आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamaji Malkar Editorial About Team India And Economy

‘टीम इंडिया’ त स्वत:ला शोधूयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे राजकीय, सामाजिक नेतृत्व कसे आहे, याला निश्चित महत्त्व आहे. मात्र केवळ नेतृत्व सक्षम आणि ‘चांगले’ आहे म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशाचे प्रश्न सुटू शकत नाहीत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. हा या खंडप्राय देशाच्या आणि १२६ कोटी नागरिकांच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आणि सकारात्मक टप्पा आहे. आपले सर्व आयुष्य राजकीय नेतृत्वाच्या हाती आहे, असे एक वातावरण देशात तयार झाले, याचे कारण पैसा, मानपान आणि सर्व प्रकारची सत्ता ही राजकारणातूनच मिळू शकते, हेच आतापर्यंत होत आले आहे. मात्र गेल्या अडीच दशकांपासून जागतिकीकरणाच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग तयार होतो आहे. या वर्गाच्या भौतिक गरजा जशा वाढत जातात, तशा मानसिक, वैचारिक गरजाही वाढत जातात. काय योग्य आहे आणि काय नाही, याचा विचार करण्याची मुभा त्याला परिस्थिती देते. भौतिक गरजांतून तो बाहेर पडतो आणि अधिक स्वातंत्र्याची आस त्याला लागते. त्यामुळे आपले आयुष्य राजकारण नियंत्रित करते, याविषयीची चीड त्याच्या मनात घर करू लागते. त्यातूनच राजकारणाविषयीची द्वेषभावना वाढीस लागते. तो कालखंड आपण पाहिला आहे. चांगली गोष्ट अशी की त्यातूनही हा वर्ग बाहेर पडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

काही बदल व्हावा असे ज्यांना वाटते ते मग राजकीय नेते, सरकारी अधिकारी, कामगार, शेतकरी, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, पोलिस, कारखानदार, सिनेअभिनेते, खेळाडू, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, एनआरआय अशा समूहांविषयी बोलू लागतात. म्हणजे राजकीय नेते लबाड आहेत, सरकारी अधिकारी लाचखोर आहेत, कामगार काम करत नाहीत, शेतकरी बदलायला तयार नाहीत, वकील आणि डॉक्टर लुटतात, शिक्षक – प्राध्यापक शिकवत नाहीत, पोलिस भ्रष्ट आहेत, कारखानदार भांडवलदारी पद्धतीने शोषण करत आहेत, कलाकार, खेळाडू- सिनेअभिनेत्यांना समाजाशी काही देणेघेणे नाही, सामाजिक कार्यकर्ते ढोंगी आहेत, पत्रकारांना काही कळत नाही, एनआरआयना देशाविषयी काही प्रेम नाही, अशी ही भाषा असते. हा प्रवास अगदी मध्यमवर्ग, झोपडपट्टीत राहणारे नागरिक, रिक्षावाले, दुकानदार, वॉचमन, मजूर येथपर्यंत जाऊन पोचतो. मग हळूहळू हेही लक्षात यायला लागते की, अरे, आपणही त्यापैकीच एक आहोत. आपल्या घरात, नात्यांत, मित्रांत ज्यांना आपण चांगले ओळखतो किंवा चांगले म्हणतो, तीच तर माणसे या समूहाचा भाग आहेत. मग आपण त्याविषयी इतके वाईट का बोलतो आहोत? या प्रश्नाचे उत्तर लगेच देता येत नाही. पण एक उत्तर आहे, ते म्हणजे आपले दैनंदिन जीवनातले त्रास इतके वाढले आहेत की मनात आलेल्या रागाची ‘शिटी’ होण्याची (वाफ बाहेर पडण्याची) गरज असते. ती मानसिक गरज आपण अशा आत्मवंचनेतून भागवत असतो एवढेच. आपण थेट प्रश्नाला भिडत नाही हे आपल्या लक्षात येऊ लागते.

