आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन एनर्जी सर्वांसाठी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१५ हे जगात सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदले गेल्याने कार्बन उत्सर्जनाच्या सर्वाधिक झळा आता जगाला बसू लागल्या आहेत. ‘क्लायमेट चेंज’ची चर्चा दीर्घकाळ सुरू आहे, पण गेल्या वर्षी जग खऱ्या अर्थाने त्याविषयी गांभीर्याने बोलू लागले आहे. त्याचे कारण या वर्षात जगात वाढलेली उष्णता, काही ठिकाणी झालेली हिमवादळे आणि बीजिंग, दिल्लीसारख्या महानगरांत प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न. जगात गेल्या काही दशकांत आर्थिक विषमता प्रचंड वाढली, ती कमी झाली पाहिजे, यासाठी जगात कंठशोष सुरू आहे, पण ती कमी होण्याचे नाव घेत नाही. सुदैवाने सर्वांना श्वसनासाठी सारखीच हवा उपलब्ध असल्याने श्रीमंत वर्गाला पर्यावरणाच्या रक्षणाची चिंता करणे हे आता क्रमप्राप्त झाले आहे. एक प्रकारे केवळ गरीब, श्रीमंतांनाच नव्हे तर अनेक किरकोळ कारणांनी विघटन झालेल्या या जगाला हा प्रश्न; आता सर्वांचा प्रश्न म्हणून अजेंड्यावर घ्यावा लागला आहे. ग्रीन एनर्जीच्या अपरिहार्यतेमुळे जगाला असे वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सातव्या क्रमांकाचा मोठा देश, दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आणि विकासाच्या वाढलेल्या वेगामुळे जगाला भारत वगळून अशा प्रश्नांचा आता विचारच करता येत नाही. भारतासाठी हे जसे आव्हान आहे, तशीच एक मोठी संधी आहे. त्यामुळेच कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या ऊर्जा निर्मितीचा विचार भारतालाही करावा लागतो आहे. पॅरिस परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताला त्या दिशेने अजून खूप काही करायचे असून त्यासाठी जनतेचा सहभाग फार महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात भारतीय मानसिकता ही मुळातच निसर्गाला ओरबाडणारी नसल्याने सरकारने जाहीर केलेल्या अशा मोहिमांना जनता फार चांगला प्रतिसाद देते आहे. ग्रीन एनर्जीचा वापर वाढवणे हे भारताला तुलनेने सोपे यासाठी आहे की मुळातच भारतीयांचा ऊर्जा वापर हा विकसित देशांच्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे यापुढील ऊर्जेची निर्मिती ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून अधिकाधिक केली जाऊ शकते आणि विकसित जग त्यासाठी मदत करण्यास तयार आहेच. (भारतातील दर माणसी वीजवापर १०१० किलोवॅट इतका झाला आहे. चीनचा तो ४००० तर विकसित देशांचा सरासरी १५००० किलोवॅट इतका प्रचंड आहे!) भारतात अजूनही २८ कोटी जनतेला वीज उपलब्ध नाही. त्यांना विशिष्ट कालमर्यादेत वीज द्यायची तर तिच्या निर्मिती आणि वितरणाचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. भारत सरकारने अलीकडेच या कामी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या १८ हजार ४५२ छोट्या गावांत वीज पोहोचलेली नाही, त्या गावांना एक मे २०१८ पर्यंत वीज पुरविली जाणार आहे. हे काम अतिशय वेगाने सुरू असून त्यातील चार हजार ३१९ गावे विजेशी जोडलीही गेली आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योतीसारख्या योजना त्यासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुरक्षित, माफक दरांत आणि शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या १२६ देशांची क्रमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केली असून त्यात भारत ९० वा आहे. याचा अर्थ वीजनिर्मिती आणि वितरणात सुधारणा करण्यास आपल्याला भरपूर वाव आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात एलईडी हे पर्यावरणपूरक दिवे वापरण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा सात कोटी दिव्यांचे वितरण गेल्या महिन्यापर्यंत पूर्ण झाले आहे. दिव्यांचे हे प्रमाण इतके प्रचंड आहे की एकेकाळी ३१० रुपये किंमत असलेला एलईडी दिवा आता ६४ रुपयांना मिळू लागला आहे. सर्वसामान्य जनतेला ते घेता यावेत म्हणून दर महिन्याच्या बिलातून १० रुपये देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली असून तिचा लाभ जनता घेते आहे. कमी विजेवर चालणारे एसी आणि पंखे याचीही देशाला गरज आहे, हे लक्षात घेऊन ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी एनर्जी एफिसियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे १५०० ऐवजी १००० रुपयांत पंखे उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच धागा पकडून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४३ हजार ६६५ गावांना एलईडी दिव्यांसाठी ९० टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वाधिक मागणी असताना दिव्यांचा वीज वापर निम्मा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
विजेची टंचाई सहन करणारा भारत आतापर्यंत साहजिकच वीजनिर्मितीच महत्त्वाची मानत होता, त्यामुळे पर्यावरणाची हानी करणारे औष्णिक आणि तेल, गॅस प्रकल्प उभारण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नव्हता. पण कार्बन उत्सर्जनात कोळसा, तेल सर्वाधिक कारणीभूत असल्याने औष्णिकवरून सौर, पवन अशा ऊर्जा प्रकल्पांकडे आता आपण वळतो आहोत, पण हा प्रवास जादूची कांडी फिरविल्यासारख्या वेगाने होऊ शकत नाही. पर्यावरणाच्या रक्षणात आम्ही कोठेही कमी नाही, हे भारताने जगाला दाखवावे लागणार आहे आणि त्यासाठी जनतेची साथ अपरिहार्य आहे. एक बरे आहे, ते म्हणजे हा माझा प्रश्न नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. प्रत्येक श्वासाला जी हवा आपण आत घेतो, ती दूषित असेल तर त्याचे किती आणि कसे परिणाम होतात, हे बीजिंग, दिल्लीत पाहायला मिळाले आहे.

हवा, पाणी आणि एकूणच पर्यावरणाचे प्रदूषण ही जगावर आलेली इष्टापत्ती म्हटली पाहिजे. कारण गेली काही शतके मानवी समाजात क्षुल्लक कारणांनी जे विघटन सुरू आहे, त्याला रोखण्याची ताकद या संकटात आहे. या संकटाचा मुकाबला एक खंड, दोन, चार देश, देशातील काही राज्ये, काही धर्म, काही भाषिक समूह, गरीब किंवा श्रीमंत, विशिष्ट वर्ण अशांनी होणार नाही, तर त्यासाठी केवळ माणूस नव्हे तर जीवसृष्टीचा विचार करणारा माणूस म्हणूनच एकत्र यावे लागेल. इतके व्यापक भान या संकटाने दिले आहे. भारतीय जनतेचा पुढाकार असे सांगतो की, मानवी जीवनातील ती व्यापकता त्याला भारतीय संस्कृतीने सांगितलेली आहे आणि ती पुन्हा एकदा स्वीकारण्यास त्याने सुरुवात केली आहे. म्हणूनच ग्रीन एनर्जीचा शोध हा त्या अर्थाने माणुसकीचा शोध ठरणार आहे.
(ymalkar@gmail.com)