच अधिक आहेत. मात्र, वाढीचा वेग पुण्यात सर्वाधिक म्हणजे ३१७ टक्के आहे. अतिश्रीमंत किंवा सुपर रिच याचा अर्थ ज्यांची वैयक्तिक संपत्ती १० दशलक्ष डॉलरच्या घरात म्हणजे ६० कोटी रुपयांच्या घरात आहे, तर असे २५० लोक पुण्यात राहतात. गणितच मांडायचे तर असे १५ हजार कोटी रुपयांचे मालक फक्त २५० लोक आहेत!

पुण्यात प्रचंड पैसा आहे, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र, आता जगाच्या व्यासपीठावरून त्याला एक प्रकारे मान्यता मिळाली आहे. इतका पैसा ‘पेन्शनरां’च्या पुण्यात कसा आला, हे जाणून घेतले पाहिजे. सर्वाधिक वाढ ही गेल्या दशकातील आहे, हे लक्षात घेता तो कोठून आला, हे या दशकातील आर्थिक घडामोडींवरून स्पष्ट होते. यात सर्वात मोठा वाटा आहे, तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा. आयटीच्या बंगळुरूखालोखाल कंपन्या पुण्यात आल्या आणि त्यातून चांगल्या वेतनाच्या नोकर्‍या पुण्यात निर्माण झाल्या. त्यांना राहायला घरे पाहिजेत म्हणून लाखो घरांची बांधणी पुण्यात झाली. घरे बांधण्यासाठी जागा हवी. त्यामुळे जागांच्या किमती याच काळात आभाळाला भिडल्या.

पुण्यात देशभरातून विद्यार्थी शिकण्यास येतच होते, त्यात नव्याने राहायला येणार्‍यांची भर पडली. शाळा, कॉलेजांची गरज वाढली. त्यात अर्थातच खासगी शिक्षण संस्था आघाडीवर राहिल्या. बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांची अशी संख्या आता पाच लाखांच्या घरात गेली आहे. या वाढीची लोकसंख्येत नोंद होत नसली तरी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची भर पडते. पुण्यात त्यामुळेच मोठमोठ्या हॉटेलांची संख्या वेगाने वाढली आहे. चांगल्या हवापाण्यात भर पडली ती पुण्याचे असलेले रस्ते, रेल्वे आणि विमान प्रवासाचे उत्तम नेटवर्क. या सोयीमुळे राष्ट्रीय परिषदा, राज्यपातळीवरील कार्यक्रम, बैठका, विवाह समारंभ, संमेलने यासाठी पुण्याची निवड होत गेली आणि त्या माध्यमातून पुण्यात पैसा फिरू लागला. पुणे स्टेशनवरून लोकल गाड्या सोडून दररोज १५० गाड्या धावतात, लष्करी विमानतळ असूनही दररोज चाळीस विमाने उड्डाण करतात, चार मुख्य बसस्थानकांवरून (पिंपरीसह) हजार एसटी बस महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जातात आणि खासगी बस किती जातात, याची तर गणती नाही! यावरून पुण्यातील आवक-जावक लक्षात यावी.

पुणे तेथे काय उणे, असे पुण्याविषयी वर्षानुवर्षे म्हटले जाते आणि या पुण्यात किती काही उणे आहे, असे पटवून देण्याची धडपड माध्यमांत अलीकडे सुरू असते. मात्र, पुण्यातील एक बाहेरचा पुणेकर म्हणून मला विचाराल तर आज देशातील इतर शहरांत जे काही दिसते, त्यापेक्षा इतके काही या शहराला मिळाले आहे की काही कमी आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जे उणे आहे, ते भरून काढण्याचे प्रयत्न ही तर प्रक्रिया आहे आणि ती प्रत्येक शहरात सुरूच असते. त्या न्यायाने पुण्यातही ती सुरूच आहे, पण आधुनिक काळात हे सर्व शक्य होण्यासाठी जे भांडवल म्हणजे पैसा लागतो, तो या शहरात भरपूर आहे. म्हणूनच अनेक सामाजिक संस्था-संघटनांचे देणगी संकलनाची मोहीम याच पुण्यातून सुरू होते. सांस्कृतिक चळवळीला समाजाचा जो पाठिंबा लागतो, तो इथे बर्‍यापैकी मिळतो. म्हणूनच नाटक आणि सिनेमा पुण्यात चालला पाहिजे, यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. अतिश्रीमंतांची नोंद ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ संस्था का करते, हे माहीत नाही; पण व्यापार-उदीम म्हणून जगातील कोणती शहरे पुढील दशकात पुढे जाणार आहेत आणि तेथे आपल्याला कसा पैसा कमवता येईल, त्या शहरांत कोणत्या संधी आहेत, हे जगातील (पुन्हा) श्रीमंतांना चाचपता यावे, या उद्देशाने हे सर्व केले जाते. त्यामुळे पुढील दशकातील गुंतवणुकीचे पुणे हे एक प्रमुख केंद्र असेल, यात शंका नाही.

अर्थात पुण्याची वाढ आता रोखली पाहिजे तरच पुण्याचे हे वैभव कायम राहील, असे शरद पवारांपासून अनेक नेते आणि तज्ज्ञ म्हणत आहेत, त्यालाही आता एक दशक उलटून गेले आहे. मात्र पुणे थांबायला तयार नाही. कारण जेथे भांडवल आहे, जेथे ३१७ टक्क्यांनी वाढणारे अतिश्रीमंत आहेत, त्या शहरात रोजगार संधी, मुबलक पाणी, २४ तास वीज, चांगले रस्ते, सांस्कृतिक श्रीमंती, दर्जेदार शिक्षण, हे सगळे आपोआप येते. पैशाकडे पैसा खेचला जातो, या न्यायाने पुणे शहर आणखी श्रीमंत होत जाणार आहे. पैशांचे हे वाढते महत्त्व आपण कधी मान्य करणार आहोत?

यमाजी मालकर
सल्लागार संपादक, दिव्य मराठी
ymalkar@gmail.com