पुढील टप्पा असतो तो उसनी उदाहरणे देण्याचा. म्हणजे अमेरिकेत किती शिस्त आहे, किती स्वच्छता आहे, युरोपमध्ये माणसाची मानवी प्रतिष्ठा जपण्याचा कसा प्रयत्न होतो आहे, चीनमध्ये कसे उद्योग जोरात चालले आहेत. ते आदर्श गाव होऊ शकते तर बाकीची का होऊ शकत नाहीत, नाशिकमध्ये होते ते औरंगाबादला का नाही, अशा आपल्या वाढलेल्या अपेक्षा त्रास द्यायला लागतात. पण आपण हे विसरतो की अमेरिकेची लोकसंख्या फक्त ३३ कोटी आहे आणि लोकसंख्येची घनता फक्त प्रतिचौरस किलोमीटर ३४ आहे आणि भारताची लोकसंख्या १२६ कोटी म्हणजे घनता ४२५ इतकी प्रचंड आहे. तेथील पोलिसांची संख्या, त्यांना मिळणाऱ्या सोयी, तेथे माणसाच्या कामाला लावण्यात आलेली यंत्रे, हे सगळे घडवून आणण्यासाठी म्हणजे मुबलक साधने उपलब्ध करण्यासाठी त्यांनी केलेली पर्यावरणाची हानी आणि सरकार, प्रशासन आर्थिक सक्षम व्हावे म्हणून जीडीपीतील करांचे वाढवलेले प्रमाण आणि त्यामुळेच तेथे असलेल्या पायाभूत सुविधा – या सर्वांमुळे त्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर झाले आहे. युरोपच्या नागरी जीवनाचा प्रवास चारपाचशे वर्षांचा आहे, तेव्हा कोठे ही स्थिती आली आहे. आपल्या देशात जेवढे वैविध्य आहे, तेवढे नसताना. चीनमध्ये साम्यवादी म्हणजे जवळपास हुकूमशाही आहे, म्हणून त्या वेगाने पण अनेकांचे मानवी हक्क डावलून त्यांनी ते साध्य केले आहे. एका व्यक्तीमुळे एखादे गाव आदर्श होऊ शकते, पण सर्व व्यवस्था आहे तशी ठेवून आदर्श गावांची मालिका तयार होऊ शकत नाही. एक अधिकारी ‘चांगला’ येतो आणि कायदा-व्यवस्था सुधारते आणि तो गेला की ती बिघडते. एकेका बेटांवर आणि तात्कालिक होणाऱ्या या बदलांचे कौतुक सोहळे आपण सुरू करतो. व्यक्तिवादी बदलाला मर्यादा आहेत हे समजून घेणे हा त्याहीपुढचा टप्पा आहे.
आपण विसरतो की ज्या दिल्लीची आपण उठता-बसता बदनामी करतो, त्या दिल्लीतील मेट्रो सेवा दररोज २० लाख नागरिकांची सेवा करते आहे. ती व्यवस्थेतील दुरुस्ती असल्याने त्याच्या नायकाचे नाव आपल्याला माहीत असण्याचे कारण नसते. मुंबई लोकल सेवा किंवा भारतीय रेल्वे ही जगातील एक सर्वाधिक प्रवासी वाहून नेणारी व्यवस्था आहे आणि तेथेही नायकाचा उदोउदो होत नाही. अशा प्रचंड सेवा तुलनेने मोठे घात-अपघात न होता चालल्या आहेत, याचे श्रेय नायकांना नसून ते त्या त्या ठिकाणी या व्यवस्था चालवणाऱ्या भारतीय नागरिकांना आहे. त्यांनी ती जबाबदारी पेलली म्हणून हा गाडा चालला आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीम इंडिया’ असा जो उल्लेख केला, तो यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. वैविध्य, साधेपणा आणि ऐक्य हेच आपले बळ आणि संपत्ती आहे, जनभागीदारी ही लोकशाहीचे खरे सामर्थ्य आहे आणि ती वाढू लागली आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि अखेरीस टीम इंडिया म्हणजे १२६ कोटी म्हणजे प्रत्येक भारतीयाचा सहभाग, असे पंतप्रधान म्हणाले. ही स्पष्टता राजकीय नेतृत्वात असणे भारताच्या पुढील उज्ज्वल प्रवासाला अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. आपण एकमेकांवर चिखलफेक करत राहिलो तर हा देश सुधारण्यासाठी परदेशातून माणसे येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या वृत्तीवर सतत बोट ठेवण्यापेक्षा व्यवस्था सक्षम कशी होईल आणि सर्वांच्या वाट्याला समृद्ध आणि समाधानी जीवन कसे येईल, यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला काय वाटते?
(ymalkar@gmail.com